हिवाळ्यात बऱ्याच जणांना थंडी सहन होत नाही. त्यांना लगेच सर्दी, खोकला, कफ असे आजार उद्भवतात. वातावरणात झालेल्या बदलांमुळे शरीरात अनेक आजार उद्भवतात. मुख्यतः सर्दीमुळे अनेकांचा दिवसच खराब जातो. श्वास घेण्यास अडचण, बोलायला अडचण यासह अस्वस्थ देखील वाटू लागते. याचा थेट परिणाम आपल्या कामावर होतो. आज आपण अश्या काही घरगुती उपायांबद्दल जाणून घेणार आहोत, ज्याने हिवाळ्यातील आजार लवकर लांब होतील. आणि सर्दीमुळे होणारे त्रास देखील कमी होतील. जेणेकरून आपण एक मोकळा श्वास घेऊ शकाल.
वाफ घ्या
हिवाळ्यात सर्दीपासून छुटकारा मिळवायचा असेल तर दहा ते पंधरा मिनिटे वाफ घेणे फायदेशीर ठरेल. वाफ घेतल्याने चोंदलेल्या नाकापासून दिलासा मिळतो. यासह फ्रेश देखील वाटेल. चोंदलेलं नाक आणि खोकल्यापासून जर आराम हवा असेल तर आपण गरम पाण्यात 1 नोजल कॅप्सूल घालून वाफ घेऊ शकता. ही प्रक्रिया दिवसातून एकदा करायची जेणेकरून आपण सर्दीपासून लांब राहू शकता.
गरम पाणी
गरम पाणी आपल्या घश्यासाठी खूप फायदेशीर आहे. खवखवणारा घश्यापासून आराम मिळेल. गरम पाणी प्यायल्याने तुमची सर्दी देखील कमी होईल आणि बंद झालेलं नाक देखील मोकळं होण्यास मदत होईल.
कोमट कपड्याने नाकाला शेक द्या
हिवाळ्यात नाक बंद होण्याच्या समस्येला तोंड द्यावे लागत असेल तर कोमट कपड्याने नाकाला शेक द्या. यामुळे तुम्हाला खूप आराम मिळेल. यासह डोक्यावर देखील कोमट कपड्याने शेक द्या सर्दीमुळे दुखणारे डोके देखील थांबेल आणि आराम मिळेल.
ओव्याचा शेक
ओव्याच्या मदतीनेही आपण बंद झालेलं नाक मोकळं करू शकता. यासाठी ओव्याच्या बिया तव्यावर मंद आचेवर भाजून घ्यायच्या. हलका धूर दिसेपर्यंत आणि थोडेसा काळे पडेपर्यंत भाजू द्या. त्यानंतर तो एका रुमालात गुंढाळा आणि नाकाला शेक द्या. असे केल्याने तुम्हाला आराम मिळेल.
आल्याचा वापर करा
नाक बंद होण्याच्या समस्येवर आलं मदत करेल. आल्याचे सेवन केल्याने बंद नाकापासून आराम मिळेल. आल्यामध्ये अँटीऑक्सिडंट घटक आहेत. जे नाक बंद होण्यापासून आराम मिळवून देते. अशावेळी आपण आल्याचा चहा किंवा आल्याचे पाणी पिऊ शकता. घसा आणि बंद नाकासाठी आलं गुणकारी औषध आहे.
लसणापासून बनलेला काढा उत्तम
नाक बंद होण्याच्या समस्येवर लसूण रामबाण उपाय ठरलेला आहे. सर्वप्रथम, ३ ते ४ लसणाच्या कळ्या पाण्यात उकळा. आता यात हळद, मिरपूड घालून पाणी उकळून घ्या. त्यानंतर हे पाणी पिऊन घ्या. हे पाणी पिल्याने सर्दीच्या समस्येपासून आराम मिळेल.