नुकताच ‘वर्ल्ड स्पाइन डे’ साजरा करण्यात आला. 2021 ची थीम होती ‘बॅक टू बॅक’. अर्थात आपल्या पाठीकडे लक्ष द्या. पाठीच्या कण्याची काळजी घ्या हा आहे त्या संदेशा मागचा अर्थ. पाठीचं दुखणं ही समस्या जगभरात आढळून येत आहे. तसेच तरुण वयातही ही समस्या मोठ्या प्रमाणात आढळते. बायका पाठदुखी हे तर समीकरणच झालं आहे. पाठदुखीची समस्या एवढी व्यापक असली तरी त्याकडे गांभिर्यानं मात्र पाहिलं जात नाही. पाठ दुखत असली तरी काम रेटलं जातं. या अक्षम्य दुर्लक्षामुळे साध्या वाटणार्या पाठदुखीचं रुपांतर गंभीर दुखण्यात होतं. मणक्याचे आजार उद्भवतात. चुकीच्या पध्दतीनं उठल्या बसल्यामुळे, सदोष जीवनशैलीमुळे आपण हे आजार स्वत:हून ओढावून घेतो असं तज्ज्ञ म्हणतात.
Image: Google
पाठीचा कणा हा आपल्या शरीराचा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. आपण चालत जरी पायानं असलो तरी ही हालचाल पाठीच्या कण्यानं सुलभ होते. आपल्या शरीराच्या प्रत्येक अवयवाच्या हालचालीशी पाठीच्या कण्याचा संबंध असतो. म्हणूनच पाठीच्या कण्याकडे लक्ष देणं, तो दुखावला जाणार नाही याची काळजी घेणं, त्यासाठीची दक्षता बाळगणं आवश्यक आहे असं तज्ज्ञ म्हणतात. म्हणूनच आधी तज्ज्ञ आपल्या चुकांकडे लक्ष वेधतात आणि त्यात सुधारणा करण्याचा सल्ला देतात.
कशामुळे दुखावतो पाठीचा कणा?
1.चुकीच्या पध्दतीनं बसणं- कुबड काढून बसण्याची सवय असल्यास त्याचा पाठीच्या कण्याच्या नैसर्गिक ठेवणीवर होतो. यामुळे पाठीच्या खालच्या बाजूवर भार पडतो आणि त्याचा परिणाम म्हणून पाठ दुखायला सुरुवात होते. म्हणूनच तज्ज्ञ म्हणतात की, आपण बसून काम करत असलो तरी दर अध्र्या तासानं आपण आपलं डोकं मान खाली वर , डावीकडे उजवीकडे फिरवायला हवी. यामुळे पाठीच्या कण्याला आराम मिळतो. पाठ दुखत असल्यास तिथे बर्फानं किंवा गरम पाण्याच्या पिशवीनं शेकावं. आणि दुखणं कमी वाटत नसल्यास आहे पाठदुखी असं न म्हणता डॉक्टरांना भेटावं.
2. चुकीच्या गादीवर झोपणं- पाठीला आराम सर्वात जास्त रात्री आपण गादीवर पाठ टेकवतो तेव्हाच मिळतो. पण हल्ली गाद्याच पाठीच्या, मणक्याच्या दुखण्याचं कारण झालं आहे, गादीवर झोपल्यावर पाठ ही सरळ राहाण्यासाठी गादी कडक असायला हवी तसेच शरीराला आराम देण्याइतपत नरमही असायल हवी. एकदम कडक आणि अगदीच मऊ गादी पाठीसाठी चुकीची मानली जाते. चुकीच्या गादीवर झोपल्यामुळे पाठीचे स्नायू, हाडे हे चुकीच्या अवस्थेत राहातात त्याचाच परिणाम पाठ दुखी होण्यावर, पाठ दुखी गंभीर होण्यावर होतो.
3. पोटावर झोपणं- पाठीचं दुखणं जर आधी पासूनच असेल आणि त्यात जर पोटावा झोपण्याची सवय असेल तर मग पाठीचं दुखणं आणखी गंभीर होतं असं तज्ज्ञ म्हणतात. पोटावर झोपल्याणं मान आणि पाठीच्या खालच्या भागावर ताण पडतो. तसेच जर एका कडेवर झोपण्याची सवय असेल तर ही सवयही पाठीच्या कण्यावर वाईट परिणाम करते.
