Join us   

हाडांच्या बळकटीसाठी आहारात नियमित हवेत ३ पदार्थ, सेलिब्रिटी आहारतज्ज्ञ सांगतात...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2022 2:13 PM

Food That Make Your Bone Healthy : बैठी जीवनशैली, चुकीचा आहार, व्यायामाचा अभाव आणि शरीरात असलेली पोषक घटकांची कमतरता यांमुळे हाडे दुखतात किंवा कमकुवत होतात

ठळक मुद्दे कॅल्शियमचे भरपूर प्रमाण असलेली नाचणी आपण आंबील, लाडी, धीरडे, भाकरी, इडली अशा वेगवेगळ्या पदार्थांमध्ये वापरु शकतो.शरीराचे कार्य सुरळीत होण्यासाठी हाडे बळकट असणे आवश्यक असते, त्यादृष्टीने आहार घ्यायला हवा

आपली हाडं ठणठणीत असतील तर आपली तब्येत चांगली राहते. आपले शरीर ज्या हाडांच्या आधारावर उभे असते आणि दिवसभर काम करते ती हाडं बळकट नसतील तर आपल्या हालचालीवर मर्यादा येतात आणि तब्येतीच्या कुरबुरी सुरू होतात. त्यामुळे हाडे ठणठणीत असणे आणि त्यांचे योग्य ते पोषण होणे आवश्यक असते. सततची बैठी जीवनशैली, चुकीचा आहार, व्यायामाचा अभाव आणि शरीरात असलेली पोषक घटकांची कमतरता यांमुळे हाडे दुखतात किंवा कमकुवत होतात. पण या सगळ्या गोष्टींकडे नीट लक्ष दिल्यास हाडांच्या समस्या डोके वर काढत नाहीत. अनेकदा कमी वयातही आपली हाडे ठणकतात यामागे प्रामुख्याने हीच असण्याची शक्यता असते (Food That Make Your Bone Healthy) . 

(Image : Google)

अनेकदा शरीरात कॅल्शियमची कमतरता किंवा व्हिटॅमिन डी आणि इतर घटकांची कमतरता असेल तर हाडे दुखण्याचा त्रास उद्भवतो. कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी अशा गोष्टी आहेत ज्यांचे प्रमाण योग्य असेल तर हाडांच्या तक्रारी कधीच उद्भवणार नाहीत. सेलिब्रिटी आहारतज्ज्ञ नमामी अग्रवाल (Namami Agarwal) हाडांच्या बळकटीसाठी आहारात असायलाच हव्यात अशा ३ गोष्टी सांगतात. आपल्या स्वयंपाकघरात या गोष्टी सहज उपलब्ध असल्याने त्यांचा आहारात समावेश केल्यास हाडांचा कमकुवतपणा दूर होण्यास मदत होते. पाहूयात हे ३ पदार्थ कोणते आणि त्याचा हाडांना कसा फायदा होतो.

१. बीन्स 

हाडं मजबूत ठेवण्यासाठी बीन्स म्हणजेच फरसबी किंवा श्रावण घेडव्याचा आहारात जरुर समावेष करायला हवा. यामध्ये मोठ्या प्रमाणात कॅल्शियम असून हाडे मजबून ठेवण्याबरोबरच हाडांची चांगली वाढ व्हावी यासाठी ही भाजी अतिशय चांगली असते. हाडांचे होणारे नुकसान बीन्स खाल्ल्यामुळे भरुन निघते. बीन्स या केवळ भाजीच्या स्वरुपात खाता येतात असे नाही तर व्हेज सूप, व्हेज पुलाव, दलिया अगदी मॅगी आणि नूडन्समध्येही बीन्सचा वापर करता येतो. हाडांबरोबरच ताणतणाव कमी करण्यासाठी आणि झोपेच्या समस्यांवर उपाय म्हणून बीन्स उपयुक्त ठरतात. 

२. तीळ 

तीळ हा स्वयंपाकघरात नेहमी वापरला जाणारा पदार्थ. तीळ प्रकृतीने उष्ण तर असतातच पण त्यामध्ये तांबे, मॅग्नेशियम, कॅल्शियम, ओमेगा ३ फॅटी अॅसिड, प्रोटीन असे अनेक घटक असतात. पाव कप तीळामध्ये २०० कॅलरी आणि ३५१ मिलीग्रॅम कॅल्शियम असते. तसेच याचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असल्याने डायबिटीस असणाऱ्या रुग्णांसाठी तीळ अतिशय फायदेशीर असतात. 

३. नाचणी 

आपण गहू, ज्वारी, तांदूळ ही धान्ये खातो त्या तुलनेत नाचणीचे पीठ फारच कमी खातो. मात्र नाचणी आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त असून तिचा आहारात नियमितपणे समावेश करायला हवा. लहान मुलांपासून वयस्कर व्यक्तींपर्यंत सगळ्यांसाठी नाचणी अतिशय उपयुक्त असते. कॅल्शियमचे भरपूर प्रमाण असलेली नाचणी आपण आंबील, लाडी, धीरडे, भाकरी, इडली अशा वेगवेगळ्या पदार्थांमध्ये वापरु शकतो. उन्हाळ्याच्या दिवसांत शरीर थंड ठेवण्यासाठी नाचणीचा उपयोग होतो. 

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सआहार योजना