ॲसिडीटी ही अनेकांना नियमितपणे सतावणारी समस्या आहे. ॲसिडीटीमुळे कधी डोके जड होणे, छातीत जळजळणे, उलट्या होणे अशा समस्या उद्भवतात. कधी कधी ॲसिडीटी इतकी जास्त होते की डोकं ठणकतं आणि अस्वस्थ होऊन उलट्या होऊन ती बाहेर पडते. जागरण, आहाराच्या चुकीच्या पद्धती, ताणतणाव, अपचन, व्यायामाचा अभाव यांमुळे ॲसिडीटी होते. काही जणांची प्रकृतीच पित्ताची असते असे म्हटले जाते (Easy Home Remedy For Acidity Problem).
ॲसिडीटी झाली की काहीच सुधरत नाही मग आपण जेलोसिल, पॅन डी यांसारखी औषधे घेतो. एखादवेळी अशी औषधे घेणे ठिक असते, मात्र सातत्याने अशी औषधे घेतल्यास आरोग्याच्या विविध तक्रारी निर्माण होतात. अशावेळी ॲसिडीटी होऊ नये म्हणून घरच्या घरी काही उपाय केले तर? प्रसिद्ध आयुर्वेदतज्ज्ञ डॉ. दिक्षा भावसार काही सोपे उपाय सांगतात. सलग ३ महिने हे उपाय केल्यास ॲसिडीटी कमी होते, आणि आराम मिळण्यास मदत होते. मायग्रेन, पोटाचे त्रास, हार्मोन्सचे असंतुलन पाहूयात घरच्या घरी करता येतील असे हे सोपे उपाय नेमके कसे करायचे.
१. धण्याचा चहा
१ ग्लास पाण्यात १ चमचा धणे घालायचे. यामध्ये ५ पुदीन्याची पाने आणि १५ कडीपत्त्याची पाने घालायची. हे सगळे मिश्रण ५ मिनीटे गॅसवर चांगले उकळायचे. त्यानंतर हे मिश्रण गाळायचे आणि सकाळी झोपेतून उठल्या, उठल्या चहा घेतो त्याप्रमाणे चहाऐवजी घ्यायचे.
२. बडीशोप
आपण हॉटेलमध्ये गेलो की आवर्जून जेवणानंतर बडीशोप खातो. पण घरात आपण ती खातोच असे नाही. पण प्रत्येक जेवणानंतर बडीशोप खाणे आरोग्यासाठी अतिशय चांगले असते. त्यामुळे अॅसिडीटी बऱ्याच प्रमाणात कमी होते.
३. रोज टी
१ कप पाणी घ्यायचे ते ३ मिनीटे चांगले उकळायचे आणि त्यात गुलाबाची वाळलेली पाने घालून पुन्हा काही वेळ उकळायचे. दररोज झोपण्याआधी अर्धा तास हे पाणी प्यायचे.