Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > सतत थकवा- अंगदुखी हा त्रास घरोघरी महिलांना छळतो आहे, थकव्यानं तुमचाही जीव नकोसा झालाय का?

सतत थकवा- अंगदुखी हा त्रास घरोघरी महिलांना छळतो आहे, थकव्यानं तुमचाही जीव नकोसा झालाय का?

अतिशय थकवा आला, वाटतं काही करू नये, अशी तक्रार घरोघरी अनेकजणी करतात. सतत छळणारा थकवा ही एक गंभीर समस्या आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2024 06:41 PM2024-09-25T18:41:39+5:302024-09-25T18:45:22+5:30

अतिशय थकवा आला, वाटतं काही करू नये, अशी तक्रार घरोघरी अनेकजणी करतात. सतत छळणारा थकवा ही एक गंभीर समस्या आहे.

Fatigue and body aches can have many causes, including medical conditions, lifestyle, and mental health, women suffers a lot | सतत थकवा- अंगदुखी हा त्रास घरोघरी महिलांना छळतो आहे, थकव्यानं तुमचाही जीव नकोसा झालाय का?

सतत थकवा- अंगदुखी हा त्रास घरोघरी महिलांना छळतो आहे, थकव्यानं तुमचाही जीव नकोसा झालाय का?

Highlightsहा थकवा देखील साध्या किरकोळ प्रमाणापासून ते अगदी बर्न आऊट सिंड्रोमपर्यंत असू शकतो.

वैद्य राजश्री कुलकर्णी, (एमडी, आयुर्वेद)

‘आज ना, मला फार थकवा आलाय, मी लवकर झोपणार आहे आणि मला सकाळी लवकर उठवू नका!’ -असे संवाद बहुधा दर शनिवारी रात्री ऐकू येतात. कॉलेजला जाणारी मुलं तरी असं म्हणतात किंवा मग घरातली नोकरी करणारी मंडळी!
पण, गृहिणी असो नाहीतर नोकरी करणाऱ्या स्त्रिया त्या मात्र मनात असूनही असं बोलू शकत नाहीत आणि बोलल्या तरी त्यांना सकाळी लवकर उठून पुन्हा कामाला लागावं लागतंच; पण अनेकींना खरं तर सतत थकवा नेहमीच जाणवत असतो.
विशेषतः सणवार झाल्यानंतर तर अनेकींच्या चेहऱ्यावर भयंकर थकवा दिसतो. बहुतांशी स्त्रिया आजारीच पडतात.

हा थकवा देखील साध्या किरकोळ प्रमाणापासून ते अगदी बर्न आऊट सिंड्रोमपर्यंत असू शकतो. म्हणजे इतक्या प्रमाणात की काहीही करू नये, फक्त झोपावं, विश्रांती घ्यावी असं वाटतं. काहीही काम करण्याची शक्ती किंवा त्राण राहत नाही. मानसिक अवस्था देखील अतिशय नाजूक असते म्हणजे अगदी एखाद्या व्यक्तीने प्यायला ग्लासभर पाणी जरी मागितलं तरी भयंकर संताप येतो.

थकव्याची लक्षणे कोणती?

शारीरिक व मानसिक दोन्ही प्रकारची लक्षणं दिसतात.
१. काहीही शारीरिक कष्ट करू नये असं वाटणं.
२. झोपून राहावे अशी तीव्र इच्छा.
३. अंगात त्राण नाही असं वाटणं.
४. सतत चिडचिड होणे.
५. निरुत्साह, एनर्जीच नाही असं वाटणं.

६. नियमित कामे करण्याची क्षमता न उरणं.
७. दीर्घकाळ आजारी आहोत अशी भावना असणं.
८. कायम डोकं दुखणं.
९. अंग दुखणं.
१०. चक्कर येणं. गरगरणं.
११. स्नायू दुखणं. त्यात काहीच ताकद नाही असं वाटणं.
१२. भूक न लागणं.
१३. तीव्र पाठ व कंबरदुखी
१४. दम लागणं
१५. कामांची गती कमी होणं.

मानसिक लक्षणं कोणती?

१. छोट्या-छोट्या गोष्टींत चिडचिड, संताप होणं.
२. चिडून जोरात बोलणं, आरडाओरडा करणं.
३. सतत मूड बदलत राहणं.
४. चुकीचे निर्णय घेणं.
५. सतत रडू येणं, दु:खी वाटणं.
६. कशातच रस न वाटणं, बोअर होणं.
७. मानसिक तणाव व डिप्रेशन

थकव्याची कारणं काय?

