Join us   

गॅसेस, ॲसिडीटी, अपचनामुळे हैराण आहात? तज्ज्ञ सांगतात १ सोपा उपाय, पचनाच्या तक्रारी होतील दूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2023 9:48 AM

Easy Home Remedy For Indigestion Problem : घरच्या घरी करता येईल असा झटपट पारंपरिक उपाय...

आपल्यापैकी अनेकांना सतत गॅसेस, अपचन, बद्धकोष्ठता किंवा अॅसिडीटी अशा काही ना काही समस्या उद्भवतात. पचनक्रिया सुरळीत नसल्याने हे त्रास होतात. हे त्रास कमी प्रमाणात असतील तर ठिक आहे पण त्यांचे प्रमाण जास्त असेल तर मात्र आपल्याला त्यावर वेळीच योग्य ते उपाय करावे लागतात. सतत बैठं काम, व्यायामाचा अभाव, खाण्या-पिण्याच्या चुकीच्या पद्धती यांमुळे अपचनाचे त्रास होतात. कधी कधी हा त्रास इतका वाढतो की डॉक्टरकडे जाण्याशिवाय पर्याय राहत नाही. अनेकदा आपण घरच्या घरीही काही उपाय करतो मात्र त्याचा म्हणावा तसा उपयोग होतोच असे नाही (Easy Home Remedy For Indigestion Problem). 

खाल्लेले अन्न योग्य पद्धतीने न पचल्याने किंवा आवश्यकतेपेक्षा जास्त प्रमाणात खाल्ल्यास, तेलकट, मसालेदार पदार्थांचे सेवन जास्त केल्यास पचनाच्या तक्रारी उद्भवतात. यासाठी आपला आहार-विहार उत्तम असणे आवश्यक असते. अॅसिडीटी आणि बद्धकोष्ठतेसारख्या तक्रारी वेळेत बऱ्या होणे आवश्यक असते. यासाठी घरच्या घरी करता येईल असा १ सोपा उपाय प्रसिद्ध आहारतज्ज्ञ मोहिता आपल्याशी शेअर करतात, तो कोणता आणि कसा करायचा पाहूया...

उपाय कसा करायचा? 

१ लीटर पाण्यात १ चमचा ओवा आणि १ चमचा बडीशोप घालायची. हे पाणी झाकण ठेवून जवळपास अर्धा लीटर होईपर्यंत चांगले उकळायचे. मध्यम आचेवर हे पाणी उकळण्यासाठी साधारण १५ ते २० मिनीटे लागतात. मग हे पाणी गाळायचे आणि चहा पितो त्याप्रमाणे प्यायचे. दिवसातून २ ते ३ वेळा हा चहा गरम करुन प्यायचा. यामुळे पचनक्रिया सुरळीत होण्यास मदत होते. ओवा आणि बडीशोप दोन्हीही पचनासाठी उपयुक्त घटक असल्याने या तक्रारी दूर होण्यास त्यांचा चांगला उपयोग होतो.

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सलाइफस्टाइल