बदलत्या काळानुसार सगळेच आपल्या आरोग्याच्या प्रति जागरुक झाल्याचे पहायला मिळते. सध्या आपल्यापैकी बरेचजण पदार्थांच्या कॅलरीज आधी मोजून मग तो खायचा की नाही हे ठरवतात. काहीजण गोड, तिखट, मसालेदार, तेलकट पदार्थ खाणे टाळतात तर काहीजण लो कॅलरीज पदार्थ खाणे पसंत करतात. असे लोक लो कॅलरीज किंवा गोड खायचे झाल्यास शुगर फ्री पदार्थ खाण्याचा पर्याय निवडतात. परंतु शुगर फ्री पदार्थ खरंच लो कॅलरीज असतात का ? त्यात साखरेचा वापर केलेला नसतो का ? शुगर फ्री मिठाई किंवा इतर पदार्थ खाणे खरंच आरोग्यासाठी फायदेशीर आहे का ? असे अनेक प्रश्न आपल्या मनात येत असतील.
आपल्या सर्वांनाच गोड पदार्थ व मिठाई खायला आवडते, पण जे लोक आरोग्याबाबत जागरूक असतात ते अनेकदा मिठाई खाणे टाळतात. त्यांना वाटते की त्यात खूप कॅलरीज आहेत, जे त्यांच्या आरोग्यासाठी योग्य नाही. अशा परिस्थितीत लोक एक उत्तम पर्याय शोधतात, आणि याच कारणांमुळे आजकाल बाजारात अनेक कंपन्या शुगर फ्री मिठाई बनवतात आणि त्यात कॅलरी नसल्याचा दावा करतात. त्यामुळे आरोग्याबाबत जागरूक असणारे लोकसुद्धा या शुगर फ्री पदार्थांना मनापासून खातात. त्यांना असे वाटते की अशा प्रकारे ते त्यांची गोड खायची भूक आणि आरोग्य दोन्ही एकत्रितपणे पूर्ण करु शकतात. एवढेच नाही तर त्यांना शुगर फ्री या नावाने इतके आकर्षित केले आहे की, यासंबंधित अनेक समज ते खरे मानतात. सेंट्रल गव्हर्मेंटच्या ईएसआयसी हॉस्पिटलच्या डाएटिशियन रितू पुरी शुफर फ्री मिठाईबद्दल बोलताना सांगतात, "शुगर फ्री मिठाई संपूर्णपणे कॅलरी फ्री नसतात. तसेच अशा प्रकारच्या मिठाईचे एकाच वेळी भरपूर प्रमाणांत सेवन करु नये."(Everything You Need To Know About Sugar-Free Sweets).
शुगर फ्री मिठाई, चॉकलेट किंवा इतर पदार्थांबाबतचे ३ गैरसमज...
चूक १. शुगर फ्री मिठाई आरोग्यासाठी अधिक फायदेशीर असते.
शुगर फ्री मिठाई, चॉकलेट किंवा इतर पदार्थ हे शुगर फ्री असल्याने आपल्या आरोग्यासाठी अधिक फायदेशीर असते, असा काही लोकांचा समज असतो. अनेकांना असे वाटते की शुगर फ्री मिठाईमध्ये साखर वापरली जात नाही, त्यामुळे ती आरोग्यासाठी फायदेशीर आहे. परंतु हा समज पूर्णपणे चुकीचा आहे. शुगर फ्री मिठाई बनवताना, ती मिठाई खाताना गोड लागावी म्हणून त्यात साखरे ऐवजी कोणत्या पदार्थाचा वापर केला आहे, हे पाहणे देखील गरजेचे आहे. शुगर फ्री मिठाई बनवताना त्यात कोणकोणते घटक वापरले जातात याबाबत खबरदारी बाळगणे हे खूप महत्वाचे आहे. बाजारांत विकत मिळणारी शुगर फ्री मिठाई बनवताना त्यात अॅस्पार्टम किंवा सुक्रॅलोजचा वापर केला जातो. ही दोन्ही रासायनिक, आर्टिफिशियल संयुगे आहेत जी आपल्या शरीरासाठी घातक आहेत. शुगर फ्री मिठाईमध्ये जरी कमी कॅलरीज असल्या तरीही त्यातील अपायकारक रासायनिक घटक आपल्या मूत्रपिंड आणि यकृतावर परिणाम करू शकतात.
चूक २. शुगर फ्री मिठाई हवी तेवढी पोटभर खाऊ शकतो.
शुगर फ्री मिठाई हवी तेवढी पोटभर खाऊ शकतो, हा शुगर फ्री मिठाईचा दुसरा मोठा गैरसमज आहे. काही लोकांना असे वाटते की शुगर फ्री मिठाई आरोग्यासाठी हानिकारक नसते, म्हणून या मिठाया आपण आपल्याला हव्या तेवढ्या पोटभर खाऊ शकतो. परंतु हे साफ चुकीचे आहे. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईटच असतो. शुगर फ्री मिठाईचे आपण किती प्रामाणात सेवन करता याकडे देखील लक्ष देणे गरजेचे असते. आपण जर शुगर फ्री मिठाई जास्त प्रमाणांत खाल्ली तर तुमच्या आरोग्यावर याचे अनेक नकारात्मक दुष्परिणाम होताना दिसतात.
चूक ३. शुगर फ्री मिठाईमध्ये कमी कॅलरीज असतात किंवा या मिठाया कॅलरी फ्री असतात.
काही लोकांचा असा समज असतो की, साखरेमध्ये भरपूर कॅलरीज असतात. साखर ही कॅलरीयुक्त असते. याउलट शुगर फ्री पदार्थांमध्ये साखर न घातल्यामुळे शुगर फ्री पदार्थ हे कॅलरी फ्री असतात. परंतु लोकांचा हा समज खूपच चुकीचा आहे. शुगर फ्री मिठाई या संपूर्णपणे कॅलरी फ्री नसतात. त्यात थोड्या - अधिक प्रमाणांत कॅलरीज या असतातच. शुगर फ्री मिठाई तयार करताना त्यात मावा, तेल, तूप, मैदा, दूध यांसारखे विविध घटक वापरले जातात. मिठाई बनवताना रिफाइंड पदार्थांचा त्यात वापर केला जातो. या सगळ्या घटकांचा वापर केल्यामुळे या शुगर फ्री मिठाईचा कॅलरी काऊंट खूप वाढतो. यासोबतच या मिठाई बनवताना त्या चवीने गोड लागण्यासाठी त्यात आर्टीफिशियल स्वीटनर्स मिसळलेले असतात. या आर्टीफिशियल स्वीटनर्समुळे या मिठाईच्या कॅलरीज वाढतात तसेच हे स्वीटनर्स आपल्या आरोग्यासाठी घातक ठरु शकतात. या सगळ्या कारणांमुळे शुगर फ्री मिठाई खाण्यापेक्षा गूळ, मध, खजूर यांसारख्या नैसर्गिक स्वीटनर्सचा वापर करुन बनवलेल्या मिठाया खाव्यात.