Join us   

सतत खा खा, सतत भूक लागते, कितीही खा पोट भरल्यासारखं वाटतच नाही? कारण..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 2:19 PM

सारखी भूक लागणं हा आजार आहे, कारण आहे की परिणाम या शंकेचं शास्त्रीय उत्तर काय? सतत लागणारी भूक नियंत्रित करता येते? आहारतज्ज्ञ सांगतात कारणं आणि उपाय.

ठळक मुद्दे दिवसभर पुरेसं पाणी पिण्याकडे दुर्लक्ष झाल्यास सतत भूक लागल्याची जाणीव होते. खाण्यापिण्याच्या चुकीच्या वेळा सतत भूक निर्माण करतात.नाश्त्याला, दोन्ही वेळेसच्या जेवणात पौष्टिक पदार्थांना आणि समतोल आहाराला फाटा देऊन वेगळंच कही खाल्लं तर असे पदार्थ कितीही खाल्ले तरी सतत भूक लागते.

खाल्ल्यानंतरही थोडयाच वेळात पुन्हा खूप भूक लागते. घरात, ऑफिसमधे अगदी कुठेही असलं तरी भूक लागल्याची संवेदना होवून अस्वस्थ व्हायला होतं. कशातच लक्ष लागत नाही. अशी तक्रार अनेकजणी करतात. सारखी भूक लागण्यामागे काही आजारपण आहे का? अशीही भीती वाटून अनेकींना टेन्शन येतं. सारखी भूक हे लक्षण आहे की कारण की परिणाम याबाबत निर्माण होणार्‍या प्रश्नांवर उत्तर हे खात्रीशीर आणि तज्ज्ञांनी दिलेलंच हवं. दिल्लीच्या आहारतज्ज्ञ प्रियंका जयस्वाल यांनी सारखी भूक लागण्याची कारणं सांगितली आहेत तसेच ही नियंत्रणाबाहेर जाणारी भूक कशी नियंत्रित करायची याबाबतचे उपायही सांगितले आहेत.

छायाचित्र- गुगल

का लागते सारखी भूक?

1. आहारतज्ज्ञ प्रियंका म्हणतात की , भूक ही दोन पध्दतींची असते. एका प्रकारच्या भुकेत खाल्लेलं असतं, पण अगदीच जुजबी आणि निकस. त्यामुळे पोट भरत नाही. पोटात भूक शिल्लक राहाते आणि त्याची जाणीव लगेच होते.

2. भुकेचं दुसरं कारण म्हणजे धावपळीच्या जीवनशैलीत निर्माण झालेला असमतोल. कामाच्या घाईगडबडीत आहाराकडे हवं तसं लक्ष दिलं जात नाही. नुसता आहारच नाही तर पाणी पिण्याकडेही दुर्लक्ष केलं जातं. अनेक डॉक्टर सांगतात की आपल्या अनेक आजारांचं मूळ पुरेस पाणी न पिण्यात आहे. दुसरी गोष्ट म्हणजे घाई आहे म्हणून अनेकजणी सकाळचा नाश्ता टाळतात. निरोगी आरोग्यासाठी सकाळचा नाश्ता अत्यंत गरजेचा असतो. सकाळचा पोटभर नाश्ता, दुपारचं पौष्टिक जेवण आणि रात्री हलका फुलका पण पोषक पदार्थ असलेले पदार्थ हे तीन वेळाचं खाणं आवश्यकच आहे. ते जर नीट घेतलं तर सारखी भूक लागत नाही. पण यापैकी एक जरी चुकलं तरी पूर्ण दिवसाच्या खाण्यावर आणि खाण्यातून शरीराला मिळणार्‍या पोषणावर परिणाम होतो. जेवणाच्या वेळेत जेवण चुकवल्यास नंतर भूक भागवण्यासाठी काही बाही अनारोग्यकारक पदार्थ चटपटीत आणि चविष्टच्या नावाखाली खाल्ले जातात. अशा पदार्थांमुळे शरीरावर अनावश्यक चरबी वाढते. कमी खाऊनही वजन वाढण्याचं हे एक मुख्य कारण आहे. 

छायाचित्र- गुगल

3. खाण्यापिण्याच्या वेळा चुकवल्या तर त्याचाही परिणाम भूकेवर होतो. दुपाच्या जेवणाच्या वेळेस जेवण केलं नाही तर मग उरलेला दिवस सतत खा खा होते. सतत भूक लागू नये यासाठी आपण किती खातो, कोणत्या प्रकारचं अन्न खातो आणि केव्हा खातो या गोष्टींना खूप महत्त्व असतं. यातला ताळमेळ चुकला की सतत भूक लागल्यासारखं वाटतं आणि काहीबाही खाल्लं जातं.

4. नाश्त्याला, दोन्ही वेळेसच्या जेवणात पौष्टिक पदार्थांना आणि समतोल आहाराला फाटा देऊन वेगळंच कही खालं तर असे पदार्थ कितीही खाल्ले तरी सतत भूक लागते. आहारात जंक फूडचं प्रमाण वाढलेलं असलं तर सतत भूक लागून त्याचा परिणाम वजन वाढण्यावर होतो. त्यामुळे सकाळी पोटभरीचा नाश्ता, दुपारी व्यवस्थित पौष्टिक जेवण आणि रात्री हलका फुलका पौष्टक आहार महत्त्वाचा असतो. आहारतज्ज्ञांच्या मदतीने कधी काय आणि किती खावं हे समजून घेता येईल.

छायाचित्र- गुगल

सतत भूक लागू नये म्हणून..

आपल्या चुकीच्या सवयींमुळे आणि निकस आहार शैलीमुळे सतत भूक लागते हे समजून घेतल्यानंतर त्यासाठीची कारणं शोधून त्यावर उपाय केल्यानंतरही वजन कमी होत नसेल तर डॉक्टरांकडे जाऊन त्यांचा सल्ला घ्यायला हवा. आपल्या चुकीच्या सवयींमुळे सतत लागणारी भूक ही काही उपाय केल्यास नियंत्रणात येते.

1.  सतत भूक लागू नये यासाठी सकाळच्या नाश्त्याला अक्रोड खावेत. अक्रोड खाल्ल्यानं पुढे दिवसभर भूक कमी लागते. पोट सतत भरल्यासारखं राहातं. अक्रोडमधील गुणधर्म सतत भूक उत्पन्न करणार्‍या हार्मोन्सना दाबून ठेवतात. अक्रोडमधे फॅटस जास्त असतात त्यामुळे ते पचायलाही वेळ लागतो. त्यामुळे सतत भूक लागत नाही.

2.  कॉफी पिणं हाही यावरचा उत्तम उपाय आहे. कॉफी पिल्याने भूक कमी लागते. कॉफीमुळे पोट भरल्याची, समाधान झाल्याची संवेदना निर्माण होते. पण म्हणून सारखी कॉफी पित राहाणं चुकीचं आहे. भूक नियंत्रित करण्यासाठीचा उपाय म्हणून कॉफी एकदाच प्यावी.

3.  सकाळी नाश्त्याला एक सफरचंद खाणं हा ही सततच्या भूकेवरचा उपाय आहे. सफरचंदाच्या सालीत आर्सेनिक अँसिड भरपूर असतं. हे अँसिड भुकेवर नियंत्रण ठेवतं.

4.  पुदिन्याची पानं हाही सततच्या भुकेवर चांगला परिणाम करतात. पुदिन्याची चार पाच पानं दिवसातून दोन तीन वेळा चावून खावीत. तसेच पुदिन्याचा चहा दिेखील पितात.