आपला प्रत्येक दिवस खास असावा, रोज आपण आनंदी राहावं असं प्रत्येकाला वाटतं. यासाठी सकाळी उठल्यावर आपण फ्रेश आणि आनंदी असू तर आपला संपूर्ण दिवस चांगला जातो. अशावेळी सकाळी झोपेतून उठल्यावर आपली झोप पूर्ण झाली नसेल, आपल्या अंगात आळस भरला असेल तर आपल्याला फ्रेश वाटत नाही. अनेकदा झोप पूर्ण झाली तरी आपल्याला झोपेतून उठूच नये असं वाटतं. यामागे मानसिक ताणतणाव, आरोग्याच्या तक्रारी, अपुरी झोप अशी काही ना काही कारणे असू शकतात (Easy Tips For Fresh Morning).
मात्र सकाळी उठल्यावर एकदम फ्रेश आणि एनर्जेटीक वाटावे असे वाटत असेल तर काही गोष्टींकडे आवर्जून लक्ष द्यायला हवे. दिवसभर आपल्याला घरातली, बाहेरची, ऑफीसची इतकी कामं असतात की व्यायाम, ध्यान हे करण्यासाठी वेळ मिळतोच असे नाही. म्हणूनच सकाळी उठल्यावर फक्त ३ गोष्टी केल्यास सकाळ आणि दिवस एकदम फ्रेश जाऊ शकेल. प्रसिद्ध समुपदेशक आणि योग अभ्यासक गरीमा यांनी यासाठी काही सोपे उपाय सांगितले आहेत. हे उपाय नेमके काय आहेत आणि ते कसे करायला हवेत याविषयी...
१. सकाळी डोळे उघडल्यावर सगळ्यात आधी देवाचे आभार माना. आपल्या आयुष्यातला आणखी एक छान दिवस आपल्या समोर असल्याने आपण त्यासाठी देवाचे ऋणी असायला हवे, हे आभार ३ वेळा माना.
२. आपल्या शरीरातील कोणत्याही एका अवयवाची निवड करा आणि त्याचे आभार माना. दिवसभर शरीरातील विविध क्रिया उत्तमपणे पार पाडण्यासाठी हा अवयव आपल्याला मदत करत असल्याने त्याचे आपण जरुर आभार मानायला हवे.
३. झोपेतून उठल्या उठल्या किमान १५ मिनीटे फोनचा अजिबात वापर करु नका. कारण फोनमुळे सकाळी सकाळी विनाकारण तुम्ही अडकून पडाल किंवा नकारात्मक गोष्टी समोर आल्याने दिवसाची सुरुवात खराब होऊ शकते. हे सगळे उपाय किमान महिनाभर करुन पाहा, त्यानंतर तुम्हाला नक्की फरक दिसायला सुरुवात होईल.