Join us   

थंडीत हे ५ पदार्थ खात असाल तर कॉन्स्टीपेशनचा त्रास वाढेल, पचनाच्या समस्या टाळा, पोट सांभाळा..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2022 1:44 PM

Foods that Cause Constipation in Winters : पोट योग्य पद्धतीने योग्य वेळी साफ झाले नाही तर आरोग्याच्या विविध समस्यांना सामोरे जावे लागते.

ठळक मुद्दे आहारात फायबर योग्य प्रमाणात नसे तर पोट साफ होण्यात अडचणी येतात. म्हणूनच आराहाबाबत योग्य ती काळजी घ्यायला हवी, जेणेकरुन आरोग्य चांगले राहण्यास मदत होते.

थंडीच्या दिवसांत आपल्यापैकी अनेकांना पोट साफ व्हायला त्रास होतो. कॉन्स्टीपेशन ही या काळात उद्भवणारी एक अतिशय महत्त्वाची समस्या असते. थंडीमुळे शरीरात एकप्रकारचा कोरडेपणा येतो. तसेच थंडीत पाणी कमी प्यायले गेल्याने खाल्लेल्या अन्नाचे योग्य पद्धतीने पचन होत नाही. त्यामुळे बद्धकोष्ठतेसारखी समस्या उद्भवते. अशावेळी आपण घेत असलेल्या आहारात बदल करणे आवश्यक असते. थंडीत आवर्जून तूप, फळे, पालेभाज्या, सूप यांचे सेवन करण्याचा सल्ला दिला जातो. मात्र आपण आहाराबाबतच्या काही गोष्टींकडे पुरेसे लक्ष देत नाही. पोट योग्य पद्धतीने योग्य वेळी साफ झाले नाही तर आरोग्याच्या विविध समस्यांना सामोरे जावे लागते. म्हणून बद्धकोष्ठतेचा त्रास होऊ नये म्हणून आहारात कोणत्या गोष्टी आवर्जून टाळायला हव्यात ते पाहूया (Foods that Cause Constipation in Winters). 

१. प्रोसेस्ड धान्य 

अनेकदा आपण आहारात प्रोसेस केलेल्या धान्याचा प्रामुख्याने वापर करतो. मात्र धान्यात फायबरचे प्रमाण जास्त असेल तर पचनाची क्रिया सुलभ व्हायला मदत होते. त्यामुळे ब्रेड, पांढरा शुभ्र तांदूळ अशा गोष्टी घेण्यापेक्षा नेहमीचे धान्य वापरायला हवे. 

२. कच्ची केळी

केळी ही पचन सुलभ होण्यासाठी उपयुक्त असतात हे आपल्याला माहित आहे. केळ्यामध्ये फायबर असल्याने पोट साफ होण्यात त्याची मदत होते, पण कच्च्या केळ्यांमध्ये स्टार्चचे प्रमाण जास्त असल्याने पोट साफ होण्यात अडथळे निर्माण होतात.  

३. अल्कोहोल आणि कॉफी

पोट साफ होण्यासाठी थंडीत पाणी योग्य प्रमाणात प्यायला हवे. ज्यामुळे पचनक्रिया सुलभ होते. मात्र अल्कोहोल आणि कॉफीसारखी पेय सतत प्यायल्यास कोठा जड होतो आणि पोट साफ होण्यात अडचणी येतात. अनेकांना कॉफी आणि अल्कोहोलचे व्यसन असल्याने त्यांना कॉन्स्टीपेशनचा त्रास होण्याची शक्यता असते. 

४. डेअरी उत्पादने 

दूध आणि दुग्धजन्य पदार्थांची अॅलर्जी असलेले बरेच जण आपल्या आजुबाजूला असतात. त्यांना या पदार्थांमुळे जुलाब आणि गॅसेसचे त्रास होतात. पण याचाच साईड इफेक्ट म्हणून अनेकांना कॉन्स्टीपेशनचा त्रास होण्याचीही शक्यता असते. 

(Image : Google)

५. जंक आणि फास्ट फूड

जंक फूड किंवा फास्ट फूड आरोग्यासाठी अजिबात चांगले नसते हे आपल्याला माहित आहे. मात्र तरीही जीभेचे चोचले पुरवण्यासाठी आपण हे पदार्थ खातो. पिझ्झा, बर्गर, आईस्क्रीम, चिप्स, बिस्कीट या पदार्थांमध्ये जास्त प्रमाणात मीठ आणि साखरेचा वापर केलेला असतो. तसेच या पदार्थांमध्ये फॅटसचे प्रमाण खूप जास्त असून फायबरचे प्रमाण अतिशय कमी असल्याने हे पदार्थ जास्त प्रमाणात खाल्ल्यास पोट साफ होत नाही. 

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सलाइफस्टाइल