Join us   

मुलांना सर्दी-खोकला झालाय? करा आजीच्या बटव्यातील सोपा उपाय...सर्दी होईल गायब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2023 10:02 AM

Easy Home Remedy For Cold and Cough : सर्दी-कफापासून आराम मिळण्यासाठी झटपट होणारा सोपा उपाय...

ठळक मुद्दे औषधं घेण्याआधी घरच्या घरी सोपे उपाय करणे महत्त्वाचे घरात सहज उपलब्ध असणाऱ्या पदार्थांपासून करता येईल असा सोपा उपाय

थंडीच्या दिवसांत किंवा एरवीही सर्दी-कफ होणे ही अतिशय सामान्य समस्या आहे. लहान मुलं वातावरणात असणाऱ्या विविध प्रकारच्या जीवाणूंशी लढा देत असल्याने त्यांना ठराविक काळाने सर्दी-कफ, ताप यांसारख्या तक्रारींचा सामना करावा लागतो. आता सर्दी किंवा कफ झाला की लहान मुले हैराण होतात. कधी त्यांचे नाक गळते तर कधी नीट श्वास घेता येत नसल्याने त्यांना अस्वस्थ होते. अनेकदा सर्दी आणि कफ असला की मुलं मलूल होतात, जेवण जात नाही. यामुळे घरात असणारा लहानग्यांचा दंगा एकदम कमी होतो. सर्दी-कफाने वैतागलेली मुलं मग अनेकदा कुरबूर करतात आणि सतत आईला चिकटून बसतात. खोकला झाला की तर मुलं फारच हैराण होतात (Easy Home Remedy For Cold and Cough). 

अशावेळी मुलांना लगेच डॉक्टरकडे नेण्यापेक्षा काही सोपे घरगुती उपाय करुन पाहणे केव्हाही चांगले. कारण औषधांची जास्त प्रमाणात सवय लागणे चांगले नसते. सतत औषधे घेतली तर आपल्या शरीराची नैसर्गिक प्रतिकारशक्ती कमी होते. पूर्वी घरात आजी असल्याने ती घरात कोणाला काही झाले तर झटपट काहीतरी उपाय करायची आणि मुलांचे आजारपण कुठच्या कुठे पळून जायचे. पण आता विभक्त कुटुंब पद्धतीमुळे अनेक घरांत आजी असतेच असे नाही. म्हणूनच आज आपण आजीच्या बटव्यातील एक खास उपाय पाहणार आहोत. प्रसिद्ध शेफ पूनम देवनानी यांनी हा घरगुती उपाय सांगितला असून सर्दी-कफापासून आराम मिळण्यास त्याचा अतिशय चांगला उपयोग होतो. 

(Image : Google)

कसा करायचा हा उपाय ?

१. २० काळी मिरी आणि १० लवंगा पॅनमध्ये चांगल्या भाजून घ्यायच्या. 

२. त्यानंतर त्या खलबत्त्यामध्ये कुटून त्याची बारीक पूड करायची. 

३. आलं किसून घ्यायचं आणि सुती कपड्यातून त्याचा रस काढायचा.

४. हा आल्याचा रस मधात घालायचा आणि त्यात चिमुटभर मीठ आणि चिमुटभर हळद घालायची. 

५. या मिश्रणात मिरं आणि लवंगांची कुटलेली पावडर घालायची आणि सगळे चांगले एकजीव करायचे.      

६. दिवसातून २ वेळा हे चाटण अर्धा चमचा घ्यायचं. यामुळे शरीराला उष्णता मिळून सर्दी-कफ आणि खोकला कमी होण्यास मदत होते. 

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सथंडीत त्वचेची काळजीपालकत्व