Join us   

सगळं खाता, पण तरी इम्युनिटी वाढतच नाही? ४ चुका... एकदा तपासून पहा तुम्हीही नेमकं इथेच चुकता का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2022 4:28 PM

Reasons For Low Immunity: आपलं डाएट तर चांगलं आहे. फळं, सुकामेवा, सॅलाड असं सगळंच तर आपण खातो, पण तरीही रोगप्रतिकारक शक्ती का वाढत नाही, असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल तर या काही गोष्टी तुमच्याही चुकत आहेत का, हे एकदा तपासून पहा..

ठळक मुद्दे सगळं करूनही आपली रोगप्रतिकार शक्ती एवढी कमी का आहे? असा प्रश्न कित्येक जणांना स्वत:च्या बाबतीत किंवा मग मुलांच्या किंवा घरातल्या इतर सदस्यांच्या बाबतीत पडत असतो.

वातावरणातले बदल किंवा खाण्या- पिण्यात जरा काही खाली- वर झालं की लगेच तब्येतीचं गाडं रुळावरून घसरतं... असा अनुभव बऱ्याच जणांना येतो. रुटीनपेक्षा वेगळं झालेले थोडंही सहन होत नाही. लगेच थकवा (tired) येतो किंवा मग आजारपण येतं. मग आपण तर सगळं व्यवस्थित खातो, फळं, सुकामेवा, सॅलाड असं सगळंच आपल्या आहारात असतं. मग नेमकं आपलं चुकतं कुठे? एवढं सगळं करूनही आपली रोगप्रतिकार शक्ती एवढी कमी का आहे? असा प्रश्न कित्येक जणांना स्वत:च्या बाबतीत किंवा मग मुलांच्या किंवा घरातल्या इतर सदस्यांच्या बाबतीत पडत असतो.(4 mistakes for low immunity)

 

तुमच्या स्वत:च्या किंवा घरातल्या इतर सदस्यांच्या बाबतीत जर असंच होत असेल तर पुढील काही चुका तुमच्या हातून होत आहेत का, हे एकदा तपासून पहा. कारण बऱ्याचदा आपला आहार चांगला असतो, पण आपल्याला खाण्या- पिण्याच्या बाबतीत ज्या काही चुकीच्या सवयी असतात, त्या आपल्याला कमजोर बनवतात. आणि त्यामुळे मग आपली इम्युनिटी कमीच राहते. यालाच आपण जेवण अंगी न लागणे, असं म्हणतो. म्हणूनच तर जेवणात या काही चुका तुम्ही करत असाल, तर त्या लगेचच सोडून द्या.

 

तुम्हीही करता का काही चुका? १. फायबर कमी प्रमाणात घेणे जे लोक वेटलॉस करत असतात, त्यांच्या आहारात फायबरचे प्रमाण कमी असते. पण व्यवस्थित पचन होण्यासाठी आहारात योग्य प्रमाणात फायबर हवे. आहारात फायबर योग्य प्रमाणात असतील तर इम्युनिटी आणि आपले मुड स्विंग्स या दोन्ही गोष्टी बॅलेन्स राहतात. तसेच आहारात योग्य प्रमाणात फायबर असतील तर झोपही शांत लागते. चांगली झोप झाली की त्याचा परिणाम आपोआपच इम्युनिटी वाढण्यावर होत असतो. 

 

२. हिरव्या पालेभाज्यांचा अभाव हिरव्या पालेभाज्या रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी अतिशय उपयुक्त ठरतात. कारण या भाज्यांमध्ये व्हिटॅमिन ए आणि सी देखील भरपूर प्रमाणात असते. या भाज्यांमध्ये असलेली बायोॲक्टीव्ह कंपाऊंड रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यास किंवा कोणत्याही व्हायरल संसर्गापासून शरीराचे संरक्षण करण्यास मदत करतात.

 

३. चहा- कॉफीचा अतिरेक ही सवय अनेक जणांना असते. दिवसांतून अगदी ५- ६ कप किंवा त्यापेक्षा अधिक चहा- कॉफी पिणाऱ्यांची रोग प्रतिकारक शक्ती इतरांच्या तुलनेत कमीच असते. चहा आणि कॉफी प्रमाणात पिणे योग्यच. पण त्यांचा अतिरेक झाला तर अपचन वाढत जाते आणि त्याचा परिणाम इम्युनिटी कमी होण्यावर होतो. तसेच चहा- कॉफीचे अतिसेवन झोपेवर परिणाम करते. झोपेवर होणारा परिणाम आपोआपच प्रतिकारशक्ती कमी करतो.

 

४. मीठाचा अतिवापर खूप जास्त मीठ खाल्ल्याने शरीरातील पाणी पातळी कमी होते तसेच बीपीचा त्रास वाढतो. तसेच युनिव्हर्सिटी हॉस्पिटल ऑफ बॉन यांच्या मते शरीरात सोडियमचे वाढते प्रमाण इम्युनिटी झपाट्याने उतरवणारे ठरते. त्यामुळे आहारात मीठ कमीच असावे. मीठाचे प्रमाण कमी करण्याचा आणखी एक उपाय म्हणजे बाजारात मिळणारे प्रोसेस्ड फूड खाणे थांबवावे.   

टॅग्स : आरोग्यअन्नहेल्थ टिप्स