आपण झोपेतून उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत विविध प्रकारचा आहार घेत असतो. आपण घेत असलेल्या आहारावर आपले आरोग्य अवलंबून असते. त्यामुळे आपला आहार पौष्टीक असावा असे वारंवार सांगितले जाते. पण आपण काय खातो हे जितके महत्त्वाचे असते तसेच आपण ते अन्न कसे खातो हेही तितकेच महत्त्वाचे असते. कारण आपण खाताना आपल्या मनात असलेला भाव, आपली खाण्याची पद्धत यावर आपण खात असलेले अन्न आपल्याला कसे पचणार हे अवलंबून असते. आपण खात असलेल्या अन्नातून जास्तीत जास्त पोषण मिळावे यासाठी खाताना काही गोष्टींकडे आवर्जून लक्ष द्यायला हवे. प्रसिद्ध हेल्थ कोच शिवांगी देसाई यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स शेअर करतात, त्या कोणत्या समजून घेऊया (Follow 3 rules before eating for getting more nutrition from food)...
१. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे खायला सुरू करण्याआधी डोळे बंद करून काही मिनिटे शांत बसायचे. ३० सेकंद ते एक मिनिट शांत बसायचे आणि श्वासावर लक्ष केंद्रित करायचे. अशाप्रकारे शांत बसल्याने आपल्या शरीरातील सर्व क्रिया काही वेळासाठी संथ होतात. तसेच यावेळी आपल्या शरीरातील परासिंपथेटीक नर्व्हस सिस्टीम ॲक्टिव होतात आणि यामुळे आपण खात असलेल्या अन्नातील पोषण शरीराला जास्तीत जास्त प्रमाणात मिळण्यास मदत होते.तसेच दीर्घ श्वास घेतल्याने आपल्या डोक्यातील विचार कमी होण्यास मदत होते आणि आणि आपण जेवणावर अधिक चांगल्या पद्धतीने लक्ष केंद्रित करू शकतो.
२. जेवायला सुखासनात म्हणजेच जमिनीवर मांडी घालून बसणे आरोग्याच्या दृष्टीने अतिशय फायदेशीर असते. या अवस्थेत बसल्याने पाठ ताठ राहते आणि शरीराच्या खालच्या भागाकडून वरच्या भागाकडे रक्ताभिसरण क्रिया सुरळीत होण्यास मदत होते. त्यामुळे पुन्हा अन्नातील पोषण चांगल्या प्रकारे शरीरात शोषले जाते.
३. आपण जे खातो त्याआधी एकदा न विसरता हात जोडून देवाचे आभार मानायला हवेत. याचे कारण म्हणजे आपल्या ताटात येणाऱ्या अन्नासाठी असंख्य हात आपल्या कळत नकळत राबत असतात. त्यांचे एकदा आवर्जून आभार मानायला हवेत. त्यामुळे आपल्याला खाल्लेले अन्न चांगल्या रीतीने पचण्यास मदत होते. अनेकदा आपण ताटातल्या अन्नाला नावं ठेवतो, पण तसे करणे योग्य नाही.