Join us   

काही केल्या रात्री शांत झोप येत नाही? १ सोपा उपाय, पडल्या पडल्या लागेल गाढ झोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2024 1:02 PM

Easy Remedy for good night sleep by fitness expert anshuka parwani : प्रसिद्ध सेलिब्रिटी फिटनेसतज्ज्ञ अंशुका परवानी सांगतात खास उपाय...

झोप ही आपल्या दैनंदिन व्यवहातली अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. आपलं आरोग्य उत्तम राहावं यासाठी आहार, व्यायाम, मानसिक स्वास्थ्य हे जसं गरजेचं असतं तसंच रात्रीची ७ ते ८ तासांची गाढ झोप होणंही तितकंच गरजेचं असतं. रात्री नीट शांत आणि सलग झोप झालेली असेल तरच आपला पुढचा दिवस चांगला जातो. नाहीतर दिवसभर आपल्याला आळस आणि थकवा येत राहतो. झोप न झाल्याने अॅसिडीटी, डोकेदुखी अशा काही ना काही समस्या उद्भवत राहतात. पडल्या पडल्या झोप लागणारे खऱ्या अर्थाने सुखी असतात असं म्हटलं जातं, पण सगळ्यांनाच ते सुख लाभतं असं नाही (Easy Remedy for good night sleep by fitness expert anshuka parwani). 

काही जणांना पाठ टेकल्यावर झोप येण्याची देणगी असते तर काहींना मात्र कितीही प्रयत्न केले तरी अजिबात झोप येत नाही. असं होण्यामागे बरीच कारणं असतात, यामध्ये आरोग्याच्या तक्रारी, मानसिक ताण, स्क्रीनचा अतिवापर, कामाचा ताण, कौटुंबिक जबाबदाऱ्या अशा बऱ्याच गोष्टींचा समावेश असतो. पण झोप पूर्ण झाली तरच मानसिक-शारीरिक आरोग्य चांगले राहते. तुम्हालाही शांत आणि गाढ झोप लागत नसेल तर त्यासाठी आज आपण एक सोपा उपाय पाहणार आहोत. प्रसिद्ध सेलिब्रिटी फिटनेसतज्ज्ञ अंशुका परवानी यांनी हा उपाय सांगितला असून तो करायला अतिशय सोपा आहे. पाहूयात हा उपाय कोणता आणि त्याचे झोप येण्यासाठी नेमके काय फायदे होतात. 

(Image : Google)

१. शक्ती मुद्रा हा योगामधील झोप येण्यासाठीचा अतिशय सोपा आणि चांगला उपाय आहे. 

२. हाताचा अंगठा तळव्यावर दुमडायचा, बाजुची पहिली २ बोटेही त्यावर दुमडून ठेवायची. 

३. दोन्ही हातांची करंगळी आणि त्याच्या बाजुचे बोट यांची टोके एकमेकांना जोडायचे. 

४. अशाप्रकारे जोडलेले हात बेंबीच्या जवळ ठेवायचे आणि डोळे मिटून श्वासावर लक्ष केंद्रित करायचे. 

५. ही मुद्रा दिवसातून ३ वेळा १२ मिनीटे केल्यास चांगल्या झोपेसाठी ती अतिशय फायदेशीर ठरते. 

फायदे 

१. शरीर शांत होण्यासाठी या मुद्रेचा चांगला उपयोग होतो. निद्रानाशाचा त्रास असणाऱ्यांसाठी ही मुद्रा उपयुक्त असून याने झोप येण्यास मदत होते. 

२. छातीच्या खालच्या भागात श्वसनाचा वेग वाढतो आणि त्यामुळे झोप येण्यास मदत होते. 

३. शरीर रिलॅक्स होण्यास मदत होते आणि मानसिक ताण कमी होतो. 

४. प्रतिकारशक्ती चांगली राहण्यास तसेच मायग्रेन आणि डोकेदुखी कमी होण्यास या मुद्रेचा फायदा होतो. 

५. मासिक पाळीत पोट जास्त दुखत असेल तर ते नियंत्रणात येण्यासही ही मुद्रा फायदेशीर ठरते. 

 

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सलाइफस्टाइल