पूर्वीच्या काळी घरात लहान बाळाचा जन्म झाला की, सोनार येऊन त्याचे कान टोचून जात असे. जसा काळ बदलला तस कान टोचून घेण्याच्या पद्धतीसुद्धा बदलल्या. 'कान टोचणे' हा पारंपरिक शब्द जाऊन सो कॉल्ड 'पिअर्सिंग' या शब्दाचा उगम झाला. एवढेच नव्हे तर आजकाल कान टोचण्यासाठी सोनाराकडे न जाता मोठमोठ्या पिअर्सिंग स्टुडिओमध्ये जाण्याचं फॅड सुरु आहे. पूर्वी फक्त कान आणि नाक टोचलं जायचं परंतु आता शरीराच्या कुठल्याही भागावर टोचून त्यात वेगवेगळ्या प्रकारच्या रिंग्स घातल्या जातात. पण हे पिअर्सिंग झाल्यानंतर काही दिवस अनेकांना वेगळा त्रास होतो. यामुळे कधी कधी टोचलेल्या ठिकाणी त्वचा लालसर होणं, फोड येणं, फोडामधून रक्त येणं, जखम होऊन पू जमा होणं, त्वचेवर सूज येणं अशा स्किनच्या समस्या जाणवतात. त्यामुळे पिअर्सिंग करताना तिथल्या स्किनची काळजी घेणे गरजेचे असते(How to Take Care of Your Piercings).
पिअर्सिंग करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात ?
१. प्रोफेशन पिअर्सर - पिअर्सिंग करून घेताना ते प्रोफेशल पिअर्सरकडूनच करून घ्या. प्रोफेशन पिअर्सर हे त्या विषयातील अनुभवी व्यक्ती असल्याने आपण त्यांच्यावर खात्री करू शकतो.
२. निर्जंतुकीकरण करणे गरजेचे - जेव्हा तुम्ही पिअर्सिंग करायला जाल तेव्हा पिअर्सिंग करण्यासाठी ज्या सुया वापरल्या जातात त्यांचे निर्जंतुकीकरण झाले आहे का ? याची खात्री करून मगच पिअर्सिंग करून घ्या. इन्फेक्शनचा धोका टाळण्यासाठी शक्यतो त्यांना नवीन सुईचा वापर करण्यास सांगावे.
३. डॉक्टरांचा सल्ला घ्या - तुमची स्किन सेन्सेटिव्ह असेल तर पिअर्सिंग करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या. शरीरावर कोणत्याही भागाला इन्फेक्शन झाले तर त्यावर स्वतःच घरगुती उपाय करू नका. त्याबाबत डॉक्टरांचा सल्ला घेणं खूप गरजेचं आहे. मात्र जर तुम्हाला काही कारणांमुळे डॉक्टरांकडे जाण्यास वेळ झाला तर तात्पुरता उपाय करण्यासाठी जखमेवर हळदीचा लेप लावा. इन्फेक्शनकडे दुर्लक्ष करू नका. जास्त दिवस जखम बरी होत नसेल तर डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे.
४. स्वच्छतेची काळजी घ्या - आपली स्किन ही नाजूक असते. ज्यामुळे तिच्यावर इनफेक्शन होण्याचा धोका सर्वात जास्त असतो. जर तुम्हाला फॅशनेबल दिसण्यासाठी नाक, कान अथवा शरीरावरचा एखादा अवयव टोचायचा असेल तर त्याआधी त्या भागावरची स्किन स्वच्छ करून घ्या. ज्यामुळे इनफेक्शनचा धोका कमी होऊ शकतो. तुम्ही ज्या भागावर टोचून घेणार आहात तिथे आधीच एखादे इनफेक्शन अथवा जखम नाही ना याची खात्री करून घ्या.
५. हे करू नये - कान अथवा नाक टोचलेल्या भागाला सतत हात लावू नका. तुमच्या हातामुळेही त्या भागाला इनफेक्शन होऊ शकतं. अंघोळ करताना अथवा तोंड धुताना नाक,कान टोचलेला भाग दुखावला जाणार नाही याची काळजी घ्या. कारण सुरूवातीच्या काही दिवसांमध्ये जखम ताजी असल्यामुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो.
६. जखम होऊ नये म्हणून - पिअर्सिंग केल्यानंतर त्या भागातील रिंग दिवसातून किमान दोन वेळा तरी हलक्या हाताने फिरवा. जर रिंग फिरवली नाही तर ती एकाच जागी अडकू शकते. यामुळे पिअर्सिंग केलेल्या ठिकाणी जखम होण्याची शक्यता असते.