Image: Google
4. एका जागी तासनतास बसून काम करणे- हल्ली बैठं काम करण्याची सवय वाढलेली आहे. तासनतास एकाच अवस्थेत खुर्चीत बसून राहिल्यानं पाठीचे स्नायू, मान आणि पाठीच्या कण्यावर ताण पडतो. त्यातच खुर्चीत बसून आणि वाकून काम केल्यानं पाठीवर आणखी वाईट परिणाम होतो. खुर्ची ही किती का आरामदायी असू देत पण खुर्चीत तास न तास बसून राहाणं ही चुकीची पध्दत आहे. एका जागी खूप वेळ बसल्यानं पाठीला आराम नाही तर थकवा येतो. म्हणून दर अर्धा तासानं खुर्चीतून काही मिनिटं फिरुन येणं हे आवश्यक आहे.
5. व्यायामाचा अभाव - तुमची जीवनशैली ही बसून काम करण्याची असू देत की उभं राहून, धावपळ करुन काम करण्याची. व्यायाम हा सगळ्यांसाठीच आवश्यक असल्याचं फिटनेस तज्ज्ञ आणि डॉक्टर सांगतात. शरीराला व्यायाम नसेल तर पाठ दुखी हमखास होते. आपल्या पाठीच्या कण्याला पोटाच्या आणि पाठीच्या मजबूत स्नायुंच्या आधाराची गरज असते. हा आधार व्यायामातूनच , शरीराची जास्तीत जास्त हालचाल करुनच मजबूत होतो. पायर्या चढणं उतरणं, पायी चालणं, व्यायाम करणं यामुळे मणक्याच्या खालची चकती म्हणजेच स्लिप डिस्कही मजबूत होते आणि लवचिकही. पण जर शरीराची हालचालच नसेल तर मात्र पाठीचं दुखणं अटळ आहे.
पाठीचं - मणक्याचं दुखणं टाळण्यासाठी
1. पाठीचा कणा मजबूत राहाण्यासाठी कॅल्शियमयुक्त आहाराची गरज असते. प्रथिनं आणि कॅल्शियमयुक्त आहार घेतल्यास ऑस्टियोपोरोसिस सारखे हाडांचे गंभीर आजार होत नाहीत. तसेच ड जीवनसत्त्वामुळे हाडं मजबूत राहातात. म्हणून कोवळ्या उन्हात फिरणं गरजेचं आहे. योग्य प्रमाणात पाणी पिल्यामुळे नवीन पेशी, उती लवचिक होतात.
2. चुकीच्या शारीरिक स्थितीत जास्त वजन उचलणे यामुळे पाठीच्या कण्यावर ताण पडतो. यामुळे स्लिप डिस्कलाही दुखापत होण्याची शक्यता असते. त्यामुळे बसता उठताना, चालताना, झोपतान आपली शारीरिक स्थिती अर्थात बॉडी पोज ही योग्य राहील याची काळजी घ्यावी. तसेच क्षमतेपेक्षा वजनदार वस्तू न उचलण्याची काळजी घ्यावी. क्षमतेपेक्षा जास्त जड वस्तू उचलताना पाठ पुढच्या दिशेनं खाली वाकते अणि पाठीच्या कण्यावर आणि मणक्यावर ताण पडतो.
Image: Google
3. पाठीचा कणा लवचिक आणि मजबूत करण्यासाठी विशिष्ट व्यायाम करणं आवश्यक आहे. यामुळे पाठदुखीचा धोका टळतो. जसे योगासनातील भुजंगासन, सेतूबंधासन, मार्जरासन यासरख्या आसनांमुळे पाठीच्या स्नायुंचा व्यायाम होतो. सोबतच चालणं, सायकल चालवणं, पोहोणं हे देखील पाठीच्या कण्यासाठी आणि मणक्यांसाठी योग्य व्यायाम आहेत.