डॉ. पौर्णिमा काळे
आयुर्वेद आणि योगतज्ज्ञ
मानवी शरीर हे आहार, निद्रा व ब्रह्मचर्य या तीन प्रमुख उपस्तंभावर (main pillars of life) आधारित आहे. आयुर्वेदात सांगितल्याप्रमाणे निद्रा योग्य मात्रेत घेतल्यास सुख, पुष्टी, बल, वृषता (मैथुन शक्ती), ज्ञान व दीर्घ जीवन यांची प्राप्ती होते. त्यामुळे निद्रेला विशेष महत्व आहे. निद्रा ही आपल्या दिवसभर थकलेल्या पेशींना आराम देते आणि नवीन पेशी निर्मितीसाठी गरजेची आहे. आपण सध्या आधुनिक जीवनशैलीत जगत आहोत, जिथे ताणतणाव, चिंता आणि अस्वस्थता हे सामान्य बनले आहेत. यामुळे रात्री झोप न येणे किंवा अस्वस्थ झोप येणे ही समस्या आजच्या काळात जास्त प्रमाणात दिसून येत आहे. निद्रानाशामुळे शारीरिक व मानसिक स्वास्थ्यावर वाईट परिणाम होतो. त्यामुळे शांत झोप मिळवण्यासाठी काही उपाय करणे आवश्यक आहे. आता हे उपाय कोणते ते पाहूया (Easy remedies for better night sleep)...
एक प्रसिद्ध श्लोक असा आहे:
"निद्रायां चित्तशुद्ध्यर्थं, लभेत यत्र सुखं हि निःश्वासवर्जितं कर्तव्यम्।
तत्र वासयति प्राणान्, तत्र मृद्वन्युत्तमाः सुखाः।"
अर्थ: निद्रा आपल्या मनाची शुद्धी करण्यासाठी आवश्यक आहे. निद्रेमुळे आपले प्राण (ऊर्जा) स्थिर होतात आणि मनाला आराम मिळतो.
निद्रानाशाची कारणे
१. अयोग्य आहार
२. ताणतणाव
३. जीवनशैलीतील बदल
४. मोबाइल किंवा इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर
५. स्त्रियांमधील हॉर्मोन्सचे असंतुलन
६.वात प्रकोप
७. कफ क्षीणता
८. विशिष्ट औषधोपचार
पडल्या पडल्या शांत झोप लागण्यासाठी...
१. मेलाटोनिन या हॉर्मोनची निर्मिती होऊन आपल्याला झोप येते. आपल्या आजुबाजूला अंधार सेल तर पिनल ग्लांडच्या माध्यमातून या हॉर्मोनची निर्मिती चांगल्या रितीने होऊ शकते. म्हणून झोपेपूर्वी मोबाइल, लाईट, टीव्ही यांच्या उजेडापासून शक्यतो दूर राहावे. जेणेकरुन हे हॉर्मोन्स तयार होण्यास मदत होते आणि झोप येते.
२. आयुर्वेदामध्ये म्हशीचे दूध निद्रकर म्हटले आहे. हे कोमट दूध रात्री झोपताना हळद घालून घेतल्यास शांत झोप लागते.
३. जटामांसी चूर्ण पाण्यात भिजत ठेवून नंतर गाळून ते पाणी प्यायलास झोप सुधारते.
४. जायफळ झोप येण्यास अतिशय उपयुक्त असा मसाल्यातील पदार्थ आहे. दुधामध्ये जायफळ उगाळून घेतल्यास शांत झोप येण्यास मदत होते. तसेच जायफळाचा लेप झोपताना कपाळावर लावल्यानेही फायदा होतो.
५. काष्याच्या किंवा चांदीच्या वाटीने साजूक तूप तळपायाला चोळावे त्याने शांत झोप लागायला मदत होते.
६. डोळ्यांवर दुधाची पट्टी ठेवावी, त्याने डोळ्यातील जळजळ कमी होऊन झोप लगण्यास मदत होते.
७. रोज आंघोळी पूर्वी आयुर्वेदात अभ्यंग करायला सांगितले आहे, त्याने शरीरातील वात दोषाचे नियमन होऊन शांत झोप लागते.
८. निद्रानाशावर शिरोधारा हा आयुर्वेदातील एक उपयुक्त असा उपचार आहे.
९. योग शास्त्रातील प्राणायामाने ऑक्सिजनची पातळी वाढून पेशींचा थकवा कमी होतो आणि झोप येते. ताण तणाव कमी होण्यासाठी रोज १० मिनिटे अनुलोम विलोम आणि 9 वेळा भ्रामरी प्राणायाम आवर्तन करावे. यामुळे 21 दिवसात झोपेमध्ये चांगली सुधारणा झालेली दिसते.
१०. शास्त्रीय संगीतातील राग मालकंस, राग बागेश्वरी, राग पुरीया हे ऐल्यानंतरही शांत झोप येते.
११. सात्विक, हलका आहार हा प्राकृत निद्रा येण्यासाठी गरजेचा आहे. रात्रीचे जेवण लवकर केल्यामुळे पचन शक्तीचा ताण कमी होऊन प्राकृत दोषांची निर्मिती होते आणि झोप शांत लागते.