भाज्या आपल्या आहारातील अतिशय महत्त्वाचा घटक असतात. भाज्यांमुळे आपल्याला विविध प्रकारची खनिजं, व्हिटॅमिन्स मिळतात. त्यामुळे शरीर सुदृढ होण्यास मदत होते. प्रत्येक भाजी करण्याची आणि खाण्याची वेगवेगळी पद्धत असते. भारतात तर प्रत्येक प्रांतात ही भाजी करण्याची पद्धत बदलते. पालेभाज्या आपण शिजवून त्यामध्ये डाळ किंवा डाळीचे पीठ घालून खातो. तर फळभाज्या शिजवून खातो. सॅलेडची कोशिंबीर करतो किंवा ते उकडून नाहीतर कच्चे खातो. मात्र काही वेळा वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपीत आपण काही भाज्या कच्च्या खाण्याची शक्यता असते (Four vegetables that should never be consumed raw).
भाज्या कच्च्या खाल्ल्या तर त्याचा शरीराल त्रास होऊ शकतो. अशा कोणत्या भाज्या आहेत ज्या अजिबात कच्च्या खाऊ नयेत आणि कच्च्या खाल्ल्या तर आपल्याला त्याचा काय त्रास होतो याबद्दल डॉ. डींपल जांगडा अतिशय महत्त्वाची माहिती देतात. काही भाज्या या परजीवी किंवा जीवाणू आणि जीवाणूंची अंडी यांचे घर असतात. हे जीवाणू आपल्या आतड्यात किंवा रक्तप्रवाहात प्रवेश करतात. काहीवेळा ते मेंदूतही प्रवेश करतात, यामुळे डोकेदुखी, पोटाचे आजार, फुफ्फुसे किंवा यकृताचे आजार होण्याची शक्यता असते. त्यामुळे कोणतीही भाजी कच्ची न खाता ती योग्य पद्धतीने शिजवून, ब्लेंच करुन, वाफवून किंवा उकडून खायला हवी.
अळू
अळू ही भाजी कधीच कच्ची खाऊ नये. आहारात वापरण्यापूर्वी ती नेहमी गरम पाण्यात ब्लँच करा. पालक आणि केल यांनाही हाच नियम लागू होतो. त्यांना गरम पाण्यात ब्लँच करा कारण त्यांची ऑक्सलेट पातळी उच्च असते, पाण्यात ब्लँच केल्याने ती कमी होते.
कोबी
यामध्ये एकप्रकारचे जंत आणि त्यांची अंडी असतात. अनेकदा हे जंत अदृश्य स्वरुपात असल्याने ते साध्या डोळ्यांना दिसू शकत नाहीत. भाज्यांवर किटकनाशके मारली तरीही काही वेळा हे जंत मरत नाहीत आणि त्यामुळे आपल्या आरोग्याला धोका उद्भवू शकतो. म्हणून कोबी खाण्यापूर्वी तो गरम पाण्यात स्वच्छ धुवून घ्यायला हवा. तसेच ही भाजी चांगली चांगली शिजवून मगच खायला हवी.
शिमला मिरची
शिमला मिरचीचे देठ आणि बिया काढणे अतिशय महत्त्वाचे असते कारण त्यामध्ये काही जंतू असण्याची शक्यता असते. अनेकदा हे जंतू लपलेल्या अवस्थेत असतात त्यामुळे पोटाला त्रास होऊ शकतो. शिमला मिरचीच्या आतही हे जंतू आणि त्यांची अंडी वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे ही भाजी खाताना काळजी घ्यावी.
वांगी
वांग्यात आणि त्यांच्या बियांमध्येही जंतू असण्याची शक्यता असते. हे जंतू आपल्या रक्तप्रवाहात जातात आणि आपल्या शरीराला हानी पोहचवतात. त्यामुळे वांगी खाण्याआधी चांगली शिजवून घेणे महत्त्वाचे असते. म्हणूनच श्रावणात आणि चातुर्मासात ही भाजी खाणे टाळले जाते.