बायकांच्या बाबतीत विशेष करून आढळणारी कारणे म्हणजे...
अतिशारीरिक कष्ट, अपुरी झोप, अपुरा व चुकीचा आहार, जेवण व झोप यांच्या अनियमित व चुकीच्या वेळा, स्वतःच्या आरोग्याविषयी अनास्था व निष्काळजीपणा याव्यतिरिक्त काही आजार किंवा मेडिकल कंडिशनमध्ये थकवा हे प्रमुख लक्षण असते. रक्तात हिमोग्लोबिन कमी असणं म्हणजेच ॲनिमिया किंवा पांडुरोग, थायरॉइड, डायबिटिस, हृदयविकार किडनीचे आजार, गर्भवती असताना, मानसिक आजार व त्यासाठी काही विशिष्ट उपचार सुरू असले तरी थकवा जाणवतो.
थोडक्यात सांगायचे तर केवळ थकवा-थकवा असा तक्रारीचा सूर न लावता त्याचे निदान व उपचार वेळेत करणे आवश्यक आहे, हे प्रत्येक स्त्रीने लक्षात घ्यायला हवे. अंगावर काढू नये, हे उत्तम.

थकव्यावर उपाय काय?

१. सर्वांत पहिला मुद्दा असा आहे की, स्वतःच्या आरोग्याविषयी जागरूकता हवी. आपल्याला होणाऱ्या त्रासाबद्दल घरात सांगायला हवे व त्यासाठी गरजेचे असणारे सर्व उपाय करायला हवेत. आपोआप बरं वाटेल, त्रास कमी होईल अशा भ्रमात राहू नये.
२. घरची कामे व दिवसभराचे रुटिन थोडी शिस्त लावून करावे म्हणजे पुरेशी झोप घ्यायला वेळ मिळेल. ज्या गृहिणी दुपारी घरी असतात त्यांनी थोडा वेळ विश्रांती घेण्याचा प्रयत्न करावा. झोप हा थकवा दूर करण्यासाठी व एनर्जी भरून काढण्यासाठी सर्वांत महत्त्वाचा व सोपा उपाय आहे.

३. एक्सरसाइज व एक्झर्शन अनेकांना सारखे वाटणारे; पण अतिशय वेगळ्या अर्थाचे शब्द आहेत. दिवसभर खूप काम असतं त्यामुळे व्यायाम करण्याची गरज नाही असा एक फार मोठा समज आहे; पण तीच-तीच कामे करताना तेच-तेच स्नायू वापरले जातात आणि खरं तर त्यामुळेच थकवा येतो. सगळे स्नायू वापरले जावेत, उत्तम रक्ताभिसरण व्हावे म्हणून व्यायाम करणं अतिशय गरजेचं आहे.
४. आहार हा चौरस घ्यायला हवा. आहारातून सगळी पोषक तत्त्वे मिळतील याची दक्षता घ्यावी. पिष्टमय पदार्थ, प्रथिने, स्निग्ध पदार्थ, हिरव्या भाज्या, फळं, दूध व दुग्धजन्य पदार्थ यांचा योग्य मात्रेत वापर करावा.
५. जेवणाच्या व झोपेच्या वेळा नियमित कराव्यात.

६. योग्य मात्रेत पाणी प्यावं. खूप कमी किंवा खूप जास्त नको.
७. वजन जास्त असेल तरी साध्या-साध्या क्रिया करताना थकवा येतो. त्यामुळे वजन कमी करून नियंत्रणात आणावे.
८. काही आजार अथवा मेडिकल कंडिशन नाही ना की, ज्यामुळे थकवा येऊ शकतो. त्याची तपासणी करून खात्री करायला हवी. वर उल्लेख केल्याप्रमाणे जर काही आजार असतील तर वेळेवर व योग्य उपचार करावेत.
९. बरेचदा व्हिटामिन बी-१२, व्हिटामिन डी-३ किंवा लोह(आयर्न, हिमोग्लोबिन)कमी असते व त्यामुळे प्रचंड थकवा असतो. त्याची औषधं घ्यायलाच हवीत.
१०. इतर कोणत्या आजारासाठी सुरू असलेल्या उपचारांचा परिणाम म्हणून थकवा नाही ना, हेही चेक करावे.

११. मानसिक त्रास असतील तर उपचार, तसेच तो कमी होण्यासाठी प्रयत्न करावेत.
१२. योगासने, ध्यान, योगनिद्रा या उपायांचा फार चांगला उपयोग होतो.
१३. आयुर्वेदात वर्णन केलेले शिरोधारा, अभ्यंग, मर्दन म्हणजेच मसाज वगैरे उपायांचा अवलंब गरजेनुसार नक्की करावा ज्याचा खूप फायदा होतो.
 

Web Title: Fatigue and body aches can have many causes, including medical conditions, lifestyle, and mental health, women suffers a lot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.