Join us   

मुलांना सर्दी-खोकला झाला की कमीच होत नाही? जुन्या खोकल्यासाठी डॉक्टर सांगतात १ सोपा उपाय...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 02, 2023 6:17 PM

Easy Home Remedy for Cough and Cold of child : लहान मुलांना त्यांना नेमकं काय होतं हे सांगताही येत नाही आणि काही करताही येत नाही.

हवेत बदल झाला, गार किंवा आंबट काही खाण्यात आलं की लहान मुलांना लगेचच खोकला होतो. बऱ्याच काहीवेळा हा खोकला झाला की काही दिवसांत बरा होतो पण काहीवेळा हा खोकला खूप दिवस टिकतो आणि कितीही उपाय केले तरी बराच होत नाही. कधी हा खोकला कफाचा असतो तर कधी कोरडा असतो. आडवं झालं की ढास लागते आणि झोपमोड होते. अशावेळी खोकून खोकून मुलं बेजार होतात आणि मग त्यांची छाती, बरगड्याही दुखायला लागतात. लहान मुलांना त्यांना नेमकं काय होतं हे सांगताही येत नाही आणि काही करताही येत नाही (Easy Home Remedy for Cough and Cold of child). 

(Image : Google )

सर्दी, कफ आणि खोकला झाला की अशावेळी मुलं मलूल होतात. अनेकदा त्यांचा आहार कमी होतो, झोपही नीट होत नाही. कफाने श्वास घेता येत नसल्याने त्यांची चिडचिड होते आणि झोपमोड होते ती वेगळीच. मूल आजारी पडलं की सगळ्या घराचं लक्ष त्यांच्याकडे लागून राहतं आणि हसरं-खेळतं मूल पुन्हा कधी बागडायला लागणार असा प्रश्न पालकांना पडतो. पालक म्हणून आपण अशावेळी काही घरगुती उपाय करतो, डॉक्टरांकडे जाऊन औषधेही आणतो मात्र त्याचा हवा तसा उपयोग नाही झाला तर काय करावे ते आपल्यालाही कळत नाही. असा बरेच दिवस टिकणारा खोकला झाला असेल आणि बराच होत नसेल तर वैद्य मिहीर खत्री यासाठी एक सोपा उपाय सांगतात. हा उपाय कोणता आणि तो कसा करायचा पाहूया...

उपाय काय?

आपण खातो ती ७ विड्याची पानं घ्यायची आणि ती कुटून त्याचा रस काढायचा. यात पाणी अजिबात घालू नये. यामध्ये १० थेंब आल्याचा रस घालायचा. तसेच यामध्ये २ लवंग कुटून घालायचे. हे सगळे चांगले एकजीव करायचे आणि हे मिश्रण मुलांना भरवायचे. हे सगळे एकत्र केल्यावर मुलांना तिखट लागत असेल तर त्यामध्ये थोडासा मध घालायचा. रिकाम्या पोटी दिवसातून २ वेळा हे मिश्रण मुलांना दिल्यास मुलांचा छातीतील गळ्यातील कफ निघून जाण्यास मदत होईल. तसेच बरेच दिवस राहीलेला खोकला असेल तर तोही बरा होण्यास याची चांगली मदत होईल. साधारण ४ वर्षे वयाच्या मुलांसाठी वरील मोजमाप दिलेले असून २ ते ४ वर्षे वयोगटातील मुलांसाठी याच्या अर्धे माप घ्यायला हवे. मोठ्यांसाठीही दुप्पट प्रमाणात वरील जिन्नसांचे माप घेऊन करावे.   

 

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सपालकत्वहोम रेमेडी