Join us   

सतत थकल्यासारखं वाटतं, एकदम डाऊन? नियमित खा 4 गोष्टी, एनर्जीचा उत्तम डोस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2021 1:24 PM

आहारात काही पदार्थांचा समावेश केला तर दिवसभराचा थकवा पळेल दूर

ठळक मुद्दे आहारातून पुरेसे पोषण मिळाले तर ऊर्जा टिकण्यास ठरते फायदेशीरनैसर्गिक गोड असणारे प्रथिने, जीवनसत्त्वे आणि लोहाचे प्रमाण अधिक असणारे पदार्थ एनर्जी बूस्टर म्हणून फायदेशीर

सकाळी उठल्यापासून स्वयंपाकघर, बाहेरची कामे, ऑफीस, डोक्यात सतत असणारे वेगवेगळे ताण यांमुळे दिवस संपत आला की आपण पार थकून जातो. कधी एकदा सगळं संपवतो आणि पाठ टेकतो असे होऊन जाते. महिलांच्या मागे तर विरजण लावलं का, घरातले कोणी आजारी असेत तर त्यानी औषध घेतलं का, सामानातील कोणत्या गोष्टी संपल्यात ते दुसऱ्या दिवशी नाश्ता आणि जेवणाला काय करायचं असे एक ना अनेक विचार डोळे मिटेपर्यंत सुरूच असतात. या सगळ्या गोष्टींमुळे योग्य आहार, पुरेशी झोप घेऊनही अनेकदा आपल्याला सतत थकल्यासारखे वाटते. म्हणावे तसे शारीरिक कष्ट झालेले नसतानाही येणारा हा थकवा सुरुवातीला फारसा गंभीर वाटला नाही तरी भविष्यात त्यामुळे काही त्रास उद्भवण्याची शक्यता असते. त्यामुळे आहारात काही गोष्टींची कमतरता असल्याने वारंवार असा थकवा येऊ शकतो. शरीराला आवश्यक असणारे घटक आपण घेत असलेल्या अन्नातून पुरेसे मिळत नसल्याने अशी समस्या उद्भवू शकते. त्यामुळे तुम्हालाही सतत थकल्यासारखे वाटत असेल तर आहारात या ४ गोष्टींचा समावेश करा. जेणेकरुन तुमची एनर्जी बराच काळ टिकून राहील आणि त्यामुळेच तुमचा मूडही फ्रेश राहण्यास मदत होईल. 

(Image : Google)

१. केळी 

केळं हे सर्वात उत्तम फळ मानलं जातं. याचं कारण म्हणजे केळ्यात पोटॅशियम, फायबर, प्रोटीन जास्त प्रमाणात असते. केळ्यातून शरीराला भरपूर ऊर्जा मिळत असल्याने व्यायामाच्या आधी आणि नंतर केळं खाण्याचा सल्ला दिला जातो. केळ्यात सुक्रोज, फ्रुक्टोज आणि ग्लुकोज या तीन प्रकारच्या नैसर्गिक शर्करा असतात त्यामुळे आपल्याला ते खाल्ल्या खाल्ल्या एनर्जी आल्यासारखे वाटते. तसेच केळं हा कार्बोहायड्रेटसचा सर्वात मोठा सोर्स असल्याने ते खाल्ल्याने आपली एनर्जी बूस्ट व्हायला मदत होते. नियमित केळं खाणंही आरोग्यासाठी आणि रक्तदाब सुरळीत राहण्यासाठी उपयुक्त ठरते. 

२. खजूर 

दिवसात २ किंवा ३ खजूराच्या बिया खाणे आपल्याला एनर्जी देणारे ठरते. गोड असलेल्या सुकामेव्यातील या पदार्थात फायबर पुरेशा प्रमाणात असतात त्यामुळे खजूर खाल्ल्यानंतर तुम्हाला तृप्त झाल्यासारखे वाटते. तसेच तुम्हाला गोड खायची इच्छा होत असेल अशावेळी खजूराच्या बिया खाल्ल्यास तुमची गोड खाण्याची इच्छाही पूर्ण होते. खजूरात पँटोथेनिक अॅसिड, फोलेट आणि नियासिन असे बी व्हिटॅमिनशी निगडीत घटक असतात त्यामुळे तुम्हाला ऊर्जा मिळण्यास मदत होते. खजूर हे साखरेला उत्तम नैसर्गिक पर्याय ठरु शकतात.

३. बीट 

बीटामध्ये भरपूर प्रमाणात लोह असते. बीटात नायट्रेट नावाचा घटक असतो ज्यामुळे शरीरातील ऊर्जा निर्माण करणाऱ्या पेशींचे उत्पादन वाढण्यास मदत होते. खाल्लेल्या अन्नातील पोषक तत्त्वांची निर्मिती आणि पुरवठा करण्यास बीट अतिशय उपयुक्त ठरते, त्यामुळे आपण दिर्घकाळ उत्साही राहू शकतो. बीटाचा वापर तुम्ही हलवा, सलाड, कटलेट अशा वेगवेगळ्या पदार्थांमध्ये करु शकता. त्यामुळे आठवड्यातून तीन ते चार वेळआ तुमच्या आहारात बीट असेल याकडे लक्ष द्या.

(Image : Google)

४. पालक 

हिरव्या पालेभाज्या म्हणजे पोषकतत्त्वांचे भांडारच. यामध्ये भरपूर प्रमाणात खनिजे आणि जीवनसत्त्वे असल्याने शरीरातील विविध क्रिया सुरळीत चालण्यासाठी त्यांचा उपयोग होतो. प्रामुख्याने यामध्ये असणारे लोह आपला थकवा, ताण घालवण्यासाठी अतिशय उपयुक्त ठरते. शरीरात लोहाची कमतरता असेल तर मेंदूच्या पेशींना कमी ऑक्सिजन पुरवठा होतो, त्यामुळे आपल्याला थकवा येऊ शकतो. त्यामुळे पालकाची भाजी, भजी, पालक राईस, पालक सलाड, पराठे, पुऱ्या अशा वेगवेगळ्या माध्यमातून पालकाचा आहारात जास्तीत जास्त समावेश करायला हवा. 

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सआहार योजना