Join us   

शिळं अन्न खाताय ? जेवण वारंवार गरम करून खाल्ल्यानं तब्येतीवर होऊ शकतील गंभीर परिणाम..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2022 10:50 PM

Stale Food not good for Health आपण उरलेलं अन्न हे गरम करून खातोच, अन्न टाकून देणं आपल्याला पटत देखील नाही, मात्र, हेच शिळे अन्न आपल्या आरोग्यासाठी नुकसानकारक ठरू शकते..

आजकालच्या व्यस्त जीवनशैलीत अन्न उरले तर ते फ्रिज अथवा इतर ठिकाणी साठवले जाते. हे अन्न आपण खाण्याच्यावेळी गरम करून खातो. धकाधकीच्या जीवनात अन्न साठवणे ही नवीन गोष्ट नाही. मात्र, शिळे अन्न फेकून देण्याची इच्छा होत नाही. त्यामुळे आपण बहुदा उरलेलं अन्न गरम करून खातो. मात्र, हेच अन्न आपल्या शरीरासाठी चांगले नाही. शिळे अन्न आपल्या आरोग्यासाठी हानिकारक ठरते. 

प्रत्येकाच्या घरात अन्न हे उरतेच. आपण ते साठवून ठेवतो. बरेच लोकं मुद्दाम जास्त अन्न शिजवतात जेणेकरुन ते नंतर देखील खाल्ले जाईल. उरलेलं अन्न फ्रिजमध्ये ठेवले जाते. आणि पुन्हा तेच गरम करून खाण्यात येते. हे जवळ जवळ प्रत्येक घरात पाहायला मिळते. मात्र, हेच अन्न आपल्या आरोग्यासाठी धोकादायक मानले जाते.

तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार

उरलेले अन्न फ्रिजमध्ये फक्त ४८ तास ताजे राहू शकते, 48 तासांनंतर याचे सेवन केल्याने तुमच्या पचनसंस्थेवर वाईट परिणाम करते. एवढेच नाही तर शिळे अन्न सेवन केल्याने तुम्ही आळशी होता. भोपाळस्थित पोषणतज्ञ डॉ. रुची सोनी सांगतात की, ''तुम्ही अन्न कसेही साठवले तरी ते शिजवल्यानंतर 3 तासांच्या आत खाणे आवश्यक आहे. उरलेले किंवा शिळे अन्न पुन्हा गरम करणे 'तामसिक' मानले जाते. यामुळे अन्नाचे पौष्टिक मूल्य तर कमी होतेच, पण त्याचा परिणाम पदार्थाच्या चवीवर आणि गुणवत्तेवरही होतो. उरलेले अन्न खाल्ल्याने अन्नातून विषबाधा यांसारख्या अन्नजन्य आजारांचा धोकाही वाढतो.''

दिल्लीच्या लोकप्रिय पोषणतज्ञ मानसी गुप्ता म्हणतात. ''जेवणाच्यावेळी अन्न अनेक वेळा गरम केले जाते, ज्यामुळे ते तुमच्या शरीराला ऊर्जा देत नाही किंवा मूड बूस्टर सक्रिय करत नाही''. दोन्ही तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार एका व्यक्तीने फक्त ताजे शिजवलेले अन्न खावे. जर तुमच्याकडे स्वतःसाठी स्वादिष्ट जेवण बनवण्याची उर्जा नसेल किंवा तुमचे वेळापत्रक व्यस्त असेल, तर तुम्ही भाजलेले चणे, पॉपकॉर्न, पीनट बटरसोबत केळी, बेरी आणि पोहे खाऊ शकता.'' त्यामुळे अन्न हे नेहमी ताजे आणि गरम खायला हवे.

टॅग्स : हेल्थ टिप्सअन्न