तांब्याच्या भांड्यातून पाणी पिणे फायदेचे मानले जाते. प्राचीन काळापासून तांबे ह्या धातुपासून बनवलेली भांडी वापरण्याची प्रथा होती. विशेषतः पिण्याचे पाणी साठवून ठेवण्यासाठी कळशी, हंडा, पिंप आणि पाणी पिण्यासाठीची भांडी,पेले हे सगळे आवर्जून तांब्याचे असत. तांब्याची भांडी वापरण्याचा संबंध अनेकदा आरोग्याशी आढळून येतो. मात्र, हिवाळ्यात तांब्याचा वापर करणे कितपत योग्य आहे याबाबत तुम्हाला माहित आहे का?
आयुर्वेदतज्ज्ञ डॉ. संदीप काळे काही महत्त्वाचे मुद्दे सांगतात. "तांबं हा आम्लधर्मीय धातू आहे, आपण जेव्हा तांब्याच्या भांड्यात पाणी ठेवतो, तेव्हा आम्लधर्मीय गुणधर्मामुळे आणि सारक गुणामुळे हे पाणी पचनास हलके होते. पाण्याला एक लघु गुणधर्म मिळतो, जो आपल्या शरीरासाठी खूप उपयुक्त असतो. रात्री झोपताना तांब्याच्या भांड्यात पाणी झाकून ठेवून सकाळी ते पाणी प्यायल्याने हिवाळ्यात उद्भवणाऱ्या आरोग्याच्या तक्रारी दूर राहण्यास मदत होते."
सांधेदुखीवर प्रभावी
हिवाळ्यात अनेक जणांना सांधेदुखीच्या समस्येपासून दोन हात करावा लागतो. अशा स्थितीत तांब्याच्या भांड्यात पाणी प्यायल्याने हा त्रास दूर होतो. तांब्यामध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असतात. यामुळे, ते वेदना कमी करण्यास मदत करतात.
लोहाची कमतरता होते दूर
तांब्याच्या भांड्यात अन्न किंवा पिण्याचे पाणी प्यावे. असे केल्याने लोहाची कमतरता भरून निघते. यासह नवीन पेशी तयार होण्यास मदत होते.
हृदयाची समस्या राहते लांब
तांब्यामुळे शरीरातील खराब कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होते, आणि रक्तदाबही नियंत्रित राहतो. म्हणूनच हृदयविकार बरा करण्यासाठी ते खूप उपयुक्त आहे.
त्वचेसाठी फायदेशीर
तांब्याची भांडी वापरल्याने शरीरात मेलेनिन तयार होण्यास सुरुवात होते. याशिवाय तांब्यामुळे नवीन पेशी तयार होते. यामुळे त्वचेचा वरचा थर आणखी चांगला होतो. अशाने चेहरा चमकदार दिसतो.
पचनशक्ती सुधारते
आयुर्वेदात सांगितल्याप्रमाणे ‘ताम्र जल’ म्हणजेच तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यायल्यामुळे पोट आणि आतडयांचे आतील अस्तर स्वच्छ होते. त्यामुळे शरीराची पचनशक्ती सुधारते.