निरोगी डोळे एका वरदानापेक्षा कमी नाही. आपल्या शरीरातील नाजूक अवयव म्हणजे डोळे. वयानुसार काहींना डोळ्यांच्या बाबतीत अनेक समस्या उद्भवतात. सध्या गॅजेट्सचा जमाना आहे. लॅपटॉप आणि मोबाईलशिवाय काहींना चैन मिळत नाही. मात्र, सतत मोबाईल आणि लॅपटॉपचा वापर केल्यामुळे डोकेदुखी आणि डोळ्यांवर ताण येतो. ज्यामुळे डोळ्यांच्या निगडीत अनेक समस्या निर्माण होतात.
कोरोना या वैश्विक महामारीनंतर अनेक जण वर्क फ्रॉम होम करीत आहेत. सतत स्क्रीनसमोर बसून काम करत आहेत. काहींना सतत स्क्रीन पाहिल्यानंतर लांबचे दिसण्यास त्रास होतो. अशाने डोळे कोरडे पडतात. कोरड्या डोळ्यांमुळे डोळे दुखणे, जळजळ होणे, यासह स्क्रीनवर वाचणे किंवा पाहणे कठीण होऊ शकते. कोरड्या डोळ्यांपासून सुटका हवी असल्यास काही घरगुती उपाय आपल्याला नक्कीच मदत करतील.
कोरड्या डोळ्यांची समस्या का उद्भवते
जेव्हा आपल्या अश्रू ग्रंथी डोळ्यांना पुरेसा ओलावा तयार करण्यासाठी अश्रू तयार करू शकत नाहीत, तेव्हा डोळ्यांमध्ये कोरडेपणा येतो. ज्यामुळे डोळ्यांतील घाण साफ होत नाही, यासह डोळ्यांमध्ये जळजळ, वेदना आणि जडपणा येतो. त्यामुळे डोळे पुरेसे हायड्रेटेड ठेवणं गरजेचं आहे.
शरीराला हायड्रेट ठेवा
पुरेसा ओलावा न मिळणे हे डोळ्यांच्या कोरडेपणामागचे कारण असू शकते. त्यामुळे शरीराला हायड्रेट ठेवा. या काळात पाणी जास्त प्या. दिवसातून अधिकतर पाणी प्या जास्त करून १० ग्लास पाणी पिण्याचे लक्ष ठेवा. यासह डोळ्यांना हायड्रेट ठेवण्यासाठी, ओलावा देणारे काही पदार्थ खा.
डोळ्यांना गरम पाण्याचा शेक द्या
डोळ्यांना पुरेशा प्रमाणात हायड्रेट ठेवण्यासाठी पाणी, तेल हे घटक आवश्यक असतात. त्यांच्या कमतरतेमुळे डोळ्यांमध्ये कोरडेपणा जाणवू लागते. यासाठी कोमट पाण्यात सुती कापड भिजवा आणि डोळ्यांना शेक द्या. असे केल्याने डोळ्यांची जळजळ कमी होईल.
पापण्यांचा व्यायाम करा
स्क्रीन टायमिंग वाढले की डोळ्यांच्या समस्या देखील वाढतात. ज्यामुळे कोरडे डोळ्यांचा सामना हा अधिक लोकांना करावा लागतो. कामामुळे स्क्रीनच्या वेळेवर नियंत्रण ठेवता येत नसेल, तर पापण्यांचा व्यायाम करा. यासाठी दर २० मिनिटांनी पापण्यांची २० सेकंदांसाठी हळूहळू उघडझाप करा. यामुळे डोळ्यांचा व्यायाम होईल आणि त्यांना आराम ही मिळेल.
डोळ्यांचा मसाज करा
डोळे जर कोरडे पडले असतील तर डोळ्यांवर हलक्या हातांनी मसाज करा. मसाज केल्याने रक्ताभिसरणाबरोबर, स्नायूंना आराम मिळतो. त्यामुळे स्क्रीनवरील काम झाल्यांनतर डोळ्यांना मसाज द्या.
डोळे थंड पाण्यानं धुवा
लॅपटॉपवर जास्त वेळ काम केल्याने डोळे थकतात. अशा वेळी डोळे थंड पाण्यानं धुवा, यातून तुम्हाला थोड्या वेळासाठी आराम मिळेल. नियमित ही प्रक्रिया करा. जेणेकरून डोळ्यांना आराम मिळेल.