फ्रिज ही पूर्वी श्रीमंत लोकांकडे असणारी गोष्ट होती. पण आता ती इतकी गरजेची गोष्ट झाली आहे की फ्रिज नाही असे घर आता शोधूनही सापडणार नाही. भाजीपाला, फळे, दुग्धजन्य पदार्थ, उरलेले अन्नपदार्थ आणि अगदी सुकामेवा किंवा वेगवेगळे मसाले, पीठं ठेवण्याचे अतिशय उत्तम ठिकाण म्हणजे फ्रिज. अन्नपदार्थ खराब होऊ नयेत म्हणून एका विशिष्ट तापमानाला ते साठवण्याची क्रिया या मशीनमध्ये होते (Fact about Does Refrigeration kill nutrients of food) .
फ्रिजमुळे अनेकदा आपले स्वयंपाकाचे कामही खूप सोपे होते. दुसऱ्यादिवशी करायच्या एखाद्या पदार्थाची तयारी असो किंवा आधीच काही जिन्नस आणून ठेवलेले असतील तर ते पुन्हा पुन्हा वापरणे असो अशा एक ना अनेक बाबतीत फ्रिजचा आपल्याला चांगला उपयोग होत असतोपण अशाप्रकारे दिवसेंदिवस फ्रिजमध्ये ठेवलेले पदार्थ खावेत की नाही असा प्रश्न आपल्यापैकी अनेकांना पडतो. अनेकांना बरेच दिवस फ्रिजमध्ये ठेवलेले पदार्थ खाण्याची सवय असते. तर काही जण फ्रिजमध्ये ठेवलेले सतत खायला नको म्हणून बहुतांश पदार्थ बाहेर ठेवूनच खातात. पण यातले काय योग्य याविषयी प्रसिद्ध आहारतज्ज्ञ अमिता गद्रे काही महत्त्वाच्या टिप्स देतात...
आहारतज्ज्ञ सांगतात...
अन्नपदार्थ रेफ्रिजरेटरमध्ये ठेवल्यामुळे त्यातील पोषक तत्त्वांचा नाश होतो असे अजिबात नाही. तसेच यामुळे हार्मोन्सचे असंतुलन होते किंवा कॅन्सरसारखे आजार होतात यामध्ये काहीही तथ्य नाही. उलट रेफ्रिजरेटरमुळे आपण दिर्घकाळ अन्न सुरक्षित ठेवू शकतो. एकतर आपल्याला सतत भाजीपाला आणणे शक्य नसते त्यामुळे आपण तो फ्रिजमध्ये चांगल्या प्रकारे साठवू शकतो. तसेच वेळ वाचण्यासाठी आणि आहार समृद्ध असावा यासाठी तयार करुन ठेवलेले पदार्थ खाणे यात काहीच गैर नाही. पदार्थ रेफ्रिजरेट करण्याच्या गोष्टीपेक्षा आपल्या आहारात विविधता कशी असेल आणि शरीराचे पोषण होईल असे पदार्थ आहारात कसे असतील याचा प्रामुख्याने विचार व्हायला हवा.