थंडीच्या दिवसांत उद्भवणाऱ्या आरोग्याच्या समस्या म्हणजे सर्दी, खोकला, कफ. या गोष्टींवर वेळीच उपाययोजना केल्या नाहीत तर हा त्रास वाढतो आणि मग ताप येणे, डोकेदुखी यांसारख्या समस्या निर्माण होतात. कालांतराने हा त्रास असह्य व्हायला लागतो आणि मग डॉक्टरांकडे जाण्याशिवाय पर्याय राहत नाही. लगेचच औषधे घेण्यापेक्षा घरच्या घरी काही सोपे उपाय केल्यास त्याचा निश्चितच चांगला फायदा होतो. सर्दी-कफावर आजीच्या बटव्यातील अनेक उपाय आपल्याला माहित असतात. पण आज आपण यातला थोडा वेगळा उपाय पाहणार आहोत. हा उपाय म्हणजे ओल्या हळदीचा. थंडीच्या दिवसांत बाजारात मिळणारी ही ओली हळद खोकल्यावर अतिशय गुणकारी असते (Easy Home remedy of raw turmeric for cough and cold).
ओल्या हळदीमध्ये सूज येण्याला प्रतिबंध करणारे गुणधर्म असतात. अँटीव्हायरस, अँटीबॅक्टेरीयल आणि अँटीसेप्टीक गुणधर्मांमुळे हळद नेहमीच आरोग्याच्या समस्यांवर उपयुक्त मानली जाते. त्यामुळेच खोकल्याचा संसर्ग रोखण्यासाठी हळद उपयुक्त ठरते. यामुळे प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. हळदीमध्ये असणारे करक्यूमिन या घटकामुळे हळदीला पिवळा रंग येतो. यातील अँटीइनफ्लमेटरी गुणधर्मांमुळे शरीरातील आग, सूज आणि दुखणे कमी होण्यास मदत होते.
खोकल्यावर आराम मिळण्यासाठी...
१. ओली हळद किसून घ्यावी आणि त्याचा रस काढावा. या रसात मध घालून हे मिश्रण चाटण म्हणून घ्यावे. दिवसातून २ वेळा हे चाटण घेतल्यास त्याचा निश्चितच चांगला फायदा होतो.
२. याशिवाय रात्री झोपताना ओली हळद दूधात उकळून घेतल्यास त्याचाही खोकल्यावर आराम मिळण्यास फायदा होतो.
३. ओल्या हळदीची पेस्ट करायची, त्यामध्ये अर्धा चमचा लसूण पेस्ट आणि एक चमचा गूळ घालून त्याचे मिश्रण तयार करायचे. खाण्याआधी हे मिश्रण गरम करायचे आणि खायचे.