अंगावरुन पांढरे जाणे किंवा व्हाईट डिस्चार्ज ही बहुतांश महिलांसाठी एक महत्त्वाची समस्या असते. काही वेळा व्हाईट डिस्चार्ज होणे नॉर्मल असते पण हा डिस्चार्ज जास्त प्रमाणात झाला तर मात्र ते धोक्याचे लक्षण असू शकते. व्हाईट डिस्चार्जला शास्त्रीय भाषेत ल्युकोरिया (Leucorrhoea) असे म्हणतात. मासिक पाळीच्या काही दिवस आधी ठराविक प्रमाणात व्हाईट डिस्चार्ज होणे नॉर्मल आहे. मात्र पाळीच्या नंतर किंवा एरवीही जास्त प्रमाणात अशाप्रकारचा व्हाईट डिस्चार्ज होत असेल किंवा त्याचा रंग वेगळा असेल, वास येत असेल तर त्याकडे लक्ष द्यायला हवं (Easy Home Remedies for White Discharge leucorrhoea).
आता व्हाईट डिस्चार्ज होण्यामागे नेमकी काय कारणं असतात? तर मासिक पाळी सुरु होण्याच्या आधीचा काळ, शरीर संबंधांच्या वेळी उत्तेजना सर्वात जास्त असताना, ताणतणाव असतील तर, यौवन काळात आणि गरोदर असताना अशाप्रकारे अंगावरून पांढरे पाणी जाते. असे झाले तर वेळीच डॉक्टरांचा योग्य तो सल्ला घ्यायला हवा. हा डिस्चार्ज झालेला बऱ्याचदा आपल्याला कळतो तर काही वेळा कळतही नाही. मात्र यामुळे आतले कपडे ओले होणे, वास येणे, अस्वच्छ वाटणे अशा समस्या निर्माण होतात. व्हाईट डिस्चार्जमुळे पाठदुखी, मूड स्विंग्ज, कॅल्शियमची कमतरता अशा तक्रारी निर्माण होतात.
डॉ. विनोद शर्मा यांच्यानुसार अशाप्रकारे डिस्चार्ज होणे अतिशय सामान्य असते तर काही वेळा चिंतेचीही बाब असू शकते. प्रायव्हेट पार्टची अस्वच्छता, कॉपर टी वापरणाऱ्या महिला, जास्त तेलकट, मसालेदार खाणाऱ्या महिला, डायबिटीस असणाऱ्या, यूरीन इन्फेक्शन, प्रतिकारशक्ती कमी असणाऱ्या, तणावात असणाऱ्या महिलांमध्ये हा त्रासा जास्त प्रमाणात आढळून येतो. अनेकदा आपण अशा लहानमोठ्या समस्यांसाठी डॉक्टरांकडे धाव घेतो. मात्र असे करण्यापेक्षा घरच्या घरी काही सोपे उपाय केल्यास त्याचा निश्चितच फायदा होतो. पाहूया हे उपाय कोणते...
१. केळं
पिकलेले केळे खाणे हा व्हाईट डिस्चार्ज कमी करण्यासाठी एक सर्वोत्तम मार्ग आहे. सकाळ-संध्याकाळ साखरेसोबत केळं खाल्ल्यास फायदा होतो. तसेच अर्धा ग्लास दूध, अर्धा चमचा तूप आणि पिकलेलं केळं फायदेशीर असतं.
२. आवळा
आवळ्याची पेस्ट किंवा पूड घेऊन त्यात मध घालून घेतल्यास फायदा होतो. १ ग्लास पाण्यात १ चमचा आवळा पावडर घालून ते अर्धे होईपर्यंत उकळायचे. गार झाल्यावर मध घालून प्यायचे.
३. अंजीर
अंजीर फळ किंवा ड्राय अंजीर खाणे हा व्हाईट डिस्चार्जवरील एक सर्वोत्तम उपाय आहे. रात्रभर पाण्यात ४ सुके अंजीर भिजवून सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी ते खाल्ल्यास ही समस्या दूर होते.
४. मेथ्या
मेथीचे दाणे हा पांढरं जाणं कमी व्हावं यासाठीचा एक उत्तम उपाय आहे. १ लीटर पाण्यात ३ चमचे मेथीचे दाणे घालून ते उकळावे आणि गार झाल्यावर मिक्सरमध्ये बारीक करुन प्यावे.
५. धणे
२ चमचे धणे १ ग्लास पाण्यात घालून चांगले उकळावे. पाणी अर्धे झाल्यावर गॅस बंद करावा आणि सकाळ संध्याकाळ हे पाणी प्यावे. साधआरणपणे १ आठवडा हा उपाय केल्यावर निश्चितच आराम मिळण्यास मदत होईल.