Join us   

पावसाळ्यात अंगावर रॅश येऊन खाज येते-आग होते.. घरीच करा १ सोपा उपाय, मिळेल आराम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2023 4:32 PM

Easy Ayurveda Home Remedy For Allergic Rashes : औषधे घेण्यापेक्षा घरच्या घरी करता येईल असा एक आयुर्वेदिक उपाय

पावसाळ्याच्या दिवसांत सर्दी-ताप, पोटदुखी यांसारख्या समस्या उद्भवतात त्याचप्रमाणे त्वचेच्या समस्याही डोकं वर काढतात. त्वचेवर होणारे विविध प्रकारचे फंगल इन्फेक्शन, त्वचा दिर्घकाळ ओली राहिल्याने येणारे रॅशेस किंवा अंगावर ओले कपडे बराच वेळ राहिल्याने येणारी खाज असे काही ना काही या काळात होतेच. या काळात असणारे दमट वातावरण, पावसाळी जर्कीन किंवा रेनकोट यांचे कापड आणि पाण्याचा ओलसरपणा यांमुळे त्वचेच्या समस्या निर्माण होतात. दमट हवेमुळे लवकर कोरडेपणा येत नाही आणि अॅलर्जिक रॅशेस येण्याची शक्यता असते (Easy Ayurveda Home Remedy For Allergic Rashes ). 

असे झाले की एकतर त्या भागाला खूप खाज येते, आग होते किंवा लालसर चट्टे दिसायला लागतात. घरगुती उपायांनी हे वेळीच कमी झाले नाही तर मात्र आपल्याला डॉक्टरांकडे जाण्याशिवाय पर्याय नसतो. मग डॉक्टरही अँटी अॅलर्जिक औषधे देतात. अशी अॅलर्जी ठराविक काळाने पुन्हा पुन्हा होत असल्याने ही औषधे दिर्घकाळ घ्यावी लागतात. त्यामुळे अशी औषधे घेण्यापेक्षा घरच्या घरी करता येईल असा एक सोपा आयुर्वेदिक उपाय आज आपण पाहणार आहोत. प्रसिद्ध आयुर्वेदिक डॉक्टर मिहीर खत्री यांनी हा उपाय सांगितला असून तो कसा करायचा पाहूया... 

(Image : Google)

१. ५ काळी मिरी घेऊन त्याची बारीक पावडर करायची. 

२. यामध्ये अर्धा चमचा देशी तूप घालायचे  

३. त्यामध्ये अर्धा चमचा तुरटीची पावडर घालायची आणि हे चांगले एकजीव करायचे.

४. हे तिन्ही पोटातून घ्यायचे, अंगावर आलेल्या रॅशेसवर आराम मिळण्यास मदत होईल.

५. तर ज्याठिकाणी रॅश आली आहे त्याठिकाणी तूप आणि सैंधव मीठ एकत्र करुन लावायचे. यामुळे खाज आणि त्यावर आलेली सूज कमी होण्यास मदत होईल. 

६. हा उपाय २ ते ४ आठवडे केल्यास त्वचेच्या समस्यांपासून लवकर आराम मिळण्यास मदत होईल.

७. त्वचेवर येणारे रॅशेस सतत येऊ नयेत त्यासाठी ओव्याची पूड आणि गूळ यांच्या फुटाण्याच्या आकाराच्या  गोळ्या तयार कराव्यात आणि रोज सकाळी या २ गोळ्या खाव्यात. त्यानंतर १५ मिनीटे काहीही खाऊ-पिऊ नये. हे १५ दिवस ते १ महिना नियमित केल्यास त्वचेचे त्रास दूर होण्यास मदत होईल. 

 

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सत्वचेची काळजीघरगुती उपायपावसाळा आणि पावसाळी आजारपण