भरपूर कामं पडलेली असतात, पण कामांना हात लावण्याची इच्छाच होत नाही. काहीही न करता बसून राहावं, पडून राहावं असं वाटायल लागतं. अंगात ऊर्जाच नाही असं वाटायला लागतं. यालाच सुस्तपणा असं म्हणतात. अनेकदा हा सुस्तपणा आजाराचं कारण असतं तर कधी विशिष्ट आजारावरची औषधं घेतांना सुस्ती येते. पण असं काहीही नसतांना जर कामाचा उत्साहच वाटत नसेल , दिवसभर सुस्त वाटत असेल तर हा सुस्तपणा चुकीच्या जीवनशैलीचा परिणाम समजावा. झोपेतून उठल्यावर उत्साही वाटणं, काम करतांना मनात शरीरात ऊर्जा असणे हे सुस्तपणा घालवण्यासाठी आवश्यक असतं. हा सुस्तपणा घालवण्यासाठी औषधांची नाही तर आपल्या चुकीच्या सवयी बदलून योग्य सवयी जोपासण्याची गरज असते. सुस्तपणा घालवणारे 4 उपाय सहज करता येतात.
Image: Google
सुस्तपणा घालवण्यासाठी..
1. सुस्तपणा घालवण्यासाठीचा महत्त्वाचा उपाय आहाराद्वारे करता येतो. संतुलित आहार घेतल्यानं शरीराचं पोषण होऊन कामासाठी आवश्यक ऊर्जा आणि उत्साह मिळतो. संतुलित आहारात भाज्या, फळं, कडधान्यं, डाळी-साळी, सुकामेवा, प्रथिनं, जीवनसत्त्वं आणि खनिजंयुक्त आहाराची गरज असते. संतुलित आहारामुळे शरीराचा आणि मनावरचा थकवा आणि ताण दूर होतो. उत्साह वाढतो.
2. पुरेशी झोप घेणे हे निरोगी शरीर आणि मनासाठी आवश्यक आहे. किमान 8 तास रात्रीची शांत झोप घेतल्यास सुस्तपणा निघून जातो. त्याचसोबत काम करताना एकाग्रता वाढते. कामाची उत्पादनशिलता वाढते. तसेच काम करण्याचा उत्साह वाढून प्रेरणा मिळते.
Image: Google
3. रात्री वेळेत झोपणे, सकाळी लवकर उठणे हे चांगली सवय आहे. सकाळी लवकर उठून चालायला गेल्यास दिवसभर शरीरात उत्साह राहातो. तसेच निरोगी आरोग्यासाठी सकाळी चालायला जाण्याची सवय फायदेशीर मानली जाते. चालायला जाण्यामुळे केवळ मनाला उत्साह मिळतो असं नाही तर शरीराचीही ताकद वाढते. बैठी जीवनशैली असल्यास सकाळी लवकर उठून चालण्याची सवय लावल्यास सुस्तपणा येण्याची समस्या टाळता येते.
4. पुरेसे पाणी पिऊन सुस्तपणा घालवता येतो. पाणी पुरेसं पिल्यास दिवसभर उत्साही आणि ऊर्जाशील वाटतं. तज्ज्ञ म्हणतात निरोगी आरोग्य आणि उत्साही शरीर आणि मनासाठी दिवसभरात किमान 4 लिटर पाणी पिणं आवश्यक आहे. पुरेशा पाण्यामुळे शरीर आतून कोरडं होत नाही. पाण्यासोबतच लिंबू पाणी, फळांचा रस आहारात असणं आवश्यक आहे. पाणी पुरेसं शरीरात गेल्यावर मन समाधानी राहातं आणि आरोग्य सुदृढ राहातं. तज्ज्ञ म्हणतात हे उपाय करुनही सुस्तपणा गेला नाही, दीर्घकाळ निरुत्साही वाटत असल्यास आधी डाॅक्टरांचा सल्ला घ्यावा. सुस्तपणा हे एखाद्या छोट्या मोठ्या आजाराचं लक्षणही असतं. म्हणून सुस्तपणाकडे दुर्लक्ष करु नये.