- वैद्य राजश्री कुलकर्णी (एम.डी. आयुर्वेदतज्ज्ञ)
नुकतीच आपण जल्लोषात दिवाळी साजरी केली. खाणं, फिरणं, फटाके, नवीन कपडे, नातेवाईकांच्या भेटीगाठी. सगळं उत्साहात पार पडलं; पण हे सर्व होताना तब्येत मात्र सतत कुरकुरत होती अशी तक्रार कोण्या एकटी दुकटीची नसून दिवाळीसाठी राबराब राबणाऱ्या असंख्य बायकांची आहे. सणवार हे आनंदासाठी, मनाच्या समाधानासाठी असतात. मग असं असताना शरीर थकलेलं, कष्टानं आंबून गेलेलं असतं. सणाच्या आनंदाची जागा दुखण्या खुपण्याने घेतलेली असते. मात्र नीट काळजी घेतल्यास सणांचा आनंद मनमुराद लुटता येईल व छान प्रवासाची मजा देखील घेता येईल. शेवटी सण असतात कशासाठी ? नेहमीच्या मरगळलेल्या आयुष्यात छान आनंद उत्साह यावा म्हणूनच ना ?
हे असं होतं कारण..
१. विशेषतः गौरी गणपती, दसरा, दिवाळी या वर्षातील महत्त्वाच्या व मोठ्या सणांचं बायकांना फार दडपण येतं. घर आवरलं गेलं पाहिजे, साफसफाई झाली पाहिजे, डबे घासले गेले पाहिजेत, सगळ्यांची सगळी खरेदी झाली पाहिजे, घर सजवलं गेलं पाहिजे, पाहुणे येतील त्यांची सरबराई नीट झाली पाहिजे…. ही आणि अशी अनंत टेन्शन्स बायका या काळात घेत असतात. त्यामुळे शारीरिक कष्ट खूप होतात, प्रचंड दगदग होते. एरवी दुपारच्या वेळात किमान घरी असणाऱ्या स्त्रिया थोडा आराम तरी करतात किंवा विश्रांती घेऊ शकतात; पण सणावाराच्या धावपळीत तेही शक्य होत नाही. 'वर्किंग वुमन' तर बिचारी या सगळ्यात पिचून जाते. सगळं घरी करावं म्हटलं तर अतोनात हाल होतात, थकवा येतो आणि काही गोष्टी बाहेरून मागवाव्या किंवा कामं काही एजन्सीकडे सोपवून करून घ्यावीत तर 'गिल्ट' ( अपराधभाव) येतो.
२. घरातली कामं, खरेदी यात जेवण, झोप यांच्या वेळा बदलून जातात. बऱ्याचदा काहीतरी वन डिश मिल करण्यावर भर असतो कारण स्वयंपाक करायला वेळच नसतो, मग कुठे खिचडी टाक, कुठे मॅगी खा अशी खाण्याच्या बाबतीत 'ॲडजेस्टमेंट' केली जाते. त्याच वेळी दुसरीकडे काम करताना थकवा येतो, मरगळ येते. ती दूर व्हावी म्हणून वारंवार चहा प्यायला जातो.
३. दिवाळीत फराळाचे पदार्थ बनवणं हा खूप वेळ खाणारा तसंच खूप तयारी करायची गरज असणारा 'जॉब' आहे. खूप वेळ बसणं, उभं राहणं, गॅस जवळ सतत काम करणं यात पाठ, कंबर आखडून जाते, दुखू लागते.
४. झोपेच्या वेळा बदलतात, झोप पूर्ण होत नाही म्हणून सकाळी उठल्यावर उत्साह वाटत नाही, अशक्तपणा येतो. पण मनाच्या शक्तीने बायका सगळं रेटून नेतात. आपल्या किरकोळ तक्रारींकडे दुर्लक्ष करत राहतात.
५. प्रवास हा सुट्टीतील एक अनिवार्य भाग असतो. स्वतःची गाडी, बस, ट्रेन, विमानाने अशा कोणत्याही माध्यमाने तो होतो. यात पुन्हा रात्री अपरात्री प्रवास होतो, बाहेरचं खाणं पिणं होतं, अपुरी झोप, रात्री जागरण, उन्हात भरपूर फिरणं अशा सगळ्या गोष्टी आधीच बिघडलेलं पित्त अजून बिघडवतात.
परिणाम काय ?
वर उल्लेख केलेली सगळी दीनचर्या ही पित्त प्रधान असल्याने पित्त दोष वाढतो. जास्त दगदग, प्रवास झाल्याने वात दोष निर्माण झाल्याने पाठ दुखणे, कंबर दुखणे, उसण भरणे, चक्कर येणे, डोकं दुखणे, मळमळणे, छातीत जळजळ, जुलाब,थकवा, अशक्तपणा जाणवणे, झोपून रहावेसे वाटणे यासारखी लक्षणं जाणवायला लागतात. सणावारासोबतचे हे शरीराला होणारे त्रास आपण टाळूही शकतो. फक्त त्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतात.
काय करायला हवं ?
१. बायकांनी आपलं स्वास्थ्य टिकवण्यासाठी जेवढं आणि जितकं आपली तब्येत सांभाळून करणं शक्य आहे तेवढेच करावे. अति कष्ट करून कोणतंही मेडल मिळत नाही हे लक्षात ठेवावं.
२. एकावेळी सगळ्या आघाड्यांवर लढू नये. दिवसभर सलग काम न करता थोडी विश्रांती घ्यावी.
४. नोकरी, व्यवसाय करणाऱ्या स्त्रियांनी मनात कोणतीही अपराधी भावना न ठेवता जितकी झेपतील तितकीच कामं घरी करावीत.
* जेवणात काही बदल किंवा वेगळे पदार्थ करायचे असतील तर ते दुपारच्या जेवणात करावेत. रात्री असे पदार्थ खाण्याने पित्ताचा त्रास होऊ शकतो. तळकट, तेलकट,मसालेदार पदार्थ कमी खावेत. खूप पोटभर विविध पदार्थ खाल्ले की हमखास जळजळ होते.
५.प्रवास करायचा असेल तर सोबत थोडे घरचे साधे खाद्यपदार्थ न्यावेत. बाहेर खाताना कमीतकमी त्रास होईल असे साधे पदार्थ निवडावेत.
६. फिरताना उन्हापासून बचाव होईल असे पाहावे. पाणी भरपूर प्यावे.
७. आवळा सुपारी, आवळा candy चघळायला जवळ ठेवावी.
८. खूप चालणे, गड किल्ले चढणे असे प्रवास करणार असल्यास जवळ खोबरेल तेलाची बाटली ठेवावी. रात्री झोपताना पायांना तेल चोळून झोपावं.
९. सर्दी, खोकला, ताप, अंगदुखी यासारख्या तक्रारींसाठी किरकोळ औषधं जवळ ठेवावीत.
(लेखिका आयुर्वेद तज्ज्ञ आहेत.)
rajashree.abhay@gmail.com