सकाळी उठल्यावर बहुतांश लोक चहा किंवा कॉफी घेतात. हल्ली काही जण काहीच घेत नाहीत तर काही जण सुकामेवा फळं असं काही खातात. पण ज्यांना वजन कमी करायचे आहे असे बरेच लोक सकाळी उठल्यावर कोमट पाणी, मध आणि लिंबू हे पेय पितात. यामुळे शरीर डीटॉक्स व्हायला मदत होते आणि शरीरावर असलेली अनावश्यक चरबी घटण्यासही याचा चांगला उपयोग होतो असा आपला समज असतो. पण हा समज खरंच बरोबर आहे का, त्याचा वजन कमी होण्यासाठी फायदा होतो का आणि रीकाम्या पोटी असे काही घेणे आरोग्यासाठी चांगले असते का याबाबत प्रसिद्ध आहारतज्ज्ञ श्वेता पांचाळ-शहा यांनी काही महत्त्वाची माहिती शेअर केली आहे. यामध्ये लिंबू पाण्याविषयी त्या विस्ताराने बोलल्या असून हे पाणी पिण्याचे फायदे त्या आपल्याला विस्ताराने सांगतात, ते कोणते पाहूया (Dose Lemon water early morning Empty stomoch help in any way)...
१. शरीराची PH पातळी चांगली राहण्यासाठी लिंबू पाणी पिण्याचा फायदा होतो. ही PH लेव्हल चांगली असेल तर शरीराचे विविध आजारांपासून संरक्षण होण्यास मदत होते.
२. किडणी स्टोन होण्याची शक्यता यामुळे कमी होते कारण लिंबू पाण्याने तुमचे युरीनचे प्रमाण वाढते आणि किडणी जास्तीत जास्त स्वच्छ राहण्यास मदत होते. त्यामुळे किडणीशी निगडीत समस्या दूर होण्यास याचा चांगला फायदा होतो.
३. पचनक्रिया सुरळीत होण्यासाठी लिंबू पाणी पिणे फायद्याचे असते. तसेच लिंबू पाणी हे एखाद्या लॅक्झेटीव्हप्रमाणे काम करते त्यामुळे पोट साफ होण्याच्या कार्यात अडथळे असतील तर ते दूर होण्यास याचा चांगला उपयोग होतो. बद्धकोष्ठतेची समस्या असेल तर ती दूर होण्यास मदत होते.
४. लिव्हर डीटॉक्स करण्यासाठी हा अतिशय सोपा आणि चांगला पर्याय आहे. शरीरातील अनावश्यक टॉक्सिन्स बाहेर पडण्यासाठी लिंब पाणी फायदेशीर असते. त्वचा नितळ आणि सुंदर राहण्यासाठी या डीटॉक्सचा चांगला उपयोग होतो.
५. वजन कमी करण्यासाठी लिंबू पाणी पिण्याचा फायदा होतो का हा प्रश्न अनेकदा विचारला जातो. याचा फायदा नक्की होतो पण तुम्ही त्यासोबत जीवनशैलीत इतर कोणतेही बदल करत नसाल तर त्याचा म्हणावा तसा फायदा होत नाही. त्यामुळे आहार, व्यायाम यांसारख्या इतर गोष्टींकडेही तितक्याच गांभिर्याने लक्ष द्यायला हवे.