Join us   

दुपारी जेवल्यानंतर झोप काढली तर खरंच वजन वाढतं? तज्ज्ञ सांगतात, रोज दुपारी झोपाल तर..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2023 5:46 PM

Dose Sleeping In the Afternoon lead to weight gain : दुपारची झोप आणि लठ्ठपणा यांचा नेमका काय संबंध याबाबत आहारतज्ज्ञ देतात महत्त्वाची माहिती...

दुपारच्या वेळी जेवल्यानंतर झोप येणे अतिशय स्वाभाविक आहे. सकाळी लवकर उठणे, एकामागोमाग एक सुरू असलेली कामे, हेवी वर्कआऊट आणि दुपारचे हेवी जेवण यामुळे अनेकांना थकल्यासारखे वाटते. त्यामुळे एक लहानशी डुलकी काढली तरी हा थकवा निघून जाण्यास आणि तरतरी येण्यास मदत होते. दुपारी झोपण्याचा आपल्या आरोग्यावर विपरीत परीणाम होतो, वजन वाढते आणि इतरही काही समस्या निर्माण होतात असे काहीबाही आपण ऐकतो. मात्र यामागे कोणतेही विशेष तथ्य नसून दुपारच्या झोपण्याने वजन वाढते याला कोणताही शास्त्रीय आधार नाही. दुपारच्या झोपण्याबाबत प्रसिद्ध आहारतज्ज्ञ अमिता गद्रे काही महत्त्वाच्या फॅक्टस सांगतात त्या कोणत्या हे समजून घेतल्यास आपली जीवनशैली नक्कीच सुरळीत होण्यास मदत होऊ शकते (Dose Sleeping In the Afternoon lead to weight gain). 

१. दुपारी झोपल्याने आपल्या शरीराला थोडा आराम मिळण्यास मदत होते. या दुपारच्या झोपेमुळे आपली चयापचय क्रिया आणि शरीरातील कॅलरींचे काहीही बदलत नाही. 

(Image : Google)

२. मात्र ही झोप १५ ते २० मिनीटांची असायला हवी. दुपारी आपण १ ते २ तास झोपत असू तर त्याचा रात्रीच्या झोपेवर परीणाम होतो. 

३. दुपारी जास्त झोप झाली तर रात्री लवकर आणि गाढ झोप येण्यात अडचणी येतात. रात्रीची जास्त वेळाची सलग झोप उत्तम आरोग्यासाठी अतिशय महत्त्वाची असल्याने दुपारी थोडकेच झोपायला हवे. 

४. दुपारी झोप झाली असेल तर कोर्टीसोल या हार्मोन्सचे प्रमाण वाढते आणि त्यामुळे मेंदू एकदम तरतरीत राहतो आणि झोप येण्यात अडथळे येतात. 

५. त्यामुळे सकाळी वर्कआऊटनंतर किंवा दुपारच्या वेळी थकवा आल्यासारखे वाटत असेल तर १५ ते २० मिनीटांची विश्रांती घेण्यास अजिबातच हरकत नाही. 

६. त्याचबरोबर सतत अशाप्रकारचा थकवा येत असेल तर शरीरातील प्रोटीनची पातळी, डी ३, बी १२ यांसारख्या व्हिटॅमिन्सची पातळी, लोहाची पातळी तपासायला हवी. कारण हा थकवा किंवा झोप शरीरातील कमतरतांमुळे असायला नको. 

७. फॅट लॉस करायचा असेल तर रात्रीची सलग पुरेशी झोप अतिशय महत्त्वाची असते हे प्रत्येकाने लक्षात घ्यायला हवे.      

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सलाइफस्टाइल