Join us   

नारळाचे पाणी पिऊन मलाई फेकून देता? मलाईमधील पौष्टीक घटक शरीरासाठी आहे उपयुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 02, 2023 5:51 PM

Coconut Malai: Benefits, Nutrition Fact नारळ पाणी प्यायल्यानंतर मलाई फेकू नका, खावा.. यासंदर्भात सेलिब्रिटी न्यूट्रिशनिस्ट सांगतात..

भारतासह जगभरात नारळाचे पाणी आवडीने पितात. नारळाच्या पाण्याला भारतात प्रचंड मागणी आहे. कारण शरीराला हायड्रेट ठेवण्याचा हा स्वस्त आणि आरोग्यदायी मार्ग आहे. त्याची चव अनेकांना त्याकडे आकर्षित करते. नारळाचे पाणी वर्षातील १२ महिने उपलब्ध आहे. नारळाच्या पाण्यात अनेक पोषक तत्वे आढळतात. त्यामध्ये पोटॅशिअमही असते. तसेच बायोॲक्टिव्ह ॲंजाइम असतात. त्यामुळे शरीरातील मेटाबॉलिजम वाढण्यास मदत होते.

नारळाचे पाणी प्यायल्यामुळे अधिक कॅलरीज बर्न होतात. यासह दिवसभर फ्रेश व उत्साही वाटते. मात्र, काही जण नारळाचे पाणी पिऊन त्याची मलाई फेकून देतात. दरम्यान, मलाई देखील आपल्या शरीरासाठी उपयुक्त आहे. याचे फायदे अनेक आहेत. यासंदर्भात सेलिब्रिटी न्यूट्रिशनिस्ट नमामी अग्रवालने तिच्या इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यांनी नारळाच्या मलाईचे फायदे त्यातून सांगितले आहे.

नारळाच्या मलाईचे फायदे

न्यूट्रिशनिस्ट नमामी अग्रवालने तिच्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये लिहिले की, ''सहसा आपण सर्वजण नारळाचे पाणी पितो आणि त्याची मलाई फेकून देतो. नारळाच्या मलईमध्ये अनेक पौष्टीक घटक असतात. नारळाच्या मलाईमध्ये खूप गुड फॅट असते. याव्यतिरिक्त, त्यात MCTs (मध्यम-चेन ट्रायग्लिसराइड्स) देखील असते, जे इतर चरबीपेक्षा वेगळ्या पद्धतीने मेटाबोलाइज्ड करतात. ही चरबी आपल्या शरीरासाठी हानिकारक नाही, त्यामुळे आपण या नारळाच्या मलाईचे सेवन कोणतीही चिंता न करता खाऊ शकता.

नारळाच्या मलाईमध्ये कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण कमी असते व अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणावर आढळते. त्यातील गुड फॅट्समुळे रक्तातील साखर नियंत्रित राहण्यास मदत मिळते. हेल्दी फॅट्समुळे वजन वाढणार नाही. फायबरमुळे पोट दीर्घकाळ भरलेले राहते, ज्यामुळे भूक कमी लागते.

नारळाच्या मलाईमध्ये पॉलीफेनॉल अँटीऑक्सिडंट्स देखील असतात, जे शरीराच्या पेशींना नुकसान होण्यापासून वाचवतात. यासह जुनाट आजारांपासून दूर राहण्यास मदत करतात.

नारळाचा वापर अनेक पदार्थ बनवण्यासाठी केला जातो. जे लोक लो कार्ब, ग्लूटेन-फ्री किंवा नट-मुक्त आहार घेत आहेत त्यांच्यासाठी हा एक उत्तम पर्याय मानला गेला आहे.

नारळाच्या मलाईमध्ये अनेक महत्त्वाचे पोषक घटक असतात, जे शरीरासाठी आवश्यक असतात. त्यात मर्यादित प्रमाणात सॅच्युरेटेड फॅट्स देखील आहे. त्यामुळे मलाईचे सेवन कमी प्रमाणात करणे उत्तम ठरेल.

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्यफळे