ॲसिडीटी म्हणजे अगदी नको नको करणारी समस्या. एकदा ॲसिडीटी झाली की पोटात आणि छातीत होणारी जळजळ आणि मळमळ त्रासदायक असते. पावसाळ्याच्या दिवसांत आपली पचनशक्ती क्षीण होते आणि खाल्लेलं अन्न नीट पचत नाही. बैठी जीवनशैली, व्यायामाचा अभाव यांमुळे अन्न योग्य पद्धतीने पचत नाही. न पचलेले अन्न शरीर एकतर बाहेर टाकते किंवा ते शरीरात एकप्रकारे कुजते. खाल्लेल्या अन्नाचे योग्य पद्धतीने पचन झाले नाही तर अपचनाच्या तक्रारी उद्भवतात. कधी सतत येणारे ढेकर तर कधी गॅसेस आपला पिच्छा पुरवतात. कधी भूक लागल्यावर खाल्लं नाही तर किंवा कधी भुकेपेक्षा ४ घास जास्त खाल्ले तरी अॅसिडीटी होते (Easy Home Remedy For Acidity Problem) .
काही वेळा झोप झाली नाही किंवा रुटीनमध्ये काही बदल झाला तर त्याचा परीणाम लगेचच आपल्या पचनसंस्थेवर होतो आणि आपल्याला खूप जास्त प्रमाणात ॲसिडीटी होते. कधी काही घरगुती उपाय करुन तर कधी आपल्याला माहित असलेली औषधे घेऊन यावर आराम मिळवला जातो. ॲसिडीटीचा त्रास झाल्यावर छातीत जळजळणे, डोकेदुखी, मळमळ होऊन उलटीसारखे होणे अशा तक्रारी निर्माण होतात. एकदा ॲसिडीटी आणि गॅसेसचा त्रास झाला की आपल्याला काही सुधरत नाही. या ॲसिडीटीवर औषधे घेण्यापेक्षा घरच्या घरी करता येतील असे सोपे उपाय आपण पाहणार आहोत.
१. तुळशीची पाने
सकाळी उठल्यावप ५ तुळशीची पाने कोमट पाण्यासोबत रिकाम्या पोटी घ्यावीत. यामुळे आपण जे अन्न खाऊ ते आपल्याला अगदी सहज पचण्यास मदत होईल. यामुळे ॲसिडीटीचा त्रास कुठच्या कुठे पळून जाण्यास मदत होईल.
२. विलायची
रोज रात्री झोपताना न चुकता २ विलायची आवर्जून खायला हव्यात. यासोबत कोमट पाणी प्यावे यामुळे दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर अजिबात ॲसिडीटी होणार नाही. विलायची घरात अगदी सहज उपलब्ध असणारा पदार्थ असल्याने हा उपाय आपण अगदी सहज करु शकतो.
३. ताक
ताकात पुदीन्याची पाने घालून ते प्यावे. तसेच हे ताक नाश्ता झाल्यावर घ्यावे म्हणजे त्याचा जास्त चांगला फायदा होतो. यामुळे दिवसभर भेडसावणारी ॲसिडीटीची समस्या नियंत्रणात येण्यास मदत होते. तसेच ताक पिण्याचे आरोग्याला इतरही अनेक फायदे असतात.
४. गूळ
अनेकांना जाता-येतो गुळाचा खडा तोंडात टाकण्याची सवय असते. प्रत्येक खाण्यानंतर पाव इंच गुळाचा तुकडा तोंडात टाकणे आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असते. यामुळे आपल्याला ॲसिडीटीचा त्रास अजिबात भेडसावणार नाही.