Join us   

पावसाळ्यात अपचन, ॲसिडीटी होते? खाल्लेलं नीट पचावं तर करा १ सोपा उपाय, मिळेल आराम…

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2023 2:48 PM

Easy Home Remedy for Digestion Problems : पोट ठिक तर तब्येत ठिक, म्हणून आरोग्याची योग्य ती काळजी घ्यायला हवी...

पावसाळ्याच्या दिवसांत आपली पचनशक्ती क्षीण होते आणि खाल्लेलं अन्न नीट पचत नाही. कधी अॅसिडीटी होते तर कधी अपचनामुळे पोटाच्या समस्या निर्माण होतात. मात्र पोटा खराब असेल तर तब्येत खराब व्हायला वेळ लागत नाही. म्हणूनच पचनाच्या तक्रारी दूर व्हाव्यात यासाठी आहारात योग्य ते बदल करणे, आरोग्याची योग्य पद्धतीने काळजी घेणे आवश्यक असते. आपण खात असलेल्या अन्नातून शरीराला पुरेशी ऊर्जा मिळत नसेल तर त्यामुळे आरोग्याच्या कित्येक तक्रारी निर्माण होतात. पचन नीट झाले नाही तर शरीरावर चरबी जमा व्हायला लागते आणि वजन वाढण्याची शक्यता असते (Easy Home Remedy for Digestion Problems). 

पावसाळ्यात अपचन, गॅसेस, बद्धकोष्ठता किंवा अॅसिडीटी असे काही ना काही उद्भवते. असे झाले की आपण लगेचच डॉक्टरांकडे धाव घेतो. मात्र ते होऊ नये यासाठी काय करायला हवे याबाबत आयुर्वेदतज्ज्ञ डॉ. दीक्षा भावसार एक सोपा आणि महत्त्वपूर्ण उपाय सांगतात. आपण पावसाळ्यात गारवा असल्याने सतत चहा पितो. मात्र नेहमीचा चहा पिण्यापेक्षा थोडा वेगळ्या पद्धतीचा आयुर्वेदिक चहा घेतला तर त्याचा पोटाच्या समस्या दूर होण्यासाठी अतिशय चांगला उपयोग होतो. हा चहा करण्यासाठी कोणते घटक आवश्यक असतात आणि तो हा उपाय कोणता आणि तो कसा करायचा पाहूया...

साहित्य -

१. हिंग - पाव चमचा (तूपात भिजवलेला)

२. सैंधव मीठ - पाव चमचा 

३. जीरे पूड - अर्धा चमचा 

४. पाणी - अंदाजे ३०० मिलीलीटर 

कृती - 

१. एका पातेल्यात पाणी घेऊन त्यात हिंग, सैंधव मीठ, जीरे पूड घाला.

२. साधारण ५ मिनीटे हे पाणी चांगले उकळून घ्या.

३. अजिबात न गाळता हे पाणी प्या त्यामुळे पचनक्रिया सुधारण्यास मदत होईल. 

४. हा आयुर्वेदिक चहा प्यायल्याने वात, गॅसेस, पोटावरील सूज कमी होण्यास निश्चितच मदत होईल.

याशिवाय पावसाळ्यात हलका आणि सहज पचेल असा आहार घेणे अतिशय गरजेचे असल्याने आहाराकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे.   

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्समोसमी पाऊसपावसाळा आणि पावसाळी आजारपण