शरीराला ताकद मिळावी, ऊर्जा मिळावी यासाठी आपण आहार घेतो. सकाळचा नाश्ता, दोन वेळेसचं जेवण हे आपल्या शरीरासाठी इंधनासारखं काम करत असतं. पण जेवल्यानंतर अनेकांना खूप झोप येते, काही काम सूचत नाही. पण नेहेमीच होतं असं म्हणत याकडे दुर्लक्ष केलं जातं. पण तज्ज्ञ सांगतात की जेवल्यानंतर रोजच सुस्ती आल्यासारखं होत असेल , खूप झोप येत असेल तर ही सामान्य गोष्ट नाही. हे असं का होतं? याचं उत्तर मिळवणं आवश्यक आहे. याविषयीचा अभ्यास सांगतो की जेवल्यानंतर थकवा येण्याचे आणि सुस्ती आणि झोप येण्याची अनेक कारणं आहेत. जेवल्यानंतर सामान्य थकवा येणं आणि खूप थकवा येणं, सुस्ती येणं आणि झोप येणं या वेगळ्या गोष्टी आहेत. यांची कारणं वेगळी आहेत.
छायाचित्र : गुगल
जेवल्यानंतर थकवा ?
तज्ज्ञ सांगतात की, जेव्हा अन्न पोटात जातं, तेव्हा शरीरातील वेगवेगळ्या यंत्रणा या अन्नाचं विभाजन करुन अन्न घटक त्या त्या अवयवांकडे पोहोचवण्याचं काम करायला लागतात. या कामासाठी खूप ऊर्जा लागते. त्यामुळेच जेवल्यानंतर थोडा वेळ थकल्यासारखं वाटतं. ही सामान्य बाब आहे. पण तज्ज्ञ सांगतात की, जेवल्यानंतर प्रमाणापेक्षा खूप जास्त थकवा येत असेल , झोप येत असेल तर खालील कारणं स्वत:च्या बाबतीत तपासून पाहा. त्यावर कृती करा.
छायाचित्र : गुगल
जेवल्यानंतर खूप थकवा किंवा झोप येते कारण..
1. खूप जास्त खाणं - जेवल्यानंतर खूप थकवा येतो याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे आपण काय खाल्लं हे नसून किती खाल्लं हे असतं. जर भूकेपेक्षा जास्त खाल्लं, पोटास तड लागेस्तोवर खाल्लं तर आहारातील अन्न घटकांचं विभाजन करण्याला आपल्या शरीरातील यंत्रणांना जास्त कष्ट पडतात, खूप ऊर्जा लागते. शरीरातल्या यंत्रणेची सर्व ऊर्जा अन्न घटकांचं विभाजन करण्यातच निघून जाते. त्यामुळे खूप थकल्यासारखं होतं. आणि म्हणूनच प्रमाणात जेवणं, भूकेपेक्षा दोन घास कमी खाणं आवश्यक असतं. दोन वेळेच्या जेवणाच्या मधे प्रथिनयुक्त पदार्थ स्नॅक्स म्हणून खायला हवेत.
2. फॅटस आणि कर्बोदकांचं जास्त सेवन- आहार हा नेहेमी संतुलित असायला हवा. एखादा अन्न घटक जास्त आणि एखादा अगदीच कमी असं केलं तर पोट भरतं, पण शरीराला चुकीचं पोषण मिळतं आणि त्यातून समस्या निर्माण होतात. जर जेवणात फॅटस आणि कर्बोदकं जास्त असतील तर हे घटक जेवल्यानंतर झोप येण्यास कारणीभूत ठरतात. लहान आतडयातून स्रवणारं कोलेसिस्टोकिनिन हे यास कारणीभूत मानलं जातं. जर आपण जेवताना फॅट आणि कॅलरीयुक्त पनीर चीझ पिझा खाल्ला तर लहान आतड्यातून कोलेसिस्टोकिनिन हे हार्मोन स्त्रवायला लागतं. याविषयीचं संशोधन असं सांगतं की फॅटसयुक्त पदार्थांचं प्रमाण आहारात जास्त असलं की कोलेसिस्टोकिनिन हे हार्मोन जास्त स्त्रवतं आणि मग झोप येते. फॅटसयुक्त पदार्थ- कोलेसिस्टोकिनिन आणि झोप यात दृढ संबंध असल्याचं संशोधकांना आढळून आलं आहे.
छायाचित्र : गुगल
3. संप्रेरकातलं असंतुलन- जर जेवल्यानंतर रोज खूपच थकल्यासारखं होत असेल , खूप झोप येत असेल तर आधी डॉक्टरांना भेटायला हवं. कारण शरीरात होणार्या क्रियेमुळे हे असं होवू शकतं. तसेच संप्रेरकातलं असंतुलन अर्थत हार्मोनल इम्बॅलन्स यामुळे, इंसुलिनची संवेदनशीलता, शरीरात रक्ताची कमतरता अर्थात अँनेमिया या कारणांनी जेवल्यानंतर थकवा आणि झोप येते.
4. ट्रिप्टोफेन या घटकाचं जास्त सेवन- ट्रिप्टोफेन हे अमिनो अँसिड असतं. जे शरीराला आराम आणि मनाला आनंद देणारं सेरोटोनिन हे हार्मोन स्त्रवण्यास मदत करतं.पण आहारात जर यांचं प्रमाण जास्त झालं किंवा कर्बोदकांसोबत हा घटक जर सेवन केला तर त्याचे विपरित परिणाम दिसतात. चॉकलेट, दूध, ब्रेड , शेंगदाणे या पदार्थात ट्रिप्टोफेन असतं. त्यामुळे जेवताना हा घटक प्रमाणाबाहेर जाणार नाही याची काळजी घ्यायला हवी.
जेवल्यानंतर थोडा थकवा येणं स्वाभाविक आहे पण आति थकवा, सुस्ती आणि झोप ही लक्षणं नेहेमीचं होतं असं म्हणत दुर्लक्ष करण्याच्या पठडीतली नाही हे लक्षात घ्यावं.