भात हा आपल्या जेवणातला महत्त्वाचा भाग आहे. भात खाल्ल्याशिवाय जेवण झाल्यासारखंच वाटत नाही. नुसतं जेवणाचा भाग म्हणून नाही तर जेवणाचं समाधान मिळवून देण्यात भाताचं महत्त्व खूप आहे. तसेच रोजच्या जेवणात भात असला तर जेवणाचा आनंद तर मिळतोच सोबतच भातात असलेल्या मॅग्नेशियम, सेलेनियम, फाॅस्फरस, मॅग्नीज आणि ब जीवनसत्त्व या पोषक घटकांचा फायदा शरीरास मिळतो. भात हा आनंद आणि आरोग्य याचा विचार करुन आहाराचा महत्त्वाचा भाग असला तरी जेवणात नुसता भात खाल्ल्याने किंवा इतर घटकांपेक्षा भाताचं प्रमाण जास्त असल्यास त्याचा आरोग्याला फायदा नाही तर तोटाच सहन करावा लागतो. वजन वाढण्यापासून ते कॅन्सर होण्यापर्यंत लहान ते गंभीर परिणाम अति भात खाल्ल्याने आरोग्यावर होतात.
Image: Google
भात खाण्याचे दुष्परिणाम
1. भात जर पौष्टिक असेल तर त्याचे दुष्परिणाम काय आणि कसे होवू शकतात, हा प्रश्न पडतो. त्यासाठी भातात असलेल्या पोषक घटकांसोबतच इतर घटकांचाही विचार होणं आवश्यक आहे. एक कप शिजवलेल्या भातात. 44.6 ग्रॅम कर्बोदकं असतात तर त्या तुलनेत प्रथिनांचं प्रमाण 4.25 ग्रॅम इतकं कमी असतं. कर्बोदकाचं प्रमाण जास्त असलेला कोणताही पदार्थ जास्त खाल्ला तर मधुमेह होण्याचा धोका निर्माण होतो. म्हणूनच अति प्रमाणात भात खाल्ल्याने मधुमेहाचा धोका वाढतो. भाताचा ग्लायसेमिक इंडेक्स हा 48-93 असा जास्त आहे. कर्बोदकाचं प्रमाण जास्त असलेला भात रक्तातील साखरेचं प्रमाण वाढवतो. कर्बोदकांचं प्रमाण जास्त असणं आणि फायबरचं प्रमाण तुलनेत फारच कमी असणं, यामुळे भात प्रमाणापेक्षा जास्त खाल्ल्यास मधुमेहाचा धोका वाढतो.
Image: Google
2. भात खाल्ल्याने पोट भरल्यासारखं वाटतं. जेवण झाल्याचं समाधान मिळतं. पण अनेकांना जेवण झाल्यानंतर पोट फुगल्यासारखं वाटतं. त्याचं कारण जेवणात अति प्रमाणात भात खाणे हे आहे असं फिजिशियन ताज भाटिला सांगतात. कर्बोदकांचं प्रमाण जास्त असल्याने भात खाल्ल्याने पोटात गॅस होण्याचं प्रमाण वाढतं. भातातील कर्बोदकांचं प्रमाण जास्त असल्यानं भात प्रमाणापेक्षा जास्त खाल्ल्यास पचनसंस्थेवर ताण पडतो. अपचन होणं, गॅसेसचा त्रास होणं, पोट बिघडणं हे त्रास होतात.
Image: Google
3. भातात आर्सेनिक हा विषारी समजला जाणारा घटक असतो. हातसडीच्या तांदळाच्या तुलनेत पाॅलिश्ड आणि पांढऱ्या भातात त्याचं प्रमाण जास्त असतं. अति प्रमाणात भात खाल्ल्याने आर्सेनिक शरीरात जास्त जातं. हा आर्सेनिक घटक कर्करोगाचा धोका वाढवतो. हा धोका कमी करायचा असल्यास अभ्यासक म्हणतात भात कमी खावा, प्रमाणात खावा, पाॅलिश्ड आणि पांढऱ्या भाताऐवजी हातसडीच्या तांदळाचा भात खावा. भात करताना तांदूळ लक्षपूर्वक धुवावे. एका वाटीस सहा वाटी पाणी टाकून भात केल्यास भातातील आर्सेनिकचा प्रभाव कमी होतो असं अभ्यासक सांगतात.
Image: Google
4. रोजच्या जेवणात मूठभर भात त्यालाच कोणी लिंबाएवढा भात असं म्हणतात, तेवढाच भात जेवणात असणं योग्य त्यापेक्षा जास्त भात खाल्ल्यास किंवा दोन्ही वेळेसच्या जेवणात संतुलित आहार टाळून केवळ भाताचं प्रमाण जास्त असल्यास वजन वाढतं.
5. भात नीट शिजवला नाही, तो अर्धा कच्चा राहिला आणि असा भात खात असल्यास मूतखड्याचा त्रास होतो.