Join us   

आहारात प्रोटिनच्या कमतरतेने निर्माण होतात ७ समस्या, वारंवार किरकोळ आजारपण ते गंभीर त्रासाचा टाळा धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2022 5:48 PM

सुदृढ आरोग्यासाठी प्रथिनांची आवश्यकता (protein for health) असते. रोजच्या आहारातून शरीरास कमी प्रमाणात प्रथिनं मिळाली तर सततची आजारपणं (effects of protein deficiency on helath) मागे लागतात. प्रथिनंयुक्त आहारामुळे निरोगी आरोग्य सहज शक्य आहे.. ते कसं?

ठळक मुद्दे प्रथिनंयुक्त आहारामुळे स्नायू बळकट होतात आणि शरीरावरची चरबी घटते. रोगप्रतिकारशक्ती वाढण्यासाठी शरीरात पुरेशा प्रमाणात प्रथिनं असणं आवश्यक असतं.प्रथिनांमुळे केवळ शारीरिकच नाही तर मानसिक आरोग्यही सुदृढ राहातं.

निरोगी आरोग्यासाठी प्रथिनांची (protein for health)  सर्वात जास्त गरज असते. प्रथिनांमुळे चयापचय क्रियेचा वेग वाढतो आणि त्यामुळे शरीरातील फॅट्स कमी होतात. शरीरातील ऊती-पेशींच्या निर्मितीसाठी, त्यांची हानी भरुन येण्यासाठी प्रथिनांची गरज असते. स्नायू मजबुत करण्यासाठी आणि वजन नियंत्रित ठेवण्यासाठी आहारात प्रथिनांची सर्वात जास्त आवश्यकता असते. पण आहारात प्रथिनांकडे दुर्लक्ष झाल्यास (protein deficiency) आरोग्याची हानी होते. प्रथिनांच्या कमतरतेचे आरोग्यावर होणारे परिणाम (effects of protein deficiency on health)  वेगवेगळ्या स्वरुपात दिसतात. 

Image: Google

1. शरीरात प्रथिनांची कमतरता निर्माण झाल्यास त्याचे परिणाम केस आणि त्वचेवर दिसून येतात. प्रथिनांच्या कमतरतेमुळे त्वचा फाटते, केस पातळ होतात. केसांची चमक जाते. नखं तुटतात.

2. हाडं कमजोर होण्यास, हाडं फॅक्चर होण्यास शरीरातील प्रथिनांची कमतरता कारणीभूत ठरते. शरीरात प्रथिनं खूपच कमी असल्यास थोड्याशा दुखापतीनेही हाडांना इजा होतात, हाडं तुटतात. प्रथिनांचा शरीरावरील परिणाम याबाबत झालेला अभ्यास सांगतो की 6 महिने रोज 20 ग्रॅम प्रथिनं सेवन केल्यास हाडं तुटण्याचा धोका 2.3 टक्क्यांनी कमी होतो. 

3. प्रथिनांच्या कमतरतेमुळे रोगप्रतिकारशक्ती कमी होते. प्रथिनांची कमतरता जास्त असल्यास संसर्गाचा धोका वाढतो. योग्य प्रमाणात प्रथिनंयुक्त आहार घेतल्यास रोगप्रतिकारशक्ती वाढून संसर्गाचा धोका कमी होतो. 

Image: Google

4. शास्त्रज्ञांच्या मते मानवाच्या शरीरात सीरम एल्बुमिन नावाचं एक प्रकारचं प्रथिनं असतं. ते कमी झाल्यास शरीरावर सूज येते. घरचं पौष्टिक खाण्याऐवजी बाहेरचे जंक फूड खाणाऱ्या मुलांमध्ये ही समस्या प्रामुख्यानं निर्माण झाल्याचं अभ्यासात दिसून आलं आहे. 

5. कमी प्रथिनंयुक्त आहार घेतल्यास शरीरातील स्नायू कमकुवत होतात. अभ्यास सांगतो की, शरीरात प्रथिनांची कमतरता असल्यास शरीरावरील जखमा उशिरा भरतात . ज्यांच्या आहारात अमिनो ॲसिडयुक्त पदार्थ जास्त असतात त्यांचे स्नायू मजबूत राहातात.

Image: Google

6. शरीरातील प्रथिनं शरीरातील मज्जासंस्थेचं काम सांभाळण्यासही मदत करतं. रोजच्या आहारात प्रथिनांची कमतरता असल्यास ब्रेन फाॅग ( ज्यात स्मरणशक्ती कमी होते, थकवा येतो, कामात एकाग्रता नसते, चिडचिड होणे असे त्रास होतात)होण्याचा धोका वाढतो. यामुळे काम करण्याची, नवीन काही शिकण्याची शरीराला प्रेरणा मिळत नाही. शरीरात अमिनो ॲसिड म्हणजेच प्रथिनं भरपूर असतील तर मेंदू योग्य प्रकारे काम करतो. 

7. शरीरातील प्रथिनांचा परिणाम मानसिक आरोग्यावरही होतो. शरीरातील प्रथिनं मेंदूतील डोपामिन, सेरोटोनिन सारखे हार्मोन्स निर्माण होण्यास मदत करतात. हे हार्मोन्स आपल्याला आनंदी आणि शांत ठेवतात. पण शरीरात प्रथिनंच जर कमी असतील तर हार्मोन्स पुरेशा प्रमाणात निर्माण होत नाही आणि त्याचा परिणाम मानसिक आरोग्यावर होतो. शरीरात प्रथिनं पुरेशा प्रमाणात असल्यास दृष्टिकोन सकारात्मक राहाण्यास मदत होते. 

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सआहार योजना