आजकालच्या स्पर्धेच्या दुनियेत माणूस कुठेतरी हरवत चालला आहे. या धकाधकीच्या जीवनात स्वतःसाठी वेळ देणं फार कठीण झालं आहे. या कारणामुळे अनेकांना विविध आजार उद्भवत आहेत. कमी वयातच व्यक्तींना मोठ्या आजारांचा सामना करावा लागत आहे. ज्यात हृदयविकाराचा झटका, डायबेटिस व दमा अशा आजारांचा समावेश आहे. या आजारापेक्षा मायग्रेनचे पेशंट अधिक प्रमाणात आढळत आहे.
मायग्रेन या आजाराविषयी फारशी जागृती नाही. सामान्य डोकेदुखी म्हणून याकडे पाहिले जाते. अनेकजण मायग्रेनकडे दुर्लक्ष करतात आणि केमस्टिकडून औषधे घेऊन तात्पुरता दिलासा मिळवतात. पण मायग्रेन हा निव्वळ डोकेदुखीच्या पलिकडे जाणारा आजार आहे. त्यामुळे डोकेदुखी आणि मायग्रेन या आजारांना एकत्र करण्याची गल्लत करू नका, हे दोन्ही आजार वेगवेगळे आहेत.
एम्स रूग्णालयातील डॉक्टर नाबी दर्या वाली या आजाराबाबत सांगतात, ''डोकेदुखीचे अनेक प्रकार आहेत, मात्र, डोकेदुखी आणि मायग्रेन हे दोन्ही प्रकार वेगळे आहेत. मायग्रेनमुळे साधारणपणे डोक्याच्या एका बाजूला थोपटण्यासारखी वेदना होते. ही वेदना फारच त्रासदायक मानली जाते. मायग्रेनच्या रुग्णांवरील लक्षणीय संशोधन असे दाखवते की, स्त्रियांना पुरुषांपेक्षा तीनपट अधिक मायग्रेन असतो. मायग्रेनचे झटके जितक्या वेळा येतात, त्यावरून त्याचे प्रकार ठरतात. काही मायग्रेन वर्षांतून एकदा, तर काही आठवड्यात खूप वेळा येतात.''
एसजीपीजीआय येथील न्यूरोलॉजी प्रो. विमल पालीवाल सांगतात की, ''लहानपणापासून आपल्याला औषधांच्या ओव्हरडोज संदर्भात सांगितले गेले आहे. ओव्हरडोजमुळे आपल्या आरोग्यावर परिणाम होतो. पेनकिलर जास्त प्रमणावर खाऊ नये. यामुळे डोकेदुखीचे प्रमाण वाढते. लोकांमध्ये मायग्रेनबाबतीत जागृतीचा अभाव असल्यामुळे ही परिस्थिती उद्भवली आहे. अशा परिस्थितीत दुखणे जास्त वाढल्यास पेनकिलर न घेता डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक.''
मायग्रेनची लक्षणे
मायग्रेन हा डोके ठणकवणारा आजार आहे. जो डोक्याच्या एक किंवा दोन्ही बाजूस जाणवतो. मायग्रेनचा झटका आल्यावर समोरचे न दिसणे, मळमळणे, ओकारी येणे, प्रकाश, आवाज, वास, स्पर्श सहन न होणे, चेहऱ्याला झिणझिण्या आल्यासारखे वाटणे, भूक कमी लागणे, डोळे दुखणे अशी लक्षणे जाणवतात. मायग्रेनचा झटका चार तासांपासून ७२ तासांपर्यंत टिकू शकतो. हा रोग २५ ते ५५ वयोगटातील व्यक्तींमध्ये निदर्शनास येतो. धक्कादायक बाब म्हणजे शाळकरी मुलांपैकी १० टक्के मुलांना मायग्रेनचा त्रास असतो.
मायग्रेनवर उपचार
मायग्रेन होण्यामागे अनेक कारणे असू शकतात. जीवनशैलीमध्ये झालेल्या बदलांमुळे हा आजार उद्भवू शकतो. जीवनशैलीतील कोणते बदल आणि घटक तुमच्या मायग्रेनच्या हल्ल्यांना कारणीभूत ठरत आहेत हे शोधून काढणे महत्वाचे आहे. म्हणून, उपचार सहसा तीन मुख्य श्रेणींमध्ये येतात:
जीवनशैलीतील बदल आणि आहार
शारिरीक उपचार
औषध उपचार
मायग्रेन या आजाराचे प्रकार विविध आहेत, त्यामुळे या आजारावर डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक. योग्य उपचार आणि औषधच मायग्रेन या आजारावर रामबाण उपाय ठरतील.