दिवाळी म्हटली की मज्जा-मस्ती, नातेवाईक आणि मित्रमंडळींचे गेट-टुगेदर, जागरणं आणि धमाल. सुट्ट्यांचे दिवस असल्याने नाइट-आऊटस आणि बरंच काही. यात फराळाचे पदार्थ आणि इतर कॅलरी वाढविणाऱ्या पदार्थांचा समावेश तर आलाच. हे सगळे असले तरी काही लोकांना मात्र सणावारांची आणि विशेषत: दिवाळीची फारच भिती वाटते. याचे मुख्य कारण म्हणजे दिवाळीतला फराळ खाऊन आपले आधीच जास्त असलेले वजन आणखी तर वाढणार नाही ना असा प्रश्न त्यांना पडलेला असतो. पण या भितीने तुम्ही दिवाळीतील मजेचे दिवस वाया घालवाल आणि आयुष्यातील आनंदाचे क्षण विनाकारण खराब कराल. तेव्हा तुम्हाला दिवाळीत मनसोक्त खायचे असेल, जागरणे करायची असतील आणि नेहमीचे नियम मोडून वागायचे असेल तर काळजी करु नका. हे केल्याने मी जाड होईन का, ते केल्याने माझ्या कॅलरीज वाढतील का असा विचार करुन मजा करायची राहून जाईल. यासाठी प्रसिद्ध आहारतज्ज्ञ ऋजूता दिवेकर यांनी काही खास टिप्स दिल्या आहेत. पाहूयात त्या नेमके काय सांगतात...
१. दिवाळीच्या दिवसांत तुम्ही एकमेकांकडे राहायला गेल्याने किंवा नाइट आउटस केल्याने तुमचे एक दोन वेळा जागरण होणार असेल, तर काळजी करु नका. वर्षभरातील इतर दिवस वेळच्या वेळी झोपा आणि काही सणवार, लग्नसमारंभ यांच्यावेळी असे जागरण झाले तरी काळजी करु नका. अशावेळी मनापासून एन्जॉय करा. जागरण होणार, काही खाल्ले जाईल म्हणून दिवसभर कमी खाल्ले असे करु नका. तर नेहमीप्रमाणे वेळच्या वेळी जितके खाता तितकेच खा. दिवसा कमी खाल्ले तर रात्रीच्या वेळी जास्त खाल्ले जाते आणि ते आरोग्यासाठी चांगले नसते. अशाप्रकारे रात्री जास्त खाल्ले गेले तर अॅसिडीटी, अस्वस्थता आणि हातापायात गोळे येणे असे त्रास उद्भवू शकतात.
२. जर रात्री बाहेर जाणार असाल तर केळी किंवा दही-भात खा. केळे आणि दहीभातामध्ये प्रीबायोटीक आणि प्रोबायोटीक घटक असल्याने पचनक्रिया चांगली राहण्यास त्याची मदत होते. तसेच बाहेर जेवायला गेलात तर कोणतेही दोनच स्टार्टर खा. त्यानंतर मुख्य जेवणामध्ये एकाच प्रकारचे केवळ ३ पदार्थ खा. म्हणजेच हल्ली बऱ्याचदा चायनिज, थाई, लेबनिज, इटालियन, पंजाबी, राजस्थानी, महाराष्ट्रीयन, दक्षिण भारतीय असे वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ एकत्रित जेवणासाठी ठेवलेले असतात. पण अशाप्रकारे वेगवेगळे प्रकार एकाच जेवणात खाणे योग्य नसून कोणत्याही एकाच प्रकारातील पदार्थ खाणे योग्य आहे. याठिकाणी तुम्ही काही गोड खाणार असाल तर फ्रेश तयार केलेले किंवा दिवाळीशी निगडित अशी मिठाई असेल तरच खा. आईस्क्रीम, केक, कुकीज अशी वर्षभर उपलब्ध असणारी मिठाई याठिकाणी खाणे टाळा.
