दिवसभराच्या बैठ्या कामानी अनेकदा आपली पाठ अवघडते. लॅपटॉप किंवा कॉम्प्युटरवर काम असल्याने बसून काम करण्याशिवाय पर्याय नसतो. सकाळी लवकर उठून- आवरुन आपण जे कामाला सुरुवात करतो ते संध्याकाळ आणि रात्र कधी होते तेही कळत नाही. रात्री आपण पाठ टेकतो तेव्हाच काय तो पाठीला आराम मिळतो. महिलांच्या बाबतीत तर सकाळी उठल्यापासून ओट्यासमोर स्वयंपाकाची कामे, ऑफीसला जाण्यासाठी गाडीवर किंवा इतर कोणत्या वाहनाने प्रवास यांमुळे सतत बैठ्या नाहीतर उभ्या स्थितीत राहावे लागते (Easy Remedies for Back Pain).
कित्येकदा आपण पाठ न टेकवता किंवा अवघडल्यासारखे बसतो, कामाच्या नादात आपल्या हे लक्षातही येत नाही. पण जसा दिवस संपायला लागतो तशी आपल्याला पाठीला रग लागल्याचे लक्षात येते बसण्याची चुकीची पद्धत, खूप जास्त वेळ एकाच स्थितीत बसणे, व्यायामाचा अभाव यांमुळे पाठदुखीची समस्या उद्भवते. सुरुवातीला ही पाठदुखी कमी प्रमाणात असली तरी हळूहळू हे दुखणे वाढत जाते आणि त्याचा ताण आपला मणका, खांदे, हात, मांड्या, पाय यांच्यावर यायला लागतो. हळूहळू ही पाठदुखी इतकी वाढते की आपल्याला काहीच सुधरत नाही आणि डॉक्टरांकडे जाण्याची वेळ येते.
रोजची कामं, ऑफीसचं काम, प्रवास यांना तर पर्याय नसतो. व्यायाम करायचा असे ठरवूनही व्यायामाला वेळ होतोच असे नाही. अशावेळी पाठदुखी कमी करण्यासाठी बसल्या-बसल्या काही सोपे उपाय केल्यास त्याचा अतिशय चांगला उपयोग होऊ शकतो. प्रसिद्ध योग अभ्यासक जूही कपूर यांनी हे उपाय सुचवले आहेत. आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन त्यांनी याबाबतचा व्हिडिओ शेअर केला आहे.
१. खर्चीतून उठून थोडे पुढे सरकायचे. हात खुर्चीच्या पाठीपाशी ठेवायचे आणि कंबर वर उचलून उष्ट्रासन करतो त्याप्रमाणे करायचे. यामुळे पाठीचे स्ट्रेचिंग होते आणि खांदे, पायही बसून अवघडले असतील तर त्याचीही थोडी हालचाल होते. हे स्ट्रेचिंग २० सेकंदांसाठी करायचे.
२. एकदा कंबर वर उचलली की नंतर खाली वाकवायची. म्हणजे पाठ दोन्ही बाजूने स्ट्रेच होते आणि बराच वेळ बसून रग लागली असेल तर आराम मिळतो. खुर्चीत बसल्या बसल्या खाली वाकून पाय धरायचे. हेही आसन २० सेकंदांसाठी करायचे.
फायदे
१. पाठदुखी थांबण्यास मदत
२. खांदेदुखी कमी होते
३. पोश्चर सुधारण्यास फायदेशीर
४. खांदे ताणल्याने फुफ्फुसांची क्षमता वाढण्यासाठी आणि श्वासोच्छवासासाठी उपयुक्त
५. आत्मविश्वास वाढण्यास मदत