Join us   

बिकिनी वॅक्स करताय की नाजूक जागी जखमा? बिकिनी वॅक्स करणं खरंच गरजेचं आहे का? -डॉक्टर सांगतात..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 09, 2023 1:25 PM

Facts and Risk in Bikini Waxing : केवळ फॅशन म्हणून बिकिनी वॅक्स करणं हे अतिशय नाजूक जागेचं दुखणं होऊ शकतं.

ठळक मुद्दे सौंदर्याच्या काहीतरी विचित्र कल्पना मनाशी पक्क्या धरून उगाच स्वतः च्या शरीराचे असे हाल हाल करून घेऊ नका. स्त्रियांच्या योनीमार्गाच्या भागात असलेले केस योनिमार्गाचे संरक्षण करत असतात.

डॉ. शिल्पा चिटणीस-जोशी

काही दिवसांपूर्वी एक  तरुण सुंदर मुलगी भेदरलेल्या अवस्थेत घाईघाईत क्लिनिक मध्ये आली. वेदनेने पिळवटलेला तिचा चेहरा बघून रिसेप्शनिस्ट ने लगेच तिला आत पाठवले.

"मॅम माझं लग्न आहे म्हणून बिकिनी व्हॅक्स करायला गेले होते तर ते करताना त्या भागात मोठी जखम झाली आणि खूप ब्लिडींग सुरू झालं आहे. मला खूप भीती वाटतेय मॅम" तिने रडायलाच सुरुवात केली.

तिला धीर देऊन शांत करून तपासले तर योनीमार्गाच्या अतिशय नाजूक भागात चांगला मोठा कट गेला होता. नशिबाने साधे उपचार करून टाका घ्यावा न लागता ब्लिडिंग थांबलं आणि मग जंतुसंसर्ग होऊ नये म्हणून औषधे देऊन तिची रवानगी केली. पण त्याआधी तिला अशाप्रकारचे व्हॅक्सिंग करण्याबद्दल चांगलाच डोसही दिला (Facts and Risk in Bikini Waxing).

(Image : Google)

बिकिनी व्हॅक्स  म्हणजे नक्की काय?

योनीमार्गाच्या आसपास असलेला एक न एक केस व्हॅक्सिंग करून काढून टाकणे. जेणेकरून बिकिनी घातली तरी काहीही दिसू नये हा बिकिनी व्हॅक्सचा उद्देश असतो. हा भाग अतिशय नाजूक आणि संवेदनशील असल्याने साहजिकच ही प्रक्रिया करून घेणे चांगलेच वेदनादायक असते. तरीही बऱ्याच तरुण मुली आणि काही वयाने मोठ्या स्त्रियाही हे नियमित करून घेतात. 

बिकीनी व्हॅक्स का केले जाते?

बऱ्याच जणी हे पुरुषांना आवडते म्हणून करत असाव्यात. हल्लीच्या तरुण पिढीवर पोर्नोग्राफीचा असलेला प्रभाव हे कारण असू शकेल असं वाटतं.आजच्या वयात येणाऱ्या आणि तरुण पिढीला पोर्नोग्राफी बघणे फारच सोपे झाले आहे पण त्याचे त्यांच्या लैंगिक जीवनावर होणारे दुष्परिणाम त्यांना कोणीतरी समजावून सांगायची गरज आहे. 

आता जरा शास्त्रीय दृष्टिकोनातून या विषयाकडे बघूया. स्त्रियांच्या योनीमार्गाच्या भागात असलेले केस योनिमार्गाचे संरक्षण करत असतात. वेगवेगळ्या प्रकारच्या महत्त्वाच्या जीवाणूंचे वास्तव्य या भागात आणि योनीमार्गाच्या आतही असते. या जीवाणूंमुळे योनीमार्गाची प्रतिकारशक्ती टिकून राहते आणि वेगवेगळ्या संसर्गाचा जास्त चांगला प्रतिकार होऊ शकतो. हे सगळे केस जेव्हा शेविंग किंवा व्हॅक्सिंग करून काढले जातात तेव्हा या केसांची मुळे उघडी पडतात, दुखावली जातात. त्यामुळे केसांच्या मुळात वेगवेगळे जंतुसंसर्ग होऊ शकतात. योनीमार्ग पूर्ण उघडा पडल्याने जास्त कोरडेपणा येऊ शकतो.परिणामी त्या भागात बाहेर आणि आतल्या बाजूलाही जंतुसंसर्ग होऊ शकतात. कोरडा पडलेल्या योनिमार्गात प्रतिकार शक्ती कमी होते तसेच खाज सुटू शकते. 

(Image : Google)

ह्या एवढ्या सगळ्या समस्या सगळे केस मुळासकट काढण्याच्या अट्टाहासामुळे होऊ शकतात. आणि वर नमूद केलेल्या मुलीच्या बाबतीत जशी मोठी इजा झाली तसे काही घडले तर  हा प्रकार अजूनच धोकादायक ठरतो. योनिमार्गाच्या भागातले केस समूळ काढण्यापेक्षा कात्रीने काळजीपूर्वक  कमी करणे हे सर्वात योग्य आहे. त्यामुळे स्वच्छ्ता पण राखली जाते आणि बाकी त्रास होत नाही. या भागात अजिबात स्वच्छता न करणेही चुकीचे आहेच, त्यामुळे अजून वेगळ्या समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे सौंदर्याच्या काहीतरी विचित्र कल्पना मनाशी पक्क्या धरून उगाच स्वतः च्या शरीराचे असे हाल हाल करून घेऊ नका. योग्य ती माहिती घेऊन मगच अशा गोष्टींच्या वाट्याला गेलेले केव्हाही चांगले. 

(लेखिका स्त्रीरोग  व वंध्यत्वतज्ज्ञ आहेत)

shilpachitnisjoshi@gmail.com

 

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सब्यूटी टिप्स