फळांचा रस पिणं हे पाणी पिण्या इतकं सहज आणि सोपे नाही. साधं पाणी प्यायचं म्हटलं तरी सकाळी उठल्यावर, रात्री झोपताना, दिवसभर किती पाणी प्यावं.. असे पाणी पिण्याचे नियम असतात. फळांचा रस पिण्याचे काही नियम आहेत. फळं खाण्यापेक्षा फळांचा ज्युस प्यायला आवडतो, फळांचा रस पिणं हे जास्त आरोग्यदायी आहे, फळांचा रस घेतल्यानं वजन कमी होतं, फ्रूट ज्यूस घेणं हा फॅशनेबल ट्रेण्ड आहे.. अशा वेगवेगळ्या कारणांनी फ्रूट ज्यूस घेतला जातो. सकाळी नाश्त्याऐवजी फ्रूट ज्यूस पिणाऱ्यांची संख्या जास्त आहे. पण फ्रूट ज्यूस पिण्याचे शास्त्रीय नियम समजून न घेता रिकाम्या पोटी पिल्याचे तोटेच जास्त अनुभवायला मिळतात.
Image: Google
रिकाम्या पोटी फ्रूट ज्यूस पिण्याचे परिणाम
1. सकाळी संत्री, द्राक्षं, लिंबू या आंबट फळांचा ज्यूस घेऊन नये. रिकाम्या पोटी आंबट फळांचा रस पिल्याने पोटात ॲसिडचं प्रमाण वाढतं. आंबट फळांमध्ये सायट्रस या घटकाचं प्रमाण जास्त असतं.
2. सकाळच्या वेळेत फळांचा रस घेताना तो जास्त थंड असू नये. बर्फ घालून फळांचा ज्यूस रिकाम्या पोटी सेवन करु नये. थंडं ज्यूसमुळे श्लेष्म पटलांचं नुकसान होतं. यामुळे पचन क्रिया बिघडते.
3. सकाळी रिकाम्या पोटी फळांचा रस घेऊन मग त्यावर काहीतरी खाल्लं जातं. तज्ज्ञ म्हणतात त्याप्रमाणे ही पध्दत चुकीची आहे. फळांचा रस हा मुळातच जड असतो. रिकाम्या पोटी ज्यूस पिल्याने पचनव्यवस्थेवर तर पडतोच तसेच ज्यूस सोबत काही खाल्ल्यास त्याचा विपरित परिणाम होऊन जुलाब, मळमळ हे त्रास होतात. ज्यूस पिल्यानंतर किमान एक तास काही खाऊ नये.
Image: Google
4. तज्ज्ञ म्हणतात फळांचा रस उठल्याबरोबर रिकाम्या पोटी घेणं किंवा व्यायामानंतर लगेच फळांचा रस पिणं त्रासदायक ठरतं. व्यायाम झाल्यानंतर अर्धा ते पाऊण तास फळांचा रस पिऊ नये.
5. फळांचा रस रिकाम्य पोटी घेणं अनारोग्यास कारण ठरतं. तसेच फळांच्या रसात साखर घालून असं ज्यूस सकाळी रिकाम्यापोटी घेणं हे आरोग्यास आणखीनच त्रासदायक ठरतं. सकाळी रिकाम्यापोटी फळांचा साखर घातलेला ज्यूस पिल्याने रक्तातील साखर वाढते. चुकीच्या पध्दतीनं फळांचा रस घेण्याची सवय असल्यास ही सवय मधुमेहास कारण ठरु शकते.
Image: Google
ज्यूसपेक्षा फळं फलदायी!
