Join us   

तापत्या उन्हातच प्या हा 1 कप 'मिरॅकल टी'; वापरा घरातल्याच 3 गोष्टी, उष्णतेचा त्रास कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2022 3:29 PM

वाढत्या उन्हाच त्रास फार..प्या 1 कप पुदिना-धने- जिऱ्याचा 'मिरॅकल टी'; उन्हाळ्यातल्या समस्यांवर प्रभावी उपाय

ठळक मुद्दे मिरॅकल टी मायग्रेन, कोलेस्टेराॅल, मधुमेह, थायराॅइड, पित्त, हार्मोन्स असंतुलन, बध्दकोष्ठता, आतड्यांशी संबधित विकार यावर फायदेशीर असतो.

उन्हाळ्यात उन्हाच्या तप्त झळांनी जीव नुसता हैराण होतो असं नाही तर या काळात आरोग्याच्या विविध समस्याही उद्भवतात. तीव्र उन्हानं डोकेदुखी, पोटफुगी, ओटीपोटात दुखणे, मळमळणे, अस्वस्थ वाटणे, जडजड वाटणे यासारख्या समस्या उद्भवतात.  उन्हाळ्यातल आरोग्यविषयक समस्या उद्भवू नये यासाठी पुरेशा पाण्यासोबत औषधी समजली जाणारी पेयं पिणं देखील आवश्यक असतात. घरात उपलब्ध असलेल्या सामग्रीतून अनेक औषधी पेयं तयार करता येणं शक्य आहे. आयुर्वेदिक तज्ज्ञ डाॅ. दीक्षा भावसार यांनी उन्हाळ्यात उद्भवणाऱ्या समस्यांवर  पुदिना-धने आणि जिऱ्याचा  वापर करुन मिरॅकल टी तयार करुन , तो पिण्याचा सल्ला दिला आहे. 

Image: Google

डाॅ. भावसार सांगतात की उन्हाळ्यात पुदिना, धने आणि जिरे हे तीन घटक आरोग्यासाठी महत्वाचे असतात. या तीन घटकांनी युक्त मिरॅकल टी हा मायग्रेन, कोलेस्टेराॅल, मधुमेह, थायराॅइड, पित्त, हार्मोन्स असंतुलन, बध्दकोष्ठता, आतड्यांशी संबधित विकार यावर फायदेशीर असतो. डाॅ. भावसार यांनी हा मिरॅकल टी कसा तयार करायचा आणि त्याचे फायदे याविषयीची सविस्तर माहिती आपल्या इन्स्टाग्रामवरील पोस्टमधून दिली आहे. 

Image: Google

कसा करायचा मिरॅकल टी?

एक ग्लास पाणी भांड्यात उकळायला ठेवावं. त्यात 5-7 पुदिन्याची पानं, 1 छोटा चमचा जिरे, 1 मोठा चमचा धने घालून पाणी उकळू द्यावं. पाच मिनिटं पाणी उकळावं. हे पाणी चांगलं उकळलं की गॅस बंद करावा. ते पाणी गाळून घ्यावं. हा मिरॅकल टी कोमट झाला की प्यावा.

Image: Google

मिरॅकल टी चे फायदे 

1. मिरॅकल टी चा महत्वाचा घटक म्हणजे पुदिना. सर्दी, खोकला, पित्त, गॅस, फुट फुगणं, अपचन डोकेदुखी, चेहऱ्यावर मुरुम पुटकुळ्या, बध्दकोष्ठता यासारख्या समस्यांमध्ये पुदिना सेवन केल्यानं फायदा होतो. तसेच पुदिन्यामुळे शरीरातील विषारी घटकही बाहेर पडतात. 

2. उन्हाळ्यात जिरे सेवन करणं फायदेशीर असतं. जिऱ्यांमुळे तोंडाला चव येते, पचन अग्नी सुधारुन पचनास मदत होते. जिरे सेवन केल्यानं शरीरातील कफ आणि वात विकार कमी होतो. 

3. मिरॅकल टी मधील धन्यांमुळे शरीरातील वात, पित्त कफ हे दोष नियंत्रित राहातात. पुदिना-जिरे-धनेयुक्त मिरॅकल टी त्यातील गुणधर्मामुळे केवळ उन्हाळ्यातच नाही तर कोणत्याही ऋतूत पिणं फायदेशीर ठरतं.  डाॅ. दीक्षा भावसार यांच्या मते उन्हाळ्यात उद्भवणाऱ्या समस्यांचा विचार करता मिरॅकल टी उन्हाळ्याच्या काळात रोज एक कप घ्यायलाच हवा.   

टॅग्स : समर स्पेशलहोम रेमेडी