Join us   

अतितिखट खाणेही ठरू शकते घातक! नेहमीच मसालेदार आणि तिखट खाणाऱ्यांना अल्सरचा धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 03, 2021 3:52 PM

केवळ गोड पदार्थ खाल्ल्यानेच आरोग्यावर परिणाम होतो, असे काही नाही. खूप जास्त तिखट खात असाल, तरीही तुम्हाला वेगवेगळे आजार जडू शकतात.

ठळक मुद्दे नेहमीच झणझणीत जेवण करणं तुम्हाला आवडत असेल, तर वेळीच सावध व्हा. जिभेचे हे चोचले पुरवणं थांबवा आणि आरोग्याची काळजी घ्या.

गोड पदार्थ खाल्ल्यामुळे काय- काय होऊ शकतं, कोणकोणते आजार मागे लागू शकतात, हे जवळपास सगळ्यांनाच माहिती आहे. पण तिखट, मसालेदार पदार्थही आरोग्यासाठी तेवढेच जास्त घातक ठरू शकतात, हे खूप कमी लोक जाणतात. खूप जास्त प्रमाणात तिखट खात असाल, चमचमीत आणि मसालेदार पदार्थांवर नेहमीच ताव मारत असाल, आणि नेहमीच झणझणीत जेवण करणं तुम्हाला आवडत असेल, तर वेळीच सावध व्हा. जिभेचे हे चोचले पुरवणं थांबवा आणि आरोग्याची काळजी घ्या. कारण अतिगोड प्रमाणेच अतितिखट, अतिमसालेदार जेवण देखील आपल्या तब्येतीसाठी हानिकारक आहे.

बदलत्या जीवनशैलीने जेवणाच्या वेळा पाळणे अशक्य होत आहे. रोजच्या आहारात जंकफुड, अतितिखट, मसालेदार अशा हॉटेलमधील पदार्थांचा समावेशही वाढत चालला आहे. यामुळे तब्येतीवर परिणाम होत आहे. आरोग्यावर होणारे परिणाम तरूण वयात लक्षात येत नाहीत. पण जसे आपण चाळीशीच्या पलिकडे झुकू लागतो, तसे अनेक आजार डाेके वर काढू लागतात. यातील एक सगळ्यात मुख्य आजार म्हणजे पोटाचा अल्सर होणे.  अल्सर म्हणजे एकप्रकारची जखमच असते. जठर किंवा लहान आतड्याच्या सुरूवातीच्या भागात या जखमा होत असतात. कमी प्रमाणात असेल तर केवळ औषधोपचार आणि आहारातील पथ्ये यामुळे अल्सर बरा होतो. पण जर हा आजार वाढत गेला तर अनेकदा रक्तस्त्राव होऊन शस्त्रक्रिया करण्याची वेळ येते. 

 

पोटात अल्सर असल्यास कोणती लक्षणे दिसून येतात - सतत पोट दुखणे - जळजळ होणे - मळमळणे आणि उलट्या - भूक मंदावणे - वजनात अचानक घट होणे - उलटीतून रक्त पडणे

 

अल्सर होऊ नये म्हणून अशी काळजी घ्या - वेळेवर जेवण घेतले पाहिजे, जेवणाच्या वेळांमधील अनियमितता टाळावी. - अति तिखट, मसालेदार खाणे टाळावे. - धुम्रपान, मद्यपान, रात्री उशीरा जेवण आणि रात्रीचे जागरण टाळावे. - वेळेवर झोप आणि सकस आहार घेणे अतीआवश्यक आहे.  - नियमितपणे व्यायाम करणे गरजेचे आहे.

 

अति तिखट खाल्ल्याने असेही होऊ शकते... काही अभ्यासावरून असे आढळून आले आहे की खूप जास्त प्रमाणात तिखट खाल्ल्यामुळे डिमेंशिया हा एक मानसिक आजारही होऊ शकतो. या आजारात मेंदूला इजा होऊन त्याचा थेट परिणाम स्मरणशक्तीवर होतो. त्यामुळे खूप जास्त तिखट खाणाऱ्यांनी वेळीच सावध होण्याची गरज आहे. 

 

टॅग्स : आरोग्यअन्नहेल्थ टिप्स