Join us   

थंडीत बोटं सुजतात, दुखतात? 11 घरगुती उपाय, हाताची बोटं दुखणं कमी   

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2022 5:02 PM

हिवाळ्यात हातापायाची बोटं सुजून दुखतात. सहज हालचालींमुळेही वेदना होतात. थंडी कमी झाल्यावर हा त्रास कमी होतो म्हणून सहन करणं चुकीचं, त्यापेक्षा सोपे सहज  घरगुती उपाय करुनही ही समस्या काबूत राहाते.

ठळक मुद्दे मोहरीचं तेल आणि सैंधव मीठ उपाय प्रभावी ठरतो.लिंबाचा रस, कांद्याचा रस थंडीमुळे येणारी सूज आणि वेदना कमी करण्यास असरदार ठरतात.खोबऱ्याच्या तेलात भीमसेनी कापूर घालून या तेलानं मसाज केल्यानं थंडीत जखडणारी  बोटं नरम गरम राहातात.

हिवाळ्यात कडाक्याची थंडी कधी पडते अशी वाट अनेकजण बघत असतात. कारण या कडाक्याच्या रात्री शेकोटी पेटवून त्याभोवती बसून गप्पा मारण्याची मौज लुटता येते. हुरड्या पार्ट्यांना खरी रंगत आणि चव येते ती कडाक्याच्या थंडीतच. पण अनेकांसाठी हिवाळा म्हणजे वेदनांची शिक्षा असते. रोजची साधी साधी साधी कामं करताना, थोडंसं चालल्यावरही जीव नकोसा होतो, इतक्या वेदना  हाता पायांच्या बोटांना होतात. नेहमीचं म्हणून याकडे दुर्लक्ष करुन हिवाळा संपण्याची वाट बघितली जाते. वेदना घालवणारी औषधं घेतल्याने फायद्यापेक्षा दुष्परिणामच जाणवतात, म्हणून औषधं घेणं टाळलं जातं. पण म्हणून कोणताही उपाय न करता वेदना सोसण्यानं केवळ त्रासच होतो. अशा परिस्थितीत घरचे उपाय केल्यास त्यामुळे हाता पायांची बोटं कडाक्याच्या थंडीतही कडक होत नाही, दुखत नाही. उलट हातापायाच्या बोटांना, तेथील त्वचेला हवे असलेले ऊबदार फायदे होतात. हातापायाची बोटं नरम राहातात. थंडीत हालचालींवर मर्यादा येत नाही आणि कामं करताना वेदनाही होत नाही. 

Image: Google

कडाक्याच्या थंडीचा परिणाम नसांवर, रक्तवाहिन्यांवर होतो. नसा आंकुचित पावतात. त्याचा परिणाम म्हणजे त्याभागाल रक्त पुरवठा नीट होत नाही. हातापायांच्या नसा थंडीत आंकुचन पावतात. त्यामुळे हातापायाची बोटं सूजणे, वेदना होणं, हालचाली करणं अवघड होणं, बोटं बधिर होणं,  लाल होऊन असह्य खाज येणं यासारखे  त्रास होतात. हे त्रास टाळण्यासाठी घरच्याघरी करता येतील असे उपाय आहेत. 

Image: Google

थंडीत सुजणाऱ्या दुखणाऱ्या बोटांसाठी..

1. मोहरीचं तेल आणि सैंधव मीठ उपाय प्रभावी ठरतो. यासाठी एका वाटीत 4 चमचे मोहरीचं तेल आणि 1 चमचा सैंधव मीठ घ्यावं. ते चांगलं एकत्र करावं. रात्री झोपण्याआधी हे तेल गरम करुन कोमट करुन घ्यावं. कोमट तेलानं हाता पायांच्या बोटांना हलक्या हातानं 5-10 मिनिटं मसाज करावा. मसाज झाला की हात पाय नीट झाकले  जातील अशी गोधडी घेऊन झोपावं. हा उपाय हिवाळ्यात रोज रात्री केल्यास सकाळी आणि दिवसभर हाता पायांच्या बोटांवर सूज येत नाही आणि वेदनाही लक्षणीयरित्या कमी होतात.

Image: Goolge

2. ॲलोवेरा तेल हे जिवाणुविरोधी आणि दाहरोधक असल्याने या तेलाचा फायदा सूज आणि दाह कमी करण्यासाठीही होतो. यासाठी ॲलोवेरा तेल  कोमट करुन त्याने हाता पायांच्या बोटांना मसाज करावा. 

3. कांदा किसून त्याचा रस एका वाटीत काढावा. या रसानं  दिवसा किंवा रात्री झोपण्यापूर्वी थोडा वेळ कांद्याच्या रसानं हाता पायांना  मसाज करावा. साधारण एक दिड तास राहू द्यावं. नंतर कोमट पाण्यानं हात पाय धुतले तरी चालतात. कांद्याच्या रसानं सूज आणि वेदना कमी होतात. द्खणाऱ्या बोटांना ऊब मिळते. 

Image: Google

4. लिंबाचा रसही सूज कमी करण्यासाठी उपाय म्हणून वापरता येतो. यासाठी एक ते दोन चमचे लिंबाचा रस काढून घ्यावा. तो हातापायांच्या बोटांना चोळून लावावा. या मसाजनं वेदनाही शमतात.

5. बटाटा कापून त्याचा रस काढावा आणि त्यामधे थोडं मीठ घालावं. ते चांगलं एकत्र करुन ते लावल्यस सूज कमी होऊन बोटांना आराम मिळतो. 

Image: Google

6.  2 चमचे ऑलिव्ह ऑइल घ्यावं. त्यात थोडी हळद घालावी. हे नीट मिसळून घ्यावं. हा लेप थोडा कोमट करुन सूज आलेल्या बोटांवर रात्री लावून ठेवल्यास सकाळी सूज कमी होते आणि हातापायाची हालचाल करणं सुलभ जातं. 

7. 2 मोठे चमचे मोहरीचं तेल गरम करुन नुसत्या तेलानं मसाज केल्यानंही सूज आणि वेदना कमी होतात.

8.  कोरफडीचा ताज गर किंवा जेल स्वरुपातील कोरफड घेऊन त्याने पायाच्या बोटांना हलक्या हातानं मसाज केल्यास बोटातील नसा मोकळ्या होवून सूज कमी होते.

Images: Google

9. मध आणि हळद याचाही लेप करुन लावल्यास थंडीत होणाऱ्या वेदनांना आराम मिळतो. यासाठी हळकुंडं घ्यावं. ते सहाणेवर थोडं पाणी घालून उगळावं. या हळदीत मध घालून ते एकजीव करुन त्याचा लेप जिथे सूज येते, वेदना होतात तिथे लावावा. तो भरपूर वेळ राहू द्यावा.

10. एका वाटीत थोडं खोबऱ्याचं तेल घ्यावं. त्यात थोडा भीमसेनी हा औषधी गुणधर्माचा कापूर मिसळावा. तो तेलात बोटांनी दाबत हलवून मिसळून लावावा. हे मिश्रण थोडं कोमट करावं आणि ते सूज आलेल्या आणि दुखणाऱ्या बोटांवर मसाज करत लावल्यास वेदना कमी होतात.

11. हिवाळ्यात रोज झोपण्यापूर्वी लोखंडी तवा चांगला करम करुन रुमालाच्या सहाय्यानं हात पाय आणि बोटं शेकावीत. हातापायात मोजे घालून झोपल्यास ऊब मिळून बोटांना सूज येत नाही आणि वेदनाही होत नाही. 

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सहोम रेमेडी