Join us   

किडनी स्वच्छ ठेवायची, तर प्यायलाच हवं १ स्पेशल डिटॉक्स ड्रींक, घ्या सोपी रेसिपी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2023 11:44 AM

Easy Detox Drink For Kidney : हे डिटॉक्स ड्रींक कसे करायचे आणि त्याचे शरीराला काय फायदे होतात याविषयी..

आपण चेहरा, शरीर ज्याप्रमाणे स्वच्छ ठेवतो त्याचप्रमाणे आपले इतरही अवयव स्वच्छ ठेवायला हवेत. किडनी हा आपल्या शरीरातील एक महत्त्वाचा अवयव आहे. आपण खाल्लेल्या अन्नाचे रक्तात रुपांतर होते. पण हे रक्त शुद्ध करण्याचे किंवा फिल्टर करण्याचे महत्त्वाचे काम किडनीच्या माध्यमातून केले जाते. डायबिटीस, बीपी, गर्भधारणेतील गुंतागुंत, व्यसन यांसारख्या गोष्टींमुळे किडनीवर ताण येतो आणि तिच्या कार्यात अडथळे निर्माण व्हायला सुरुवात होते. किडनी खराब झाली की इतर अवयवांवही त्याचा ताण येतो आणि त्यांच्याही कार्यात अडथळे येतात (Easy Detox Drink For Kidney). 

किडनीतील फिल्टर खराब झाल्यास युरिक अॅसिड, अमोनिया, युरिया क्रिएटीनिन, अमिनो अॅसिड, सोडियम, पाणी वाढते. याचा आरोग्यावर गंभीर परीणाम होतो. म्हणून आपला आहार, झोप, व्यायाम हे सगळे चांगले असणे आवश्यक असते. याबरोबरच किडनी कायम स्वच्छ आणि चांगल्या पद्धतीने कार्यरत ठेवायची तर एका खास पेयाचा आहारात समावेश करायला हवा. अगदी झटपट होणारे हे डीटॉक्स ड्रिंक नियमित प्यायल्यास त्याचा नक्कीच चांगला उपयोग होतो. आहारतज्ज्ञ ख्याती रुपाणी यांनी हा सोपा पण अतिशय उपयुक्त असा उपाय सांगितला असून हे डिटॉक्स ड्रींक कसे करायचे आणि त्याचे शरीराला काय फायदे होतात याविषयी.. 

कसं करायचं हे डीटॉक्स ड्रिंक 

एक ग्लास पाणी घ्यायचं. त्यामध्ये मूठभर हिरवीगार ताजी कोथिंबीर बारीक चिरुन घालायची. यामध्ये २ ते ३ वेलदोडे घालायचे. हे सगळं मिश्रण एका पातेल्यात घेऊन चांगलं उकळून घ्यायचं. आणि नतंर एका गाळणीने गाळून घ्यायचं. कोथिंबीर आणि वेलदोड्याचा अर्क उतरल्याने किडनीसाठी आणि लिव्हरसाठीही हे ड्रींक अतिशय फायदेशीर ठरते. यामुळे आठवड्यातून किमान ३ वेळा रात्री झोपण्यापूर्वी १ कप हे ड्रींक अवश्य प्यायला हवे. फक्त २ गोष्टींपासून होणारे आणि करायलाही अतिशय सोपे असलेले हे ड्रींक अवश्य घेऊन पाहा. 

डीटॉक्स ड्रींकचे फायदे

१. शरीरातील पाण्याची पातळी योग्य राखण्यास मदत 

२. रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहण्यास मदत 

३. रक्तदाब कमी होण्यास फायदेशीर 

४. किडनी डीटॉक्स होण्यासाठी उपयुक्त 

५. अॅसिडीटीपासून सुटका होण्यास मदत  

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सलाइफस्टाइल