Join us   

फळं खाताय खरं, पण काही फळं एकत्र करुन खाणं जीवावर बेतू शकतं!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2021 4:56 PM

एकाच वेळी विविध फळं खाण्याचीही अनेकांना सवय असते. पण काही फळं सोबत खाणं हे आरोग्यासाठी हानिकारक असतात. डॉक्टरांच्या म्हणण्याप्रमाणे काही फळं एकत्र खाण्याची चूक कधीही करु नये. तसेच फळं आणि काही विशिष्ट पदार्थ, फळं आणि विशिष्ट भाज्या हे सोबत खाणंही धोकादायक असतं.

ठळक मुद्दे पपई आणि लिंबू एकत्र खाणं म्हणजे अँनेमियासारख्या आजाराला आमंत्रण देण्यासारखं आहे.डॉक्टरांच्या मते केळासोबत पुडिंग खाणं म्हणजे शरीरात विषारी घटक निर्माण करुन घेणं आहे.सलाड आणि फळं हे एकत्र खाणं आरोग्यास हानिकारक असतं. कारण फळांमधे असलेली साखर भाज्यांसोबत पचवणं हे शरीरास अवघड होतं.

फळं ही आपल्या आरोग्यासाठी महत्त्वाचीच असतात. फळांमधून आपल्या शरीराला खनिजं, जीवनसत्त्वं मिळतात. निरोगी आणि दीर्घ आयुष्यासाठी फळं खाणं आवश्यक आहे. पण एका वेळी विविध फळं खाण्याचीही अनेकांना सवय असते. पण काही फळं सोबत खाणं हे आरोग्यासाठी हानिकारक असतात. डॉक्टरांच्या म्हणण्याप्रमाणे काही फळं एकत्र खाण्याची चूक कधीही करु नये. तसेच फळं आणि काही विशिष्ट पदार्थ, फळं आणि विशिष्ट भाज्या हे सोबत खाणंही धोकादायक असतं. ते टाळण्याचा सल्ला डॉक्टर्स देतात. हे जर टाळायचं असेल तर आधी त्यांची माहिती असणं आवश्यक आहे.

छायाचित्र- गुगल

... असं खाणं हानिकारकच!

1. पपई आणि लिंबू - डॉक्टर पपई आणि लिंबू यांचा संयोग हानिकारक असतो असं सांगतात. या दोन्ही गोष्टी एकत्र रक्तातील हिमोग्लोबीनशी संबंधित समस्या वाढवतात्. शिवाय पपई आणि लिंबू एकत्र खाणं म्हणजे अँनेमियासारख्या आजाराला आमंत्रण देण्यासारखं आहे.

2. संत्री आणि गाजर- संत्री आणि गाजर या दोन गोष्टी कधीही एकत्र खाऊ नये. आतड्यांशी संबंधित समस्या यातून उदभवू शकतात. संत्री आणि गाजर जर सोबत खाल्लं तर छातीत जळजळ होते, पित्त वाढतं.

3. पेरु आणि केळ- पेरु आणि केळ एकत्र खाणं ही बाब डॉक्टरांच्या मते अगदीच चुकीची आहे. कारण पेरु आणि केळ सोबत खाल्ल्यास पोटात गॅस होतो. पोटातला गॅस वाढल्यानं डोकेदुखीही वाढते.

4. डाळिंब आणि जर्दाळू- डाळिंब आणि जर्दाळूची फळं खूप पौष्टिक असतात. दोन्हीत प्रथिनं आणि साखरेचं प्रमाण जास्त असतं. पण डाळिंब आणि जर्दाळू एकत्र खाल्ल्यास अँसिडिटी, अपचन, छातीत जळजळ असे त्रास होतात. शिवाय या दोन्ही फळातील साखर प्रथिनं पचवणार्‍या विकरांना मारुन टाकते.

छायाचित्र- गुगल

5.केळ आणि पुडिंग- डॉक्टरांच्या मते केळासोबत पुडिंग खाणं म्हणजे शरीरात विषारी घटक निर्माण करुन घेणं आहे. केळ आणि पुडिंग एकत्र खाल्ल्यास पोट जड होतं. त्यामुळे अस्वस्थता येते.

6. संत्री आणि दूध- संत्री खाऊन झाल्यावर त्यावर दूध पिणं हे धोकादायक असतं. संत्रीमधील अँसिड स्टार्चचं पचन करणार्‍या विकरांना नष्ट करतात. संत्री आणि दूध एकत्र सेवन केल्यास छातीत कफ वाढतो.

छायाचित्र- गुगल

7. अननस आणि दूध- अननसातील ब्रोमेलेन नावाचा घ्टक दुधात मिसळून शरीरास मोठी हानी पोहोचवतो. अननस आणि दूध एकत्र पोटात गेल्यास गॅस, जीव मळमळणं, संसर्ग, डोकेदुखी आणि पोटदुखी हे गंभीर त्रास होवू शकतात.

8. फळं आणि मिठाई - आता सणासुदीचे दिवस जवळ आले आहेत. घरात फळं आणि मिठाया असण्याची शक्यता जास्त. पण म्हणून फळं आणि मिठाया कधीही एकत्र खाऊ नये. डॉक्टर स्वत: फळं आणि मिठाया सोबत न खाण्याचा सल्ला देतात. मिठाई आणि फळं एकत्र खाल्ल्यास त्याचा पचनसंस्थेवर होवून पचनक्रिया बिघडते. यामुळे अँसिडिटी होणं, डोकेदुखी, मळमळ होणं असे त्रास होतात.

छायाचित्र- गुगल

9. भाज्या आणि फळं- सलाड आणि फळं हे एकत्र खाणं आरोग्यास हानिकारक असतं. कारण फळांमधे असलेली साखर भाज्यांसोबत पचवणं हे शरीरास अवघड होतं. यामुळे भाज्या आणि फळं दोन्ही सोबत खाल्ल्यास त्यांचं पचन लवकर होत नाही. पोटात ते बराच काळ पडून राहातात. त्यामुळे शरीरात विषारी घटक निर्माण होतात. या विषारी घटकांमुळे नंतर डायरिया, डोकेदुखी, पोटदुखी होते तसेच हे विषारी घटक घातक संसर्गासही कारणीभूत ठरतात.