Join us   

ऐन दिवाळीत मुलांना सर्दी-खोकला झाला? डॉक्टर सांगतात, घरीच करा १ सोपा उपाय, मिळेल झटपट आराम...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2023 12:33 PM

Easy Home Remedy for Cough and cold in changing season : ऐन सणावारात मुलं आजारी असली की घरातल्या सगळ्यांचाच मूड जातो आणि सणाचा आनंद लुटण्यावर बंधने येतात.

दिवाळी जवळ आली की थंडीची चाहूल लागते. मग या गुलाबी थंडीत पहाटे उठून अभ्यंग स्नान आणि नवीन कपडे घालून फराळाचा आस्वाद घेण्याची परंपरा पाळली जाते. मात्र गेल्या काही वर्षांपासून दिवाळीत थंडी गायब होत असल्याचे दिसते. यंदा तर दिवाळी ऐन तोंडावर आलेली असताना महाराष्ट्राच्या काही भागात पावसाने हजेरी लावली आहे. नोव्हेंबर महिन्याचा मध्य आलेला असताना अशावेळी अचानक वाढलेला उकाडा आणि त्यात पावसाळी दमट हवा यामुळे थंडी कुठच्या कुठे पळाल्याचे चित्र आहे (Easy Home Remedy for Cough and cold in changing season). 

गेल्या काही वर्षात हवामानात सातत्याने होणारे हे बदल आपल्या आरोग्यावरही परीणाम करत असतात. सतत हवा बदलली की त्याचा शरीरावर परीणाम होतो आणि आजारपणांचे प्रमाण वाढते. लहान मुलांची प्रतिकारशक्ती तयार होत असल्याने त्यांच्यामध्ये सर्दी, खोकला, कफ, ताप यांसारख्या तक्रारी वारंवार भेडसावताना दिसतात. ऐन सणावारात मुलं आजारी असली की घरातल्या सगळ्यांचाच मूड जातो आणि सणाचा आनंद लुटण्यावर बंधने येतात. हवाबदलामुळे उद्भवणाऱ्या या तक्रारींवर उपाय म्हणून नेमके काय करायचे याबाबत डॉ. प्रियांका त्रिवेदी काही महत्त्वाचे उपाय सांगतात, हे उपाय कोणते आणि ते कसे करायचे पाहूया...

उपाय काय? 

पायांच्या तळव्यांना तेल चोळणं हा उपाय केवळ थंडीत शरीर गरम राखण्यासाठी करतात हा गैरसमज आहे. उन्हाळ्यातल्या रात्रीही पायांच्या तळव्यांना तेलाचा मसाज आवश्यक असतो. पाय हा आपल्या शरीराचा भार पेलणारा मुख्य अवयव असल्याने त्याची विशेष काळजी घ्यायला हवी. पायांच्या तळव्यांना मसाज केल्यास शारीरिक आरोग्यासोबतच मानसिक आरोग्यासही फायदे होतात. पायाला मसाज केल्याने रक्तप्रवाह सुधारतो, थकवा कमी होतो, शांत झोप येते हे फायदे आपल्याला माहित असतात. पण पायांना विशिष्ट तेलाने मालिश केल्यामुळे सर्दी-कफाची समस्या दूर होण्यासही चांगलीच मदत होते. यासाठी नेमके कोणते तेल वापरायचे ते समजून घेऊया...

तेल तयार करण्याची पद्धत...

साधारण अर्धी ते पाऊण वाटी मोहरीचं तेल घ्यायचं. यामध्ये लसणाच्या बारीक कापलेल्या ५ पाकळ्या आणि १ चमचा ओवा घालावा. त्यानंतर हे तेल साधारण ५ ते १० मिनीटे चांगले गरम करायचे. गरम केल्याने लसूण आणि ओव्याचा अर्क या तेलामध्ये उतरण्यास मदत होईल. त्यानंतर तेल गार झाल्यावर गाळून ठेवायचे. रात्री झोपताना हे तेल पुन्हा थोडे कोमट करुन घेऊन पायांना आणि लहान मुलांच्या छातीला लावायचे. यामुळे सर्दी आणि कफ त्वरीत कमी होण्यास मदत होईल. त्यामुळे तुम्हाला किंवा मुलांना सर्दी-कफ झाला असेल तर घरच्या घरी करता येणारा हा सोपा उपाय नक्की करुन पाहा...

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सपालकत्वहोम रेमेडी