रोज सकाळी पोट साफ होणे आरोग्य उत्तम राहण्यासाठी अतिशय महत्त्वाची गोष्ट असते. सकाळी एकदा पोट साफ झालं की दिवसभर आपल्याला फ्रेश वाटतं. पण पोटात घाण तशीच असेल तर अस्वस्थ वाटत राहतं. पण पोट साफ नसेल तर बद्धकोष्ठता, गॅसेस, मूळव्याध, वजन वाढणे किंवा कमी होणे, ऍसिडिटी यांसारख्या तक्रारी सतत मागे लागतात. आहाराच्या चुकीच्या पद्धती, झोपेचा अभाव, पाणी कमी पिणे, ताणतणाव यांसारख्या गोष्टींमुळे अनेकांना कॉन्स्टीपेशनचा त्रास होतो. थंडीच्या दिवसांत हवेतील कोरडेपणाने शरीरातही एकप्रकारची शुष्कता येते. तसेच थंडीत पाणी कमी प्यायले जात असल्याने कोठा जड होतो आणि पोट साफ होण्यात अडचणी निर्माण होतात. एखादवेळी बद्धकोष्ठतेचा त्रास होणं ठिक आहे (Easy Exercise to get rid from constipation problem by fitness expert anshuka parwani).
पण पोट साफ होण्यासाठी सतत जोर द्यावा लागत असेल किंवा सलग २ दिवस पोट साफच होत नसेल तर हे आरोग्यासाठी अजिबात चांगले नाही. कॉन्स्टीपेशन झाले की काही जण मनानेच लॅक्झेटीव्ह औषधे घेतात. पण या औषधांची एकदा सवय लागली की नैसर्गिकपणे पोट साफ होण्यात अडचणी येतात. त्यापेक्षा आपल्या जीवनशैलीत बदल करणे केव्हाही जास्त सोयीचे असते. उत्तम आहार-विहार आणि नियमित व्यायाम यामुळे आरोग्याच्या समस्या दूर राहण्यास मदत होते. प्रसिद्ध सेलिब्रिटी फिटनेसतज्ज्ञ अंशुका परवानी पोट साफ होण्यासाठी १ सोपा व्यायामप्रकार सांगतात. तो नियमित केल्यास बद्धकोष्ठतेच्या त्रासापासून सुटका होण्यास मदत होते. पाहूयात हा व्यायामप्रकार कोणता आणि तो कसा करायचा...
कोणता व्यायाम, कसा करायचा?
मालासन हा योगासनातील अतिशय सोपा प्रकार आहे. भारतीय शौचालयात ज्याप्रमाणे दोन्ही पायावर बसतो त्याचप्रकारे या आसनात बसायचे असते. या आसनामुळे पोटावर काही प्रमाणात दाब येतो आणि पोट साफ होण्यास मदत होते. साधारण २ ते ३ मिनीटे नियमितपणे हे आसन करायचे. पण इतकेच करुन उपयोग नाही. तर याच स्थितीत बसून कोमट पाणी प्यायचे. त्यामुळे जड झालेला कोठा मोकळा होण्यास जास्त सोपे होते. याबरोबरच पोटात गॅसेस साठले असल्यास तेही मोकळे होण्यास मदत होते आणि पोटही साफ होते.