डॉ. अविनाश भोंडवे
उन्हाळ्याच्या दिवसांत मूत्रविसर्जन करताना मूत्रमार्गाची आग होण्याच्या त्रासाला 'उन्हाळी लागणे' म्हणतात. हा एक परत परत होणारा मूत्रदाह असतो. हवामानातील पारा वर चढून उकाडा वाढला की त्रास होतो. साधारणपणे मार्च ते जून आणि सप्टेंबर व ऑक्टोबर या महिन्यांमध्ये अनेकांना उन्हाळीचा त्रास होतो. स्त्रियांमध्ये याचे प्रमाण अधिक आढळते. मानवी मूत्र हे रासायनिकदृष्ट्या आम्ल किंवा अल्कली या दोन्हीच्या मध्यावर म्हणजे न्युट्रल असते. उन्हाळी लागते तेंव्हा मूत्राची आम्लता वाढते. मूत्रमार्गातील अंतस्थ त्वचेशी या आम्ल झालेल्या मूत्राचा संबंध आल्यावर अंतर्गत दाह निर्माण होतो आणि मूत्रमार्गाची जळजळ होते (Expert Advice About Urine Infection In Summer).
शास्त्रीय कारण काय?
आपल्या शरीराचे नेहमीचे तापमान ३६.८ अंश सेंटीग्रेड असते. उन्हाळ्यामध्ये वातावरणातील तापमान ४० अंशाच्या पुढे गेल्यावर उष्णतेची लाट येते. अशा वेळेस शरीराचेही तापमान वाढू लागते. ते कायम ठेवण्यासाठी मेंदूतील तापमान नियंत्रक केंद्रायोगे रक्तवाहिन्या रुंदावतात आणि घाम सुटतो. शरीरातील रक्त आणि पेशींमधील पाणी तसेच क्षार यापासून घाम बनतो. घाम खूप गेल्यानंतर शरीरातील पाण्याचे आणि क्षाराचे प्रमाण कमी होऊन मूत्र आम्लस्वरूप घेते, यालाच आपण उन्हाळी लागली असे म्हणतो.
मूत्रमार्गात आग होण्याची कारणे
१. पुरेसे पाणी न पिणे
२. मूत्रनलिका किंवा मूत्राशयामध्ये खडे (स्टोन) निर्माण होणे.
३. मूत्राशयाचा दाह (सिस्टायटिस)
४. क्लॅमिडीया ट्रॅकोमाटिस
५. कर्करोगाच्या किंवा अन्य काही आजारांच्या उपचारात वापरल्या जाणार्या औषधांमुळे
६. जननेंद्रियाची नागीण (जनायटल हर्पिस)
७.गोनोरिया (गर्मी)
८.मूत्रपिंड संसर्ग (पायलोनेफ्रायटिस)
९. प्रोस्टेटायटीस (प्रोस्टेटचा संसर्ग )
१०. लैंगिक संक्रमित रोग (एसटीडी)
११. चाचणी किंवा उपचारांसाठी युरोलॉजिकल उपकरणांच्या वापरानंतर
१२. मूत्रमार्गाचा संसर्ग
१३. मूत्रमार्गात यीस्ट संसर्ग
उन्हाळी लागू नये म्हणून उपाय काय?
१. प्रौढ व्यक्तींमध्ये उन्हाळ्याच्या दिवसात बाह्य तापमानाच्या प्रमाणात पाण्याची गरज ३ ते ४.५ लिटरपर्यंत वाढते. उन्हाळी लागण्याचा त्रास मुख्यत्वे पाणी आणि द्रवपदार्थ कमी प्यायल्याने होतो. त्यासाठी दिवसभरात दर तासाला १ ते १.५ ग्लास पाणी प्यावे.
२. पाण्याशिवाय लिंबू सरबत, शहाळे, फळांचा ताजा रस, पन्हे, कोकम सरबत, ताक, लस्सी असे द्रवदार्थ १ ते २ लिटर नियमितपणे घेतल्यास उन्हाळी लागण्याचा त्रास प्रतिबंधित करता येतो. लिंबू पाण्यात किंवा ताकात पाव चमचा मीठ आणि चिमुटभर खाण्याचा सोडा टाकल्यास, लघवीची जळजळ लवकर थांबते.
३. उन्हाळी केवळ पाणी कमी प्यायल्याने होते आहे की काही आजार आहे यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्याने रक्त, लघवी, सोनोग्राफी, पोटाचा एक्सरे वगैरे तपासण्या कराव्यात लागतात.
४. केवळ लघवीची आम्लता वाढलेली असल्यास, अल्कलाईन मिक्स्चर म्हणून मिळणारी औषधे पाण्यात टाकून दिवसातून ३-४ वेळा घेतल्यास तो त्रास कमी होतो. पाणी पिणे खूप कमी असल्यास किंवा त्यामुळे निर्जलीकरण (डीहायड्रेशन) झाल्यास रुग्णांना सलाईन लावून पाण्याचे आणि क्षारांचे प्रमाण व्यवस्थित करावे लागते.
५. लघवीच्या तपासणीत मूत्रमार्गात जंतुसंसर्ग आढळलयास योग्य ती प्रतिजैविके घ्यावी लागतात. अशा त्रासामध्ये मूत्राच्या सामान्य तपासणीसोबत 'मूत्राचे कल्चर' करून कोणत्या प्रकारचे जंतू आहेत आणि त्यांना कोणते औषध लागू पडते आहे, ते कळू शकते. त्यातून अधिक नेमका उपचार करता येतो.
(लेखक जनरल फिजिशियन असून इंडियन मेडिकल असोसिएशनचे माजी अध्यक्ष आहेत.)