1. आयुर्वेद सांगतं, की फळांचा रस पिणं हा फळं खाण्याच्या तुलनेत जास्त जड असतो. एक सफरचंद खाणं आणि सफरचंदाचं ज्यूस करताना सफरचंदांचा चोथा काढून केवळ सफरचंदाचा रस घेणं या दोन्हींच्या तुलनेत अख्खं सफरचंद खाणं ज्यूसच्या तुलने त पचायला सहज असतं. कारण अख्ख्या सफरचंदात पचनास मदत करणारे फायबर असतात. हे फायबर ज्यूसमध्ये नसतात. फळांचा रस पिताना तो कोणत्या फळांचा पिता, कधी पिता, किती पिता, थंडं पिता की फ्रिजमध्ये ठेऊन गार करुन पिता हे सर्व मुद्दे महत्त्वाचे असतात. त्याचे परिणाम आरोग्यावर होतात.
2. घरी किंवा बाहेर ज्यूस पितांना तो गार पिण्याला प्राधान्यं दिलं जातं. पण बाहेरचे गार ज्यूस शरीरावर जास्त नकारात्मक परिणाम करतात. बाहेर ज्यूस करताना फ्रोझन फळं, फ्रोझन फळांचे गर, कॅन ज्यूस यांचा वापर केला जातो. मुळातच अशा परिस्थितीत या फळांच्या रसावर गारव्याची विशेष आणि जास्त प्रक्रिया झालेली असते. अशा फळांचे रस जर आणखी थंड करुन किंवा त्यात बर्फ घालून प्याल्यास त्याचा परिणाम पचनास मदत करणाऱ्या अग्नीवर होतो; अग्नी मंद होतो. फळांचे रस प्याल्यास पचनास जड जातात. असे ज्यूस नियमित प्याल्यास स्थूलता वाढते. ज्यूस पिल्याने वजन वाढतं ते असं. एक ग्लास ज्यूस काढण्यासाठी किमान 2-3 फळांचा वापर केला जातो. एक ग्लास मोसंबीचा ज्यूस काढण्यासाठी 2-3 मोसंबी वापरल्या जातात. ज्यूस टाळून जर फळं खाल्लं तर एक अख्खी मोसंबी खाल्ल्यानं पोट भरल्याची संवेदना होते.
3. घरी ज्यूस करताना त्यात चवीपुरती साखर घातली जाते. बाहेर जे ज्यूस मिळतात त्यात साखर जास्त असते. साखरेमुळे फळांचा रस पिऊन जे फायदे होणं अपेक्षित असतं, ते मिळत नाही. उलट शरीरात ज्यूसमधील साखर जाऊन कॅलरीज वाढतात.
4. एका वेळेस फक्त अर्धा ग्लास ज्यूस पिणं ( 100 ते 150 मिली) योग्य मानलं जातं. हे ज्यूस साखर आणि मीठ ( सैंधव मीठ, मीठ, चाट मसाला) न घालता प्यायला हवा.
5. भाज्यांचे रस घेताना वेगवेगळ्या भाज्या एकत्र करुन ज्यूस केला जातो. कोणत्या भाज्या एकत्र करताय, एकत्र करतान त्यांचे प्रमाण काय त्यानुसार या भाज्यांच्या ज्यूसचे परिणाम होत असतात. दोन्ही टोकाच्या चवीच्या भाज्या/ फळं एकत्र करुन त्यांचा ज्यूस पिणं तब्येतीस हानीकारक मानलं जातं.
6. प्रकृतीनुसार फळांचा/ भाज्यांचा रस प्रत्येकावर वेगवेगळा परिणाम करतात. आपल्या प्रकृतीनुसार आपण कोणत्या फळांचा ज्यूस घ्यायला हवा हे समजून मग फळांचे/ भाज्यांचे ज्यूस प्यायला हवेत. कडू चवीचे रस पित्त प्रकृतीच्या लोकांच्या आरोग्यावर विपरित परिणाम करतात. सीताफळ, पेरु यांचे ज्यूस करताना, बनाना स्मूदी करताना दूध वापरलं जात्ं, त्याचा परिणाम शरीरातील कफ वाढतो, डोकेदुखी, उलट्या, मळमळ या समस्या निर्माण होतात.
( वैद्य राजश्री कुलकर्णी एम.डी आयुर्वेद, नाशिकस्थित प्रसिध्द आयुर्वेद तज्ज्ञ)