आपले दात छान पांढरे शुभ्र असतील तर हसल्यावर किंवा बोलतानाही समोरच्याला छान वाटतं. पण हेच दात खूप पिवळे पडले असतील तर ते दिसायला तर खराब दिसतातच पण अशा दातांचा वासही येतो. आरोग्याच्यादृष्टीने आणि सौंदर्याच्या दृष्टीनेही हे फारसे चांगले नसते. आता दात पिवळे पडतात म्हणजे नेमकं काय होतं तर त्यावर एकप्रकारचा थर जमा होतो. वेळच्या वेळी दात घासले गेले नाहीत तर हा थर वाढत जातो आणि मग ते किडायला सुरुवात होते. ऑफीसमध्ये किंवा घरातही आपण सतत काही ना काही खातो नाहीतर चहा किंवा कॉफी पितो. पण ते झाल्यावर आपण तोंड धुतोच असे नाही. अशावेळी खाल्लेल्या अन्नाचे कण दातात राहून ते सडतात आणि दात किडायला सुरुवात होते. रात्री झोपताना मात्र आपण ब्रश करण्याचा कंटाळा करतो. त्यामुळे खाल्लेल्या अन्नाचे कण दातात अडकतात आणि दात किडतात. एकदा दातांचे दुखणे सुरू झाले की आपल्याला काहीच सुधरत नाही. कारण दातांचे दुखणे अनेकदा सहन न होणारे असते. तसेच यासाठी खर्चही बराच येत असल्याने खाल्ल्यानंतर वेळच्या वेळी दात घासणे केव्हाही फायदेशीर ठरते (Easy Tooth Whitening Tricks Natural home Remedies ).
१. कडुनिंबाची काडी
आयुर्वेदात टूथपेस्टपेक्षा कडुनिंबाची काडी दात घासण्यासाठी जास्त चांगली असते असे सांगण्यात आले आहे. कडुनिंबात किटाणूंशी लढण्यासाठी आवश्यक असणारी क्षमता असते. याशिवाय यात जीवाणू आणि रोगांचा प्रतिकार करणारे गुणधर्मही असतात. त्यामुळेच पूर्वीच्या काळी लोक दात घासण्यासाठी या काडीचा उपयोग करत असत. कडुनिंबाच्या काडीचा वापर करुन तोंडातील बॅक्टेरीया दूर ठेवण्यास मदत होते.
२. तिळाचं तेल
तिळाच्या तेलामुळे दातांवर जमा झालेला पिवळा थर दूर होण्यास मदत होते. दातांना लागलेली किड आदूर करण्यासाठीही तिळाच्या तेलाने गुळण्या करण्याचा फायदा होतो. अनेकदा आपण तोंडाचा वास येऊ नये आणि जात आणि हिरड्या स्वच्छ राहाव्यात यासाठी माऊथ वॉशचा वापर करतो. तिळाचे तेल त्याचप्रमाणे काम करत असल्याने त्याचा आवर्जून वापर करायला हवा.
३. बेकींग सोडा
१ चमचा बेकींग सोडा घेऊन त्यामध्ये थोडे पाणी घाला. हे मिश्रण हलवून त्याची पेस्ट तयार करा. टूथब्रश या पेस्टमध्ये बुडवून त्याने दात स्वच्छ घासा. ब्रश गालोकार फिरवल्यास दातांवर अडकलेले अन्नाचे कण निघून जाण्यास मदत होईल. यानंतर पाण्याने भरपूर चुळा भरा. एक दिवसाआड हा प्रयोग नक्की करायला हवा. तुम्ही दिवसातून दोन वेळा दात घासत असाल तर एकदा टुथपेस्टऐवजी बेकींग सोडा वापरा. यामुळे दातांचे किडीपासून संरक्षण होण्यास मदत होईल.
४. हायड्रोजन पॅरॉक्साइड
दातांवर चिकटलेला पिवळेपणा दूर करण्यासाठी हायड्रोजन पॅरॉक्साईड फायदेशीर ठरते. यासाठी हायड्रोजन पॅरॉक्साईड आणि पाणी सम प्रमाणात एकत्र करावे. हे मिश्रण किमान ३० सेकंद तोंडात तसेच ठेवून गुळण्या कराव्यात. आठवड्यातून किमान २ वेळा हा प्रयोग केल्यास दात स्वच्छ आणि पांढरेशुभ्र होण्यास मदत होते.