३. रात्री उशीरा घरी आल्यानंतर पायाला थोडे तूप लावा. त्यामुळे तुम्हाला शांत झोप येण्यास मदत होईल. तसेच तुम्ही दिवाळी पार्टीच्या ठिकाणी खेळताना किंवा एकमेकांशी गप्पा मारताना ओरडून बोलला असाल तर घशाला आराम मिळणे आवश्यक असते. त्यासाठी कोमट पाणी प्या. झोपताना फोन हातात घेणे टाळा, सोशल मीडियावर वेळ न घालवता लगेच झोपल्यास तुम्हाला शांत आणि वेळेत झोप लागण्यास मदत होईल.
४. गोड पदार्थ हा आपल्या सेलिब्रेशनचा, सणावारांचा सर्वात महत्त्वाचा घटक असतो. सध्या सणवार कमर्शिअल झाले आहेत. पण पारंपरिक पद्धतीने हे सण साजरे केले तर त्यातून तुम्हाला आनंदही मिळतो आणि तुम्ही त्याचा पूर्णपणे आनंद घेऊ शकता. साखर विष नसून आपण आपली संस्कृती, परंपरा सोडून सण साजरे करतो हे सर्वाधिक विषारी आहे. त्यामुळे तुमच्या कुटुंबात तयार केले जाणारे ३ गोड पदार्थ तुम्ही यावर्षी घरी तयार करा. त्याच्या रेसिपी तुम्ही कोणाकडून तरी शिका. ही मिठाई तुम्ही तयार करा, एकमेकांसोबत शेअर करा आणि स्वत: खाऊन त्याचा आनंद घ्या. सात्विक पद्धतीने पदार्थ केला आणि खाल्ला तर तुम्ही अजिबात जाड होणार नाही.
५. गोड खाण्याची योग्य वेळ कोणती असा प्रश्न आपल्यातील अनेकांना पडतो. तर शंकरपाळ्यासारखा पदार्थ तुम्ही सकाळी नाश्त्याच्या वेळी, सकाळी ११ वाजता किंवा ४ च्या चहाच्या वेळी खाऊ शकता. तसेच लाडू किंवा बर्फीसारखे पदार्थही तुम्ही याच वेळात खाल्लेले चांगले. तर खीर किंवा हलवा यांसारखे पदार्थ तुम्ही दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणात खायला हवेत. दिवाळीच्या काळात एक ताजे स्वीट आणि मधल्या वेळेत खाल्ला जाणारा एक फराळाचा पदार्थ असे दोन वेळा गोड तुम्ही नक्की खाऊ शकता.
६. तळलेल्या पदार्थांबाबत आपण कायम घाबरतो. पण आपल्याकडे परंपरेने तयार केले जाणारे फराळाचे पदार्थ खायला काहीच हरकत नाही. हे पदार्थ आपल्या ठिकाणी मिळणाऱ्या स्थानिक तेलात तळलेले असायला हवे. हे वापरलेले तेल पुन्हा वापरु नका. हे पारंपरिक पदार्थ तुम्ही जगात कितीही पैसे दिले तरी मिळणार नाहीत, त्यामुळे या पदार्थांचे महत्त्व समजून घेऊन त्यांचा आनंद घ्यायला हवा.
७. तळलेले पदार्थ खाल्ल्याने तुम्हाला तृप्त झाल्यासारखे वाटते. तसेच यामुळे तुमचे गोड खाण्याची इच्छा कमी होते. हेच पदार्थ एअर फ्राय केले तर त्यातून आपल्याला म्हणावी तितकी मजा येत नाही. पण अशाप्रकारे एअर फ्राइड केलेले पदार्थ आरोग्यासाठी अजिबात चांगले नसतात. हे लक्षात ठेऊन दिवाळीचा पुरेपूर आनंद घ्यायला हवा.
८. आपण कुठे गेलो तर आपल्याला आग्रहाने खूप खायला घातले जाईल, आपले खूप आदरतिथ्य होईल असा विचार आपण करत असतो. पण अशाप्रकारे आपल्याला प्रेमाने खायला घालणारी माणसं आपल्या आजुबाजूला आहेत यासाठी आपण देवाचे आभार मानायला हवेत. लोकांना त्यांचे अन्न आपल्यासोबत शेअर करावेसे वाटते यासाठी आपल्याला त्यांच्याबद्दल आदरभाव असायला हवा. सेलिब्रेशन हा आपल्या संस्कृतीचा एक भाग असून आपल्याकडे अशाप्रकारचे एकत्र येणे, एकमेकांना खायला घालणे हे केले